Bike Sharing Network, must have for eco-friendly for smart cities

Why smart cities should think about bike sharing networks at design? While rapidly growing urbanization, pollution and population, what could be the alternative public transportation systems? When public health is at stake, how can we think of eco-friendly ideas?.. ४ मे २०१४ ला रात्री उशिरा वाशिंग्टनला पोहोचलो. दिव्यांच्या रोषणाईत अमेरिकेची राजधानी लोभस दिसत होती. अभ्यासातून शहराविषयी थोडंफार जाणून होतो. मात्र प्रत्यक्ष भेट देण्याचा तो पहिलाच प्रसंग. दुसरा दिवस माझ्यासाठी तसा निवांत होता. जवळपास काय-कुठं बघणे शक्य आहे त्याचे नियोजन करून झोपी गेलो. सकाळच्या फेरफटक्याने सुरुवात केली. विस्कॉन्सिनन अव्हेन्यू नॉर्थ-वेस्ट वर फर्लांगभर चालत गेलो तोच वीस-पंचवीस सायकल रस्त्याच्या कडेला लावलेल्या दिसल्या. कुतूहल वाटलं म्हणून चौकशी केली. ते ‘कॅपिटल बाईक’ नावाच्या सायकल शेअरिंग उपक्रमाचे एक केंद्र (स्टेशन्) होते. शहरभर त्यांची अशी चारशे चाळीस केंद्र व चार हजार सायकल कार्यरत असून तीस मिनिटांसाठी दोन डॉलर आणि दिवसभरासाठी आठ डॉलर देऊन सायकल घेता येते असे समजले. मी आठ डॉलर देऊन सायकल ताब्यात घेतली. मोबाईलवर कॅपिटल बाईक ऍप डाउनलोड केले व नॅशनल मॉलच्या दिशेने जायला लागलो. रस्त्याने जाताना प्रत्येक अर्धा-एक किलोमीटर वर कॅपिटल बाईक केंद्र नजरेस पडते. त्या-त्या ठिकाणी मी सायकल जमा करत गेलो. आसपासच्या वास्तु-परिसर बघायचा. दिशाभूल झाल्यास मोबाईलवर स्टेशन नकाशा उघडून जवळपासचे केंद्र शोधायचे. कोणतीही सायकल घेऊन पुढचा प्रवास. असं करत-करत दिवसभर तब्ब्ल पंधरा ते वीस वेळा मी सायकल ठेवली, घेतली, तितकीच ठिकाणं पहिली आणि किमान वीस  किलोमीटर शहर पायाखाली नव्हे तर सायकलच्या चाकाखाली घातलं. पाहण्यापलीकडे शहर प्रत्यक्ष अनुभवण्याचा तो एक अनोखा आनंद होता. एरव्ही दिड-दोनशे डॉलर खर्चूनही जे जमलं नसतं ते सायकल शेअरिंग उपक्रमामुळे फक्त आठ डॉलर मध्ये शक्य झालं. तेंव्हापासून मी सायकल शेअरिंगच्या प्रेमातच पडलो. न्यू-यॉर्क, बे-एरिया, पोर्टलॅंड, शिकागो इथे देखील सायकल शेअरिंगचा अनुभव घेतला. पुढे २०१५ मध्ये वर्षभरासाठी एमआयटी विद्यापीठात जावे लागणार होते. बोस्टनला पोहोचल्याबरोबर मी पहिले काम काय केले तर ‘हबवे सायकल’ शेअरिंग उपक्रमाचा सभासद झालो. तब्ब्ल एक वर्ष दरदोज सायकल वापरली. तीही फक्त वार्षिक २५ डॉलर या विद्यार्थी विशेष सवलतीत. घर-ते-विद्यापीठ-ते-घर असा दरदोज सात किलोमीटर प्रवास मी वर्षभर सायकलऐवजी बस अथवा रेल्वे ने केला असता तर मला प्रतिदिन पाच डॉलरप्रमाणे तीनशे दिवसांचे किमान पंधराशे डॉलर मोजावे लागले असते. पैशांच्या याच बचतीतून मी अमेरिका-भारत-अमेरिका असा दोनदा विमान-प्रवास करू शकलो. आर्थिक गणितांव्यतिरिक्त नियमित सायकल प्रवासामुळे आरोग्य चांगले राहिले, वेळेची बचत झाली, ट्राफिकपासून मुक्तता, प्रदूषण कमी करण्यात योगदान देऊ शकलो. शिवाय सायकल वापरामुळे बोस्टन, केम्ब्रिज शहरं जवळून अनुभवता आली. सायकल शेअरिंग म्हणजे अल्प काळासाठी व्यक्तिगत वापराकरिता सायकल उपलब्ध करून देणारी सेवा. यामध्ये शहरभर सायकल तळांचे (स्टॅन्ड) जाळे पसरविले जाते. मासिक अथवा वार्षिक स्वरूपांत नागरिकांना नेटवर्कचे सभासदत्व घेता येते. पर्यटक तात्पुरते सभासद होऊन सेवेचा वापर करू शकतात. वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केलेल्या सायकल्स चोरीपासून सुरक्षित तसेच कमी देखभाल खर्चिक असतात. मिळालेल्या गुरुकिल्ली (मास्टर-की) अथवा सांकेतिक शब्दांचा (पासवर्ड) वापर करून सभासद व्यक्ती कोणत्याही सायकलताळावरून कोणतीही सायकल कधीही वापरू शकतो. सायकल शेअरिंग पर्यायाचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी सभासदत्व मूल्य अतिशय वाजवी व सर्वसामान्यांना परवडेल असे ठेवण्यात येते. पार्किंगचा खर्च व वाहने सांभाळण्याची जबाबदारी टाळण्यासाठी अनेक लोकं व्ययक्तिक वाहने वापरण्यापेक्षा सायकल शेअरिंग नेटवर्कचा वापर करतात. युरोपातील ऍमस्टरडॅम येथे १९६५ साली सुरु झालेला अनोखा सायकल शेअरिंग उपक्रम आजमितीस जगभर पन्नास देशांत सातशे बारा शहरांनी अंगिकारला आहे. चाळीस हजार सायकलतळांवर असलेल्या जवळपास नऊ लाख सायकल शहरी भागांत सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून समोर येत आहे. परदेशांत मोठ्या संख्येने नागरिक सायकलचा नित्य वापर करताना दिसतात किंबहुना वाहतुकीच्या इतर पर्यायांपेक्षा त्यांना शेअरिंग सायकल अधिक सोयीची वाटते. तेथील सरकारं नागरिकांसाठी सायकल चालविण्याचा अनुभव अधिकाधिक आनंददायी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष सायकल रस्ते निर्मितीसोबतच ‘बाईक-टू-वर्क’, ‘बाईक-टू-स्कुल’ अशा उपक्रमानंर्गत सायकल संस्कृती रुजवात आहेत. तेथील उद्योजक व खासगी संस्था सायकल शेअरिंगकडे एक व्यावसायिक संधी म्हणून बघत आहेत. पॅरिसची वेलीब, वॊशिंग्टनची कॅपिटल बाईक, बोस्टनची हबवे, लॉस एंजेलिसची मेट्रो बाईक, न्ययॉर्कची सिटी बाईक, मिन्नेऑपोलिसची नाईसराईड, मॉन्ट्रिअलची बिक्सी, बर्लिनची कॉल-अ-बाईक, जपानची इको बाईक ह्या कंपन्या उत्तम व्यवसाय करत आहेत. शहरांतील मोक्याच्या ठिकाणी सायकलतळ असल्यामुळे सभासदत्वाच्या ठराविक कमाईसोबतच जाहिरातीच्या माध्यमातून भरगोस नफा मिळतो. अनेकदा सायकल शेअरिंग नेटवर्कची सभोवतालच्या संस्था, उद्याने, संग्रहालये, खाजगी कंपन्या, बस-सेवा, रेल्वे, विमानतळ तसेच कार कंपन्यांसोबत भागीदारी असते. एक प्रकारे व्यवसाय वाढीसाठी व मुख्य वाहतूक व्यवस्थेस जोडण्यासाठी (पूल सिस्टिम) म्हणून त्या काम करतात. फ्रांसची विन्सी पार्क त्यांच्या वाहनतळावर गाडी लावल्यास आपल्या ग्राहकांना स्थानिक प्रवासाकरिता सायकल देतात. सॅन फ्रान्सिस्कोची सिटी कारशेअर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक सायकल सुविधा सुरु केली आहे. त्याखेरीज सायकल शेअरिंग व्यवसायात वृद्धीचे प्रमुख कारण म्हणजे ‘बिग-डेटा’. नेटवर्क मधील प्रत्येक सायकल ला आर.एफ.आय.डी. सेन्सर असते त्यामुळे त्या सायकलच्या उगम ते मुक्कामापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची माहिती संकलित होते. सायकलवरील वायरलेस सेवा प्रत्यक्षदर्शी माहिती पाठवत असते. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याने नागरिकांच्या वाहतूक वेळा, सवयी, मार्ग या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती (डेटा) मिळवली जाते. याच डेटाच्या आधारे खाजगी कंपन्या भविष्यवेधी सेवा-उत्पादने निश्चित करतात, स्थानिक प्रशासनं शहरी व्यवस्थापन व नागरिक हिताच्या योजना राबवतात. आपल्याकडील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक यंत्रणा आधीच तोकडी पडत आहे. शाळा-महाविद्यालयांमधील लाखो  विद्यार्थी, नोकरदार-वर्ग दररोज ये-जा करतात. ग्रामीण भागातून लोकं कामानिमित्त शहरांत येत असतात, हजारो पर्यटक वर्षभर भेटी देत असतात. हवेचे प्रदूषण, इंधन तुटवडा, वाढणारी लोकसंख्या व त्यांच्या गरजा यामुळे वाहतूकव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. मात्र प्रगतिशील राष्ट्रांमध्ये सुरुवातीपासूनच सायकल हे महत्वाचे वाहतूक साधन राहिले आहे. रस्ते-अपघात, गैरसोय, चोरी अशा सुरक्षिततेच्या अडचणी असताना देखील आपल्याकडे सायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक आहे. शासनाकडून आधारभूत संरचना पुरविल्यास व योग्य धोरणांचा अवलंब केल्यास सायकल वापरकर्त्यांचे प्रमाण निश्चित वाढेल. अलीकडे नागरिक आरोग्याच्यादृष्टीतनेही सजग होत चालले आहे. नागरिकांच्या बदलत्या सवयी, त्यांचा कल, वाहतूक पर्यायांची गरज व भविष्याचा वेध घेत स्थानिक उद्योजकांसाठी सायकल शेअरिंग ही एक व्यावसायिक संधी म्हणून खुणावत आहे. स्थानिक तरुणांसाठी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. खाजगी व्यावसायिक, औद्योगिक संस्था व वाहतूक व्यवस्था यांच्यासोबत भागीदारी केली जाऊ शकते. भरदाव वेगाने वाहणाऱ्या इतर पर्यायांऐवजी सायकल सारख्या संथगतीने व सोईस्कर होणाऱ्या वाहतूक सुविधेमुळे लोकांचे अवांतर खरेदी करण्याचे प्रमाण वाढते हेही स्थानिक व्यावसायिकांनी लक्षात घेण्यासारखे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरासह वेगळे, आकर्षक व सुरक्षित सायकल-वाहतूक-मार्ग निर्माण केल्यास सायकल शेअरिंगसारखे उपक्रम प्रभावी वाहतूक व्यवस्था ठरू शकतात.  स्मार्ट शहरांकडे वाटचाल करताना सायकल शेअरिंग ह्या पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक पर्यायाचा अग्रक्रमाने विचार करणे म्हणूनच क्रमप्राप्त आहे.

Published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=11022017006012 Or read at http://sunilsunilkhandbahale.com/bike-sharing-network-must-have-for-eco-friendly-for-smart-cities
Sidebar