भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार पर्वात वावरताना ‘डेटा-सुरक्षा’ यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे? फेसबुकबाबतचे अॅनालिटिका आणि त्याआधीचे काही घोटाळे हेच दर्शवतात. त्यातूनही मार्ग काढत भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वत:च्या सोशल मीडिया निर्मितीची संधी यानिमित्ताने आपल्याला चालून आली आहे. तथापि, आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक व्हावे, यावर विचार होणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रभावित करण्यासाठी ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ने केलेला फेसबुकच्या पाच कोटी वापरकर्त्यांच्या माहितीचा (डेटा) चोरी-घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे ‘डेटा-सुरक्षा’ विषय ऐरणीवर आला. जगभर गांभीर्यपूर्वक चर्चिला गेला. आपत्ती हीच इष्टापत्ती समजून समंजसपणाने जग कामालाही लागले.

यापूर्वी अगदी २००४ पासून ए.ओ.एल. (अमेरिका ऑनलाइन) पासून तर अलीकडे २०१३ मध्ये ‘याहू’च्या रेकॉर्डब्रेक ३ अब्ज, २०१४ मध्ये ‘इबे’च्या १४.५ कोटी, २०१६-१७ मध्ये ‘अडल्ट-फ्रेंड्स-फाइंडर’चे ४१ कोटी, ‘उबेर’ टॅक्सी कंपनीच्या ६ कोटी, ‘अॅडोब’चे ३ कोटी त्याचबरोबर व्हेरिसाइन, जेपी मॉर्गन, लिंक्ड-इन, मायस्पेस, ड्रॉपबॉक्स, आधार (यूआयडी) यांच्या कोट्यवधी वापरकर्त्यांच्या व्यक्तिगत माहितीसह क्रेडिट कार्ड््स आणि आर्थिक व्यवहारांबाबत डेटा चोरी होत आली आहे. चिंतेची बाब म्हणजे, चोरी केलेल्या माहितीचा वापर उत्पादने-सेवा विक्रीसोबतच लोकांची सामाजिक-राजकीय मते प्रभावित करण्यासाठी केला गेला आहे. अगदी ब्रेक्झिटपासून तर जगभरातील दोनशेहून अधिक निवडणुकांची कामे केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीकडे होती. कंपनीचा पूर्वाश्रमीचा संशोधक ख्रिस्तोफर वायलीच्या म्हणण्यानुसार आणि कंपनीचा मुख्य व्यवस्थापक अलेक्झांडर निक्स याच्या कबुलीजबाबानुसार सदर कंपनी डेटा-चोरी व त्याचा दुरुपयोग यासाठी लाच देणे, ‘हनीट्रॅप’सह मुली पुरवणे यांसारख्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन वागत होती. मुळात परकीय हस्तक्षेप, आर्थिक गैरव्यवहार, सायबर हल्ले, खंडणी मागणे यांसारख्या वृत्ती काय दर्शवतात? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार, महा-माहितीच्या जगात वावरताना म्हणूनच ‘डेटा-सुरक्षा’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निर्मात्यापाठोपाठ आता विचार करूया दुसऱ्या आणि मुख्य घटकाचा. तो म्हणजे वापरकर्ता. तुम्ही-आम्ही. सकाळी उठल्याबरोबर आपल्यापैकी अनेकांचं पहिलं काम काय, तर सोशल मीडिया तपासणं. घरात वावरताना, खाताना-पिताना, प्रवासात, लिफ्टमध्ये, सिग्नलवर मिळालेल्या फावल्या वेळात, अक्षरशः गाडी चालवतानासुद्धा, रस्त्यावर चालताना एवढेच कशाला, काही महाशय तर अगदी स्वच्छतागृहातदेखील मोबाइलवर सोशल मीडियाची साथ सोडत नाहीत. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, काय खातोय, हे सर्व जगाला कळायलाच हवं का? ऊठसूट आपल्या व्यक्तिगत जीवनाचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, खरंच आवश्यक आहे का? या सर्वाचा आपल्यावर काय परिणाम होतो आहे याचा तरी विचार होतोय का? आभासी जगाच्या आहारी गेलेल्यांना निर्व्यसनी म्हणावं का? आपले मित्र-सहकारी-नातेवाईक काय करतात, कुठे जातात, काय खातात हे गरज नसताना सारखं-सारखं तपासत राहणं, त्यात आपण नाही, आपला उल्लेख नाही यातून ‘फोमो’ (FOMO) ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’सारखे मानसिक आजार उद््भवतात. ज्यामुळे नकळत दुःख, नैराश्य, मत्सर आणि एकटेपण अशा समस्या आजच्या तरुण पिढीला जडल्या आहेत. सोशल मीडियामुळे होणाऱ्या हत्या, आत्महत्या, अपघात आणि हिंसाचार यांचे आकडे चिंताजनक आहेत. मेंटल हेल्थ (मानसिक आरोग्य) ही एक जागतिक समस्या होऊन बसली आहे. आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक व्हावे, यावर विचार होणे हितावह. डेटा-सुरक्षेसंदर्भात तिसरा घटक म्हणजे हॅकर्स. सोशल मीडिया निर्मात्यांचा मूळ उद्देश जरी चांगला आणि स्वच्छ असला तरी थर्ड पार्टी अप्लिकेशन्सच्या माध्यमातून इंटरनेटवर हॅकर्ससारख्या अपप्रवृत्ती सतत सक्रिय असतात. त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काही गोष्टी करणं सहज शक्य आहे. जसे अनोळखी ई-मेल लिंक, बनावट ऑफर असलेल्या जाहिराती अथवा वेब लिंक उघडू नये. एकच सांकेतिक चिन्ह (पासवर्ड) सर्वत्र वापरू नये व ते सातत्याने बदलत राहावे. राहण्याचे, कामाचे तसेच आवडते ठिकाण (लोकेशन), नावं, टोपण-नावं, जन्मतारखा, कुटुंबविषयक, पाळीव प्राणी, पुस्तकं, सिनेमा, तुमच्या भावी योजना-नियोजन यांविषयी गुप्तता बाळगावी. हॅकर्स तुमच्या पोस्टवरून पासवर्डचा अनुमान करत असतात, त्यामुळे पोस्ट्स करताना काळजी घ्यावी. शक्यतो सायबर कॅफे, पब्लिक लायब्ररी, सार्वजनिक संगणक, सार्वजनिक वायफाय यांचा उपयोग टाळावा. अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड्स रिक्वेस्ट न स्वीकारणे, अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग अथवा संदेश न करणे, आर्थिक तसेच गोपनीय व संवेदनशील माहिती शेअर न करणे, आलेल्या पोस्टस अथवा संदेश यांची सत्यता पडताळून पाहणे, प्रलोभनं देणाऱ्या लिंक्स, अॅप्स इन्स्टॉल न करणे, थर्ड पार्टी अॅप्सचा वापर टाळणे, अनाठायी लाइक्स, कॉमेंट्स आणि फॉरवर्डिंगचा मोह टाळणे, थर्ड पार्टी वेबसाइटवर लॉगिन करण्यासाठी फेसबुक, गुगल आयडीच्या माध्यमातून लॉगिन करणे टाळणे, सोशल मीडियाचा कमीत कमी आणि कामापुरताच वापर करणे. सोशल मीडिया वापराचे वेळापत्रक बनवणे व ते पाळणे अशा उपाययोजना करता येऊ शकतात. एक लक्षात ठेवा की, तुम्ही पोस्ट केलेल्या सेल्फी अथवा फोटोज अथवा लाइव्ह व्हिडिओवरून हॅकर्सला तुमचे सध्याचे लोकेशन ट्रॅक करणे सहज शक्य असल्याने ते टाळणे उचित ठरावे. प्रायव्हसीमध्ये दिलेला प्लॅटफॉर्म डिसेबल करणे. त्याचबरोबर सोशल साइट्स व अॅप्सची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यापूर्वी नीट समजून घ्यावी. प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये असलेले अॅप्स काढून टाकावेत. ऑनलाइन खेळ (गेम) किंवा प्रश्नावली (क्विझ), सर्वेक्षण, तुम्ही भविष्यात कसे दिसाल, आता कुणासारखे दिसता, लॉटरी, बक्षीस मिळवा अशा पोस्ट्सला प्रतिक्रिया न देणे शहाणपणाचे. तुमच्या नावाने कुणी फेक अकाउंट तर उघडले नाही ना? हे वेळोवेळी तपासावे. आपला मोबाइल किंवा संगणक सांकेतिक चिन्हांनी सुरक्षित करावा, दुसऱ्याच्या ताब्यात देणे टाळावे. २०१९ पर्यंत मोबाइल फोन वापरणाऱ्यांचा आकडा जागतिक लोकसंख्येच्या ७०% पार करेल. चीनने संभाव्य धोका ओळखून पश्चिमेकडील तंत्रज्ञान वापरावर अंकुश घातला. ई-कॉमर्सपासून, सर्च-इंजिन, सोशल मीडिया, ब्लॉग्जपर्यंत जवळजवळ सर्वच लोकप्रिय तंत्रज्ञानाच्या ‘बैदु’, वुईचॅट’, ‘वायबो’, ‘बैदु तायबा’, ‘अलीबाबा’, ‘मैपेई’, ‘टोऊटोऊ युकू’ अशा स्व-आवृत्त्या विकसित केल्या. रोजगारनिर्मितीसह आपला आर्थिक स्तर उंचावला. तब्बल ५० कोटी नेटकऱ्यांसह भारत चीननंतरचा दुसरा मोठा वापरकर्ता देश आहे. ५३ कोटी स्मार्टफोन असलेली भारत ही जगातील सर्वात मोठी आणि मुक्त बाजारपेठ आहे. भारतात भरपूर विद्वत्ता (टॅलेंट) आहे. किंबहुना, जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यादेखील भारतीयांकडे असलेल्या विद्वत्तेच्या बळावर अधिराज्य गाजवत आहेत. भारताला क्राउड-सोर्स व ओपन-सोर्सच्या मदतीने भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वतःच्या सोशल मीडिया निर्मितीची मोठी संधी आहे. दूरदर्शी विचार करता, भारत सरकार व तंत्रज्ञांनी मिळून वेळीच देशाचे इंटरनेट-तंत्रज्ञानविषयक धोरण निश्चित करणे हिताचे ठरणार आहे. published url : https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-HDLN-sunil-khandbahale-write-about-social-media-5854140-NOR.html
Sidebar