Technology as catalyst, Sharing Economy is the perfect example of Process Innovation

What if we share or rent instead buying new goods every time we need? Do you think sharing economy instead buying economy can save us from the shortages and scarcity of resources? While rapidly growing urbanization and increasing population constantly reminds us to what Mahatma Gandhi said, “Earth provides enough to satisfy every man’s needs, but not every man’s greed.” It is high time to think about more from less.. शिकागोला एका मित्राकडे गेलो होतो. एका सामाजिक संस्थेची गाडी त्याच्याकडे आली. घरातील सुस्थितीतील फर्निचर टीव्हीसह बाजूला काढून ठेवलेल्या इतर काही वस्तू घेऊन गेली. हा काय प्रकार म्हणून मी त्याला विचारले. तेंव्हा शिकागो स्थित झिलस गुड नावाच्या तंत्रज्ञान कंपनीविषयी समजले. सामाजिक कार्यासाठी तुमच्या वस्तू दान करा असे आवाहन करणारी ही  संस्था दानशूर आणि गरजू यांची परस्पर-भेट घडवून देणारे एक उत्तम व्यासपीठ आहे. लवकरच तो नवीन घरात राहायला जाणार होता. त्यामुळे नको असलेल्या वस्तू त्याने ह्या संस्थेमार्फत दान केल्या होत्या. संस्थेच्या संकेतसस्थळावर घरातील उपकरणं, मुलांचे कपडे-खेळण्या, पुस्तके-मासिके, कॅमेरा-रेडिओ, फोन-संगणक, प्रिंटर, फुलं-रोपं-झाडं, अन्न-कपडे, शालेय अशा अनेक नव्या-जुन्या वस्तूंचे सहज आदानप्रदान करता येते. तुम्हाला काय दान करायचे आहे आणि ते तुम्ही संस्थेत पोहचवू शकता किंवा तुमच्या घरी येऊन घेऊन जावे याविषयी दानशूर व्यक्ती नोंद करतात. गरजू व्यक्ती, संस्था आणि त्यांच्या गरजा यांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित केलेली असते तसेच उपल्बध वस्तूंसाठी गरजू शोधले जातात. आपल्या वस्तू कोणत्या गरजूस देण्यात याव्यात हे ठरविण्याचे संपूर्ण स्वतंत्र्य दानशूर व्यक्तीस असते. संस्था दोघांचा संवाद घडवून आणते आणि परस्परसंमती मिळाळ्यावरच देवघेव पूर्ण होते. वरवर खूप साधारण वाटणाऱ्या ह्या प्रक्रियेचा खोलवर विचार केल्यानंतर त्यामागील तंत्रज्ञानाचे महत्वपूर्ण योगदान लक्षात येते. अनेकदा आपल्याला नको असलेल्या वस्तूंचे काय करायचे असा प्रश्न पडतो. नंतर कधीतरी कामात येतील म्हणून वर्षानुवर्षे जपून ठेवतो. घरातही अडगळ व्हायला लागते. बरं देणार तरी कुणाला? घेउपाशारे सुद्धा समाजात काही कमी नाहीत. नेमका गरजू शोधायचा कुठे? इतका वेळ आहे कुणाकडे? मग अगदी वीट यायला लागतो. शेवटी इच्छा नसतानाही चांगल्या सुस्थितीतील वस्तू कवडीमोल भावात भंगारात काढाव्या लागतात.  त्यापेक्षा एखाद्या गरजवंताला तरी दिल्या असत्या, निदान थोडं पुण्य लाभलं असतं असं अनेकांना वाटणाऱ्यांत मी देखील आहे. कधीतरी पै पै जोडत घेतलेल्या वस्तूंमध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात. कुणाच्या उपयोगात ती वस्तू आली तर किमान समाधान तरी मिळतं. गाडीचा वापर झाला नाही म्हणून बॅटरी कामातून गेली, चाकं खराब झाली, सुटीत गावाला गेलो तर घरात कोळ्याचे जाळे साचले, चोरीच काय झाली, कार्यालयात असल्याने घरच्या इंटरनेटचा वापर होत नाही तर तर रात्री कार्यालयातील इंटरनेट व्यर्थ, लग्नकार्यांत खंडीभर अन्न वाया जातं, मुलं मोठी झालीत पण खेळण्यांचा घरात पसारा, नवीन फोन घेतला तर जुन्याच काय? वाचून झालेली पुस्तकं, जुनी सायकल, कपडे, चपला-बूट असं एका बाजूला चित्र तर दुसरीकडे गरजवंत अनेक. अगदी कधीतरीच वापरात येणाऱ्या अशा किती तरी वस्तू (आयडियल ऍसेट्स) आपण प्रत्येकजण बाळगून आहोत. जरा कल्पना करा की सर्वानी दर वेळी प्रत्येक वस्तू नवीन खरेदी करण्यापेक्षा (बाईंग इकॉनॉमी) शक्य तेंव्हा आपापसात शेअर केली (शेअरिंग इकॉनॉमी) तर? ‘शेअरिंग इकॉनॉमी’ अर्थात ‘सहभागी अर्थव्यवस्था’ म्हणजे अशी अर्थव्यवस्था की जिथे नागरिक त्यांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्ता आणि सेवा एकमेकांना परस्परसामंजस्यातुन मोफत किंवा अल्प दरात देऊ-घेऊ शकतात. मध्यंतरी सिलिकॉन व्हॅलीतील एक अमेरिकन मित्र दोन आठवड्यासाठी भारतात आले होते. त्यांनी स्वतःचे घर एअरबीअँडबी द्वारे भाड्याने दिले होते. विमानतळावर पार्किंगचे पैसे भरत राहण्यापेक्षा त्यांनी त्यांची कार झिपकार या टॅक्सी कंपनीला वापरायला दिली होती. प्रगत राष्ट्रांत अनेक नागरिक आपल्या वस्तू स्वतःला गरज नसताना दुसऱ्याला वापरायला देतात परंतु उगाच बिनकामी पडून राहू देत नाहीत. त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्नही मिळते आणि वस्तू सुस्थितीत देखील राहतात. याचे प्रमुख कारण म्हणजे तिकडे परस्पर देवाणघेवाण प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. त्याचे श्रेय जाते तंत्रज्ञानाला. एअरबीअँडबीमार्फत आपण संपूर्ण स्थावर मालमत्ता अथवा घराचा काही भाग भाड्याने देऊन उत्पन्न मिळवू शकतो, डॉगव्हॅकि कंपनी परिसरातील लोकांना मालकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पाळीव प्राण्यांची सेवा-सुश्रुषा करण्याचे रोजगार उपलब्ध करून देते, गुगलप्रणीत रिलेराइड्स कंपनी ऍप द्वारे शेजाऱ्यांची गाडी तासावर किंवा दिवसभरासाठी आपण भाड्याने घेऊ शकतो. झारली व टास्करॅबिट सारख्या कंपन्या संकेतस्थळांमार्फत घरकामाच्या सेवा-सुविधा पुरविणाऱ्यांना रोज हजारो रोजगार उपलब्ध करून देतात. लिफ्ट, उबर, ब्लाब्लाकार व गेटअराउंड सारख्या कंपन्या कार शेअरिंगचे अनेक पर्याय देतात. लिक्विड नावाची स्टार्टअप सायकल उपलब्ध करून देते. ‘फोन’ हे एक जागतिक वायफाय शेअर नेटवर्क आहे ज्यात इंटरनेट शेअर केल्याच्या बदल्यात आपल्याला जगात कुठेही इंटरनेट मोफत मिळते. सॅन फ्रान्सिस्को व सिएटल भागात सुरु झालेली साईड-कार ही एक नवीन कार शेअरिंग स्टार्टअप विनाशुल्क प्रवास सुविधा देते व फक्त स्वेच्छेने दिलेली देणगी स्वीकारते. स्नॅपगुड, नेबरगुडस व पॉशमार्क मार्फत वापरलेले कपडे अल्प दरात मोबाईलऍप वर विकता येतात, ओएलएक्स, झूमकार, काऊचसर्फिंग, फेअरसेंट, लेन्डिंग क्लब सारख्या अनेक प्रगत कंपन्या शेअरिंग इकॉनॉमी बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवत आहेत तसेच अनेक स्टार्टअप्स नवनवीन तंत्रज्ञान घेऊन शेअरिंग इकॉनॉमी बळकट करण्यासोबतच उत्तम व्यवसाय देखील करत आहेत. प्रगत राष्ट्रांतील सरकार देखील अशा सहभागी अर्थव्यवस्थेस प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे उपलब्ध संसाधनांचा अधिकतम विनियोग तर होतोच शिवाय मागणी (डिमांड) आणि पुरवठा (सप्लाय) याचे समीकरण समतोल राहते. महात्मा गांधीजींनी अतिशय मार्मिक शब्दांत म्हटले आहे की , “पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागविण्याइतकी समर्थ आहे, पण ती प्रत्येकाची हाव भागवू शकत नाही.” प्रचंड लोकसंख्या व त्यांच्या वाढत्या गरजा आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे  नैसर्गीक संसाधनांची कमतरता भासू लागली आहे. समाजातील गरीब-श्रीमंती मधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एका बाजूला मुबलक सोयी-सुविधा असलेला वर्ग तर दुसरीकडे मोठा तुटवडा अशा दोन भागात समाज विभागला आहे. परंतु असे असताना देखील जागतिक दातृत्व दर दिवसागणिक वाढतो आहे ही संवेदनशीलता कायम असल्याची निशाणी आहे. अनेकांमध्ये देण्याची, शेअर करण्याची इच्छा असते. देणारे व घेणारे दोघेही मुबलक आहेत. गरज आहे ती या दोघांमध्ये भेट घालून देणाऱ्या तंत्रज्ञानाची, पारदर्शक प्रक्रियेची व संधीचे सोने करण्याऱ्या कल्पक उद्योजकांची. आपल्याकडे स्वयंपूर्णतेचे धडे गिरवितांना ग्रामीण भागांत बाराबलुतेदार वस्तुविनिमय पद्धत (बार्टर एक्स्चेंज) होतीच किंबहुना अनेक खेड्यांत आजही आहे. तंत्रज्ञान निश्चित त्या थोर परंपरेला गती देऊ शकतं. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ मधील पोकळीकडे देशातील नवतरुणांनी एक व्यावसायिक संधी म्हणून बघावं. तंत्रज्ञानाची मदत घेऊन देवाणघेवाण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केल्यास नागरिकांचा सहभाग वाढेल. यामुळे पैशांची बचत होईल, वेळप्रसंगी होणारी गैरसोय टळेल, प्रत्यक्ष खरेदीपूर्वीचा अनुभव घेता येईल, सामाजिक बांधिलकी व एकत्रित मालकी जोपासली जाईल, पर्यावरण पूरक सवयींना प्रोत्सहन मिळेल. स्मार्ट शहरं वसविताना प्रशासनाने शेअरिंग इकॉनॉमी धोरणांचा अवलंब केल्यास गटपातळीवर होणारे छोटे छोटे उपक्रम सामाजिक चळवळीत रूपांतरित होतील. स्थानिक अर्थव्यवस्था कायम सुस्थितीत राहिल्याने जागतिक मंदीसारख्या संकटांचा प्रभाव कमी होईल. मागणी व पुरवठा यात समतोल राहिल्याने यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल व परस्पर सहयोगातून नागरिकांचे जीवनमान दर्जा उंचावेल.

Published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=04022017009009 Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/technology-as-catalyst-sharing-economy-is-the-perfect-example-of-process-innovation
Sidebar