सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज
भविष्यात मानव जातीला सर्वात मोठा संभाव्य धोका कुठला असू शकतो? अणुयुद्ध? जागतिक तापमानवाढ? पाणीप्रश्न? की अगदी परग्रहावरील जीवसृष्टीकडून होणारा हल्ला? माझ्या मते, मानवजातीला सर्वात मोठा धोका – समस्त मानवजातीच्या मेंदूचा ताबा जगातील काही मोजक्या लोकांच्या हाती जात आहे, हा आहे. सोशल मीडियाच्या कोट्यवधी वापरकर्त्यांना केब्रिज अॅनॅलिटिका डेटाचोरी प्रकरणाने जबर धक्का बसला. या कंपनीला पाठीशी घालणाऱ्या फेसबुकची प्रतिमा या प्रकरणाने मलिन झाली. आता, वापरकर्त्यांना त्यांच्याकडे झालेल्या चोरीचा तपशील कळवून फेसबुकच्या पातळीवर पापक्षालनाचा प्रयत्न होत असताना या क्षेत्राचा व्याप, त्यातून उद्भवणारे धोके आणि समाजमाध्यमांच्या सुयोग्य वापराच्या दिशा स्पष्ट करणाऱ्या लेखाचा हा पूर्वार्ध…
१९९० मध्ये, संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-ली याने वर्ल्ड-वाइड-वेब (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू)चा शोध लावला. १९९५-२००० च्या काळात ‘डॉट-कॉम’ युग उदयास आले. तेव्हा इंटरनेटवरील अधिकतर माहिती एकतर्फी (सर्व्हर साइडेड) आणि स्थिर (स्टॅटिक) स्वरूपात होती. व्यवसायविषयक प्रबोधन व्हावे, एवढाच त्यामागचा उद्देश होता. पुढे जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले, तसे इंटरनेटचे स्वरूप परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) होऊ लागले. स्थिर माहितीने गतिमान (डायनॅमिक) स्वरूप घेतले. माहितीचे आदानप्रदान वाढू लागले, त्यामुळेच पुढे डेटाचे महत्त्वदेखील तंत्रज्ञान कंपन्यांच्या लक्षात अाले. पैसा, मानव संसाधन, पायाभूत सुविधा यासोबतच डेटादेखील एक संपत्ती (असेट) आहे, हे कळून चुकल्याचा हा महत्त्वाचा क्षण होता.
१९९७ मध्ये ‘सिक्स डिग्रीज’ नावाचे पहिले सामाजिक माध्यम (सोशल मीडिया) संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू झाले. १९९९ मध्ये ब्लॉगिंग सुरू झाल्यानंतर २००० मध्ये लिंक्ड-इन, मायस्पेस, २००५ मध्ये यूट्यूब तर २००६ मध्ये फेसबुकने सामाजिक माध्यमाच्या रूपाने इंटरनेटची परिभाषाच बदलून टाकली. लोकांची अधिकाधिक माहिती गोळा करणे आणि प्राप्त माहितीच्या विक्रीतून पैसे मिळवणे, हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन बनले. साधारणतः २००४ पासून डाटा- अॅनॅलिटिक्स अर्थात माहिती विश्लेषण सुरू झाले. त्यातून जणू या कंपन्यांना अलिबाबाची गुहाच हाती लागली.
या काळात केवळ आपल्या व्यवसायाशी निगडित माहिती संकलित केली जात होती, परंतु चटक लागल्यावर थांबतील ते व्यावसायिक कसले? अधिक व्यवसाय, अधिक नफेखोरी त्यांना खुणावू लागली. तसतशी असंबंध व्यावसायिक जगतातून देखील लोकांची सार्वजनिक, व्यक्तिगत, आर्थिक, गोपनीय माहिती येनकेनप्रकारे जमा करण्याचा या मंडळींनी सपाटाच लावला. एव्हाना निर्मात्यांना कळून चुकले, की वापरकर्ता लोकांबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर त्यांना सोशल मीडियावर जास्त काळ खिळवून ठेवण्याची गरज आहे. यातूनच ‘उपभोक्ता-गुंतवणूक’ (युजर-एंगेजमेंट) असा गोंडस शब्दप्रयोग जन्माला आला.
आज सोशल मीडियावर आपल्या प्रत्येक हालचालीवर तंत्रज्ञानाची बारीक पाळत असते. आपण उठतो कधी, झोपतो कधी, कुठे जातो, कुणाशी बोलतो, काय बोलतो, आपल्या आवडीनिवडी, प्रतिक्रिया, आपण कुठल्या कारणाने आनंदी होतो, व्यथित होतो, उल्हसित होतो, प्रक्षुब्ध होतो, अशी आपली आणि आपल्या एकंदरीत सवयी-स्वभाव व नातेसंबंधांची कुंडलीच सोशल मीडियावर नियंत्रण असणाऱ्यांकडे असते. आपला ऑनलाइन वापर, माहितीचे आदानप्रदान, आर्थिक व्यवहार, सांस्कृतिक चालीरीती, आर्थिक स्तर, सामाजिक, राजकीय मते याचे सखोल आणि सूत्रबद्ध विश्लेषण केले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर प्रभावी करून, आपल्याला काय हवं-नको ते ठरवलं आणि दाखवलं जातं. आपल्या वर्तणुकीचा अभ्यास करून कुठल्या गोष्टीस आपण कसे प्रतिसाद देऊ याचे अंदाज बांधले जातात. त्यानुसार आपल्यावर भावनिक व मानसिक प्रयोग केले जातात. सोशल पोस्ट्स, ईमेल, जाहिराती यांच्या माध्यमातून माहितीचा भडिमार केला जातो. खोट्या बातम्यांच्या माध्यमातून आपले विचार प्रभावित (ब्रेन वॉश) केले जातात. विशेष म्हणजे हे सर्व काही घडते, ते आपल्या नकळत!
सोशल मीडियाने आपल्या मनावर इतके गारुड केले आहे की जगभर ठिकठिकाणी ‘सोशल मीडिया व्यसनमुक्ती’ चळवळी सुरू झाल्या आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुसंख्य त्याच्या आहारी गेले आहेत. आणि जरा थांबा. निद्रावस्थेतदेखील तुम्ही काय विचार करता, याची माहिती मिळवता येऊ शकते काय, यासाठी तंत्रज्ञ प्रयत्न करत आहेत. आजच्या तरुण पिढीला ‘फोमो’ (FOMO) ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’सारखे मानसिक आजार की ज्यामुळे नकळत दुःख, नैराश्य, मत्सर आणि एकटेपण अशा समस्या जडल्या आहेत. अमुक व्हिडिओ व्हायरल झाला, तमुक व्यक्ती एका रात्रीत सेलिब्रिटी झाली, इतके फॉलोअर्स, तितक्या लाइक्स हे सगळं गौडबंगाल सामान्य माणसाच्या आकलनापलीकडे आहे. सत्यस्थिती काही वेगळीच अाहे. व्ह्यूज, लाइक्स आणि फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी, नवनवीन रेकॉर्ड करण्या-मोडण्यासाठी खऱ्याखुऱ्या मानवांप्रमाणेच असंख्य यांत्रिकी रोबोट्सचा ताफाच्या ताफा कार्यरत असू शकतो याची आपण कल्पना करू शकतो काय? असत्य वारंवार सांगितल्याने सत्य वाटायला लागते. सत्तेसाठी आपली मतं प्रभावित केली जातात. तुमच्या-आमच्या भावभावनांशी असा खेळ सुरू होतो. त्यातूनच आपण वापरकर्ते नसून उत्पादन बनतो. सोशल मीडियामुळे होणाऱ्या हत्या, आत्महत्या, अपघात आणि हिंसाचार यांचे आकडे चिंताजनक आहेत. मानसिक आरोग्य ही एक जागतिक समस्या होऊन बसली आहे. मग प्रश्न असा पडतो की यावर उपाय काय?
प्रत्यक्ष जगात वावरताना, एकांतात आरशासमोर उभं राहून स्वत:चं रूप न्याहाळताना कळत-नकळत आपल्याकडे कुणी बघत असेल ह्या विचाराने आपण किती सजग असतो. परंतु आभासी जगात आपण इतके सजग असतो का? खरं तर तंत्रज्ञान तटस्थ असते. बनवणारे किंवा वापरणारे त्याला प्रभावित करत असतात. आपण सोशल मीडियाने प्रभावित होतो, आणि ते आपल्या सामाजिक वर्तनातून, प्रतिसादातून शिकत जाते. हे एक अव्याहत फिरणाऱ्या चक्रासारखं आहे. ‘केम्ब्रिज अॅनॅलिटिका’च्या निमित्ताने जगभर ‘डेटा-सुरक्षा’ विषय ऐरणीवर आला आहे.
माझ्या मते, सोशल मीडिया डिलीट करणे, सोडणे हा काही यावरचा उपाय होऊ शकत नाही. ‘वैयक्तिकीकरण’ ही सामाजिक-माध्यमविश्वात जमेची बाजू आहे. आपले सामाजिक वर्तन पाहूनच सामाजिक-माध्यम आपल्याविषयी शिकत असतात. त्यामुळे आपल्यासाठी तो उपयुक्त करणं, खरं तर खूप सोपं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर डिलीट करण्याऐवजी आपण त्याचा उपभोक्ता या नात्याने प्रभावी वापर कसा करू शकतो? आपल्यासाठी काय महत्त्वाचे हे आपण निर्मात्यांच्या कसे लक्षात आणून देऊ शकतो? आपण प्रभावित होण्याऐवजी सामाजिक माध्यम प्रणालीच कशी प्रभावित होईल? हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्याला अपेक्षित ज्ञान मिळवण्यासाठी अथवा प्रचार-प्रसारासाठी, जाणीवपूर्वक आणि सजगतेने तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करतानाही अनेक संस्था, शास्त्रज्ञ, विचारवंत तसेच कलावंत दिसतात. त्यातूनही आपण स्वतःसाठी खूप काही शिकू शकतो.
‘स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हे मानवाचे वैशिष्ट्य आहे.’ ही क्षमताच जर मानव गमावून बसला तर? त्या क्षमतेवरच नियोजनबद्ध पद्धतीने कुणी नियंत्रण मिळवू पाहत असतील तर? लोकशाही आधारित जगातील दोनशेहून अधिक निवडणुकांमध्ये केम्ब्रिज अॅनॅलिटिका सहभागी होती. फेसबुकच्या कोट्यवधी वापरकर्त्यांच्या डेटाचा अॅनॅलिटिकाने कसा वापर केला, हे नजीकच्या काळात टप्प्याटप्प्याने उघड होईलच, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण अपेक्षित असताना उलट केंद्रीकरण होत असेल तर? एकविसाव्या शतकातील मानव हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माहिती तंत्रज्ञान युगाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे डेटा सुरक्षेच्या उपाययोजना तर अपरिहार्य आहेतच; परंतु त्यासोबतच सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवून आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक व्हावे यावर वेळीच विचार होणे शहाणपणाचे नाही का?
published url : https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-sunil-khandbahale-write-about-social-media-5853319-NOR.html