आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला

मराठी दिन विशेष:- आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला – सुनील खांडबहाले

काळानुरूप सर्वंच गोष्टी बदलतात, मग त्याला भाषा अपवाद कशी असू शकेल? किंबहुना स्थलकालपरत्वे बदल करणे हेच अस्तित्वाचे द्योतक असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध होते. सुदैवाने आपली मायमराठी भाषा खूपच श्रीमंत आणि समृद्ध आहे. याचे कारणच तिच्या सहिष्णुतेत आहे. सर्व भाषा-संस्कृतींना ती आपलंसं करते. मराठी भाषेचे विशेष म्हणजे, ती जसं इतरांना स्वतःमध्ये सामावून घेते तशी ती स्वतःला देखील इतरांमध्ये सामावू देते. तंत्रज्ञानाबद्दलच बोलायचं झालं तर वितळलेलं लोखंड जसं मुशींत ओतावं आणि त्यानं मुशीचा आकार घ्यावा तसं काहीसं मराठी भाषा तंत्राळली आहें असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाहीं.

द डिजिटल इंडियन लँग्वेज रिपोर्टनुसार हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी भाषेचा वापर आंतरजाल युगात सर्वाधिक होताना दिसत आहें. अनेक ओटीटी व्यासपीठं, अमेझॉन बाजारपेठ, गुगल, फेसबुकसारख्या जाहिरात कंपन्यांना मराठी भाषेचा अंगीकार करणं यामुळेच क्रमप्राप्त झालं आहे. व्यावहारिक जगतात मराठी माणसाचा प्रामाणिकपणा विश्वसनीय आहेच. “माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके” या माउली ज्ञानेश्वर महाराजांच्या सत्वचनांनुसार मराठी भाषा मराठी भाषा लिपी, लिप्यांतर, टंकलेखन, शुद्धलेखन, नकाशे, आवाज-भाषण विश्लेषण तंत्रज्ञान याबरोबरच उत्तरोत्तर कृत्रिम बुद्धिमतेचा महत्वाचा दुवा ठरण्याची आशा आहें. गरज आहे ती, “मराठी भाषेच्या गुणवैशिष्ट्याचा मराठी माणसानेंहि अंगीकार करण्याची.” तसे घडल्यास उभयता जयजयकार निश्चित आहें.

Sidebar