The role of city wide WIFI Internet (Muncipal Wireless Network) in making citizens smart
‘Municipal wireless network‘ is a safe, secured and free city-wide wifi Internet network, which can incentivize citizens to make use of public services, encourage social innovations, create new job opportunities, increase tourism, improve citizens-administration communication, bring transparency, build trust, empower citizens, help in city-branding, attract investments and become a new revenue source for the corporation. महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी बिनतारी इंटरनेट जाळे निर्माण करून नागरिकांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे यालाच ‘म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क’ असे म्हणतात.
अमेरिकेत असताना आणि इतर काही देशांत प्रवास करताना मला यत्किंचितही वाटलं नाही कि मी जगापासून क्षणभरदेखील तुटलो आहे म्हणून. त्याचे मुख्य कारण म्हणजे तिकडे सर्वत्रच खुले वायफाय इंटरनेट उपलब्ध असते. सब-वे, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, चालत्या वाहनांमध्ये, वाचनालये, दवाखाने, विद्यापीठं, प्रत्येक चौकात अगदी सगळीकडं. जणू संपूर्ण शहरच वायफाय असावं. हल्ली अधिकतम नागरिक मोफत इंटरनेट असलेल्या रेस्टोरंट मध्ये जेवण घेणे पसंत करतात. व्हर्चुअल जगात वावरणारा तरुण वर्ग कॉफी पिण्यासाठी स्टारबक्स आणि पिझ्झा-बर्गर खाण्यासाठी मॅक्डोनाल्डमध्ये गर्दी करताना दिसतो. याचे एक कारण म्हणजे तिथे मिळणारी मोफत वायफाय इंटरनेट. मोफत वायफाय इंटरनेट हि स्टारबक्स, मॅक्डोनाल्ड सारख्या खाजगी ब्रॅण्डची एक यशस्वी व्यवसायनीती (बिजनेस स्ट्रॅटेजी) ठरली आहे. मोफत इंटरनेट सुविधा पुरविल्याने अनेक व्यावसायिकांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात ६२ टक्के व्यावसायिकांनी सांगितले कि वायफाय क्षेत्र (झोन) असलेल्या ठिकाणी त्यांचे ग्राहक अधिक वेळ घालवतात व ५० टक्के व्यावसायिकांनी सांगितले कि त्यांचे ग्राहक मोफत इंटरनेट सुविधा सुरु केल्यापासून अधिक खर्च करू लागले आहेत. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे, अधिभार मूल्य आकारणे व संलग्न उत्पादने-सुविधा विक्री यातून अनेक हुशार व्यावसायिक नफा मिळवत आहेत. नागरिकांची मागणी व खाजगी सेवा पुरवठादारांचे हे कौशल्य लक्षात घेता अनेक देशांच्या सरकारी यंत्रणा देखील ‘म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क’ चा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. शहरभर वायफाय जाळे पसरविल्यामुळे, सरकारी सेवांचा नागरिक जास्तीत जास्त वापर करतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतील, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, नवसंशोधन वाढीस लागेल, पर्यटन व्यवसायास चालना मिळेल, प्रशासनाचा जनसंवाद वाढेल व शिवाय जाहिरात व डेटा च्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होईल. माहितीच्या मुक्त देवाणघेवाणीतुन लोकशिक्षणाचा प्रभावी पर्याय मिळाल्याने डिजिटल दरी कमी होण्यास मदत होते.
एकदा अमेरिकेतील वोरमॉण्ट राज्यात इरीन वादळाच्या तडाख्यामुळे रॉयलटन शहरातील संपूर्ण दळणवळण व्यवस्था मोडकळीस पडली होती. अशा आपत्तीच्या काळात नागरिकांनी त्वरित संपर्कासाठी प्रशासनाने तयार केलेल्या वायफाय इंटरनेट क्षेत्राचा आसरा घेतला. छोट्या छोट्या विभागांत स्थापित केलेले इंटरनेट संच मर्यादित वीजेवर चोवीस तास सुरु ठेवणे त्यांना शक्य झाले व स्थानिक पातळीवरील आपत्कालीन माहिती त्या त्या नेटवर्क मार्फत नागरिकांना तात्काळ पुरवली गेल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. स्थानिक वायफाय क्षेत्र नियंत्रित करणाऱ्या प्रमुखास संकेतस्थळाचे मुखपृष्ठ (लँडिंग पेज) ठरविण्याचा पर्याय असल्याने त्याद्वारे आपत्कालीन माहिती, शहरातील महत्वाची स्थळं, वास्तु, संग्रहालयं, सार्वजनिक प्रेक्षणीय ठिकाणं, शहरात कधी-कोठे-काय घडामोडी, वाहतूक दर व वेळापत्रक, बँक-एटीम तसेच दवाखाने, शाळा-महाविद्यालयं, बाजारपेठा, जवळचे मॉल्स, नाट्यगृह व इतर महत्वाच्या माहितीपर अथवा मनोरंजनात्म्क घटना यांची माहिती देता येते. स्थानिक नागरिक व पर्यटकांसाठी प्रत्यक्षदर्शी माहिती मिळविण्याचा तो एक सुखद अनुभव तर ठरतोच शिवाय शहरी सामाजिक बौद्धिक व आर्थिक विकास वाढीस लागतो. शहराचा सर्वांगीण विकास आराखडा बनविताना अधिकतम माहिती महत्वाची असते. अशा वेळी म्युनिसिपल वायरलेस इंटरनेट च्या माध्यमातून उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून नागरिकांच्या हिताच्या योजना बनविण्यास मदत होईल. अनेक शहरं वायफाय-सिटी असे स्वतःचे वैशिष्ट्य (ब्रॅंडिंग) दाखवून देश-विदेशातून गुंतवणूक आकर्षित करत आहेत.
“रोटी, कपडा और मकान” सोबत आता मोबाईल व इंटरनेट ह्या देखील मानव जातीच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत. लास एंजलिस, कॅनडा, तैवान, पॅरिस व जगभर अनेक शहरांत प्रत्येक सरकारी इमारत, सार्वजनिक वाहतूक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोफत इंटरनेटचे यशस्वी प्रयॊग सुरु आहेत. प्रगत राष्ट्रातील स्मार्ट शहरांपासून प्रभावित होत भारतात देखील बंगळुरू, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद या शहरांमध्ये म्युनिसिपल वायरलेस नेटवर्क निर्मितीचे मर्यादित प्रयत्न होताना दिसत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हायवे कनेक्टिव्हिटीसोबतच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक इंटरनेट कनेक्टीव्हीटी महत्वाची झाली आहे. अमेरिकेत जवळजवळ ८५ टक्के जनता इंटरनेट वापरते व ७० टक्के लोकांना उच्च दर्जाचे इंटरनेट सर्वकाळ उपलब्ध आहे. भारत इंटरनेट वापरकर्त्यांच्या क्रमवारीत १२७ व्या स्थानावर असून जेमतेम २६ टक्के भारतीय इंटरनेट वापरतात. मर्यादित इंटरनेट त्यातच थ्रीजी, फोरजी इंटरनेट खर्च सर्वांनाच परवडेल असे नाही. मात्र एक कोटीहून अधिक स्मार्टफोन संख्या आहे हि देशासाठी एक जमेची बाजू आहे. मोफत व सुरक्षित इंटरनेट उपलब्ध असल्यास सामान्यांसाठी जशी पैशाची बचत होईल त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीचे देखील अनेक पर्याय उपलब्ध होतील. विद्यार्थी आणि नवउद्योजक यांना अधिक फायदा होऊ शकेल. अंतर शिक्षण (डिस्टन्स लर्निंग) प्रक्रियेत अखंडित (अनइंटरपटेड) इंटरनेट व त्याचा वेग (स्पीड) यांची मुख्य भूमिका आहे. डिजिटल इंडिया प्रक्रियेत नवनवीन शक्यतांचा विचार केला जात आहे, कल्पक सूचना मागवल्या जात आहेत. कल्पना करा कि जनकल्याणकारी योजना म्हणून संपूर्ण देशभर सुरक्षित व मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले तर?
Published url at Maharashtra Times :
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=28012017011004
Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/the-role-of-city-wide-wifi-internet-muncipal-wireless-network-in-making-citizens-smart