Smart Technologies for Smart Cities

Let’s have a look at few open data initiative based smart technologies for smart cities, such as smart parking, touch screen across city and so on..  ‘स्मार्ट सिटी’ अर्थात ‘अद्ययावत शहर’ म्हणजे काय? जी सध्या आहे तीच सिटी स्मार्ट होणार कि पूर्णतः नवीन स्मार्ट सिटी तयार करणार? बरं सिटी स्मार्ट करायची म्हणजे नेमकं काय करायचं? कुणी करायची? त्याचा फायदा काय? कुणाला? असे तुम्हा आम्हा सामान्यांना पडलेले सर्वसाधारण प्रश्न. खरं तर स्मार्ट सिटी ची जगद्मान्य ठराविक एक अशी व्याख्या नाही. स्थलकालपरत्वे स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्या एकत्रित इच्छाआकांक्षा, गरजा, उपलब्ध संसाधने, शक्ती, सुरक्षा आणि मर्यादांनुसार ती ठरत असते. म्हणूनच प्रगत राष्ट्रांतील स्मार्ट शहरांची हुबेहूब नक्कल करून आपल्याला चालणारं नाही, ते शक्यही नाही आणि संयुक्तिक देखील ठरणार नाही. याचाच दुसरा अर्थ असा कि, आपलं शहर कसं हवंय हे ठरविण्याची मुभा पूर्णपणे आपल्यालाच आहे. असं असलं तरी स्मार्ट सिटी विषयीची साधारण ठोबळ संकल्पना मांडण्यात आलेली आहे. त्यानुसार स्थानिक नागरिकांचे जीवनमान-दर्जा उंचावण्याच्या ऊद्देशाने आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट आधारित (इंटरनेट ऑफ थिंग्ज) सोयीसुविधांचा योग्य अंतर्भाव असलेले शहर म्हणजे ‘स्मार्ट सिटी’ होय. भारत सरकारच्या ‘स्मार्ट-सिटी-अभियान’ अंतर्गत स्मार्ट शहरं करण्याच्या दृष्टीने व्यापक-विकास, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक आधारभूत सरंचना अशी मार्गदर्शक चतुर्सुत्री मांडण्यात आलेली आहे, ज्याच्या आधारे असलेली शहरं अंतर्गत स्मार्ट केली जाऊ शकतात तसेच शहरालगत पूर्णतः नवीन नियोजनबद्ध स्मार्ट परिसर देखील वसवला जाऊ शकतो कि ज्यामध्ये सर्वकाळ मुबलक पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यविषयक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सामान्य व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या परवडतील अशी घरे, इंटरनेट कनेक्टिव्हीटी (संधानता) व संगणकीकरण, लोकाभिमुख ई-प्रशासन, सर्वंकष शिक्षण, स्वच्छता व सुरक्षा आदी स्थानीय नागरी सोयीसुविधांचा समावेश अपेक्षित आहे. भारत सरकारकडे वर्ष २०१६ मध्ये आलेल्या एकूण ९७ शहरांच्या प्रस्ताव यादीत नाशिकसह ६० शहरांची स्मार्ट सिटी योजनेत निवड करण्यात आली आहे. हे झाले स्मार्ट शहरांविषयी. परंतु शहरं खऱ्या अर्थाने स्मार्ट बनतील ती स्मार्ट तंत्रज्ञानामुळे. मागील सदरात आपण बघितले ते जनहितार्थ सार्वजनिक प्रकाशित माहितीवर आधारित ‘ओपन-डेटा’ व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) विषयी कि ज्याचा वापर करून  स्थानिक तंत्रज्ञ नवनवीन लोकोपयोगी तंत्रज्ञान निर्मिती करू शकतात. या आणि पुढील काही लेखात बघुयात अशीच काही ‘ओपन-डेटा’ मुळे तयार झालेली स्मार्ट तंत्रज्ञानाची उदाहरणं जी प्रत्येक स्मार्ट सिटीमध्ये हमखास असलीच पाहिजे. १. स्मार्ट पार्किंग अर्थात अद्ययावत वाहनतळ व्यवस्था : एका अमेरिकन मित्राला भारतीय पदार्थांची चव द्यावी म्हणून मी माझ्या मोबाईलवर ‘इंडियन रेस्टॉरंट्स अराउंड बोस्टन कॉमन’ असा गुगल सर्च केला आणि दोन तीन पर्याय सुचवले. लागलीच त्याने स्वतःच्या फोनवर स्मार्ट पार्किंग ऍप उघडले व नेमका कुठे पार्किंग स्पॉट उपलब्ध आहे याची खात्री करून मगच कार सुरु केली. पुढच्या एक तासासाठी पार्किंगच उपलब्ध नसल्याने नजीकचे दोन पर्याय सोडून थोडे लांबवर जाणे आम्हाला अधिक सोयीचे ठरले. परदेशांत खोलवर तळघरांत तसेच उंच बहुमजली इमारतींमध्ये कार्यक्षम व अतिशय कमी जागेत खुबीने तयार केलेल्या वाहनतळ व्यवस्था बघताना कमालीचे कौतुक वाटते. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकसहभागातून (क्राउड-सोर्स) अशा स्मार्ट पार्किंग व्यवस्था व ऍप तयार करणे स्मार्ट शहरांसाठी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे वेळेची बचत, कमी प्रदूषण व  सोबतच वाहतुकीदरम्यान होणारा मानसिक त्रास कमी होईल. तज्ञांच्या अभ्यासानुसार स्मार्ट पार्किंग पद्धत जगभर योग्य पद्धतीने लागू केल्यास २०३० पर्यंत २,२०,००० गॅलन इंधनाची बचत केली जाऊ शकते. पार्किग व्यवस्थेतून उपलब्ध डेटाचा अभ्यास करून वाहतूक यंत्रणेवरील तणाव कमी करता येतील जसे शाळा, कार्यालये सुटण्याच्या वेळा निश्चित करणे. रहदारीचा कल लक्षात घेऊन उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाऊ शकतात, स्थानिक व्यावसायिकांना वेळेचे नियोजन करून आर्थिक उत्पन्न वाढवता येणे शक्य आहे. २. सार्वजनिक टचस्क्रीन्स (स्पर्शपट) : अमेरिकेतील शिकागो येथे फिरत असताना शहरभर सार्वजनिक ठिकाणी व रस्त्याच्या अनेक वळणांवर टचस्क्रीन लावलेले मला दिसले. चौकशीअंती लक्षात आले कि तो शिकागो प्रशासन आणि ‘इलेव्हेट डिजिटल’ नावाच्या कंपनीचा संयुक्त उपक्रम आहे. लांबूनच दृष्टीक्षेपात पडणारे ते टचस्क्रीन किऑस्क येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना आकर्षित करतात. त्यावर उपलब्ध १२० परस्परक्रिया (इंटरॅक्टिव्ह) ऍप्लिकेशन्स च्या माध्यमातून नागरिक माहिती देवाणघेवाण करण्यासोबतच जाहिराती वाचून सवलतीच्या दरात वस्तूंची खरेदी देखील करतात. टचस्क्रीन सुविधेमुळे नागरिकांचा रस्त्यावरील संवाद कमालीचा बदलल्याचे निदर्शनास आले आहे. त्या त्या ठिकाणी लावलेल्या टच स्क्रीन वर आपत्कालीन व्यवस्था, इच्छित ठिकाणी पोहचण्याचे नकाशे-मार्ग व वाहतूक-सुविधा, परिसरातील भौगोलिक व चालू घडामोडींची माहिती दिलेली असते. याचा फायदा नागरिकांसोबतच तेथील सरकारला देखील होतो. नागरिक कुठे-किती-वेळा-काय करतात याच्या देवाणघेवाणीचा डेटा प्रशासन जमा करते कि ज्यामुळे त्यांना प्रेडिक्टिव्ह (पूर्वानुमाणी) छाननी करून उत्पन्नाच्या नवनवीन साधनांच्या योजना आखता येतात. पुढे जाऊन टचस्क्रीन सोबतच त्यांचा फेसिअल रिकग्निशन (मुद्रा अभिज्ञान) आणि जेश्चर इंटरफेस (अंगविक्षेप आंतरपृष्ठ) तंत्रज्ञान अंतर्भूत करण्याचा प्रयत्न आहे.

published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=21012017008023 Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/smart-technologies-for-smart-cities/ उर्वरित स्मार्ट सिटी तंत्रज्ञान विषयी पुढील अंकात …
Sidebar