How smart-health of smart cities could transform public healthcare

Imagine the world without hospitals. Digital sensors could scan your body,  communicate remotely with healthcare professionals who use massive health datasets to analyze and prescribe personalize medication and 3D printers then print a pill for you.. ते चित्र आता फार दूर नाही जेंव्हा भविष्यात संवेदी उपकरणे (सेन्सर्स) आपल्या कळत-नकळत आपले शरीर तपासतील (स्कॅन) आणि दूरवर असलेल्या आरोग्यतज्ञांशी स्वतःहून संवाद साधतील. मोठ्या प्रमाणात उपलब्ध डेटाचे काही क्षणांत विश्लेषण करून आरोग्यतज्ञ योग्य अशी वैयक्तिकृत (पर्सनलाईज्ड) औषधयोजना (प्रिस्क्रिप्शन) सुचवतील आणि थ्रीडी प्रिंटर लागलीच त्या गोळ्या आपल्यासाठी छापतील (प्रिंट). किमान मानवी हस्तक्षेपाशिवाय स्मार्ट हेल्थकेअर यंत्रणा २४ तास आपले कर्तव्य बजावत राहील. वैयक्तिक आरोग्य माहिती शेअर करणे खूपच संवेदनशील असले तरीही बदलत्या काळात उपलब्ध आरोग्यविषयक बिग-डेटा मुळे एकूणच मानवजातीला याचा फायदा होणे शक्य आहे. म्हणूनच स्थानिक तसेच जागतिक आरोग्य समस्यांचा गुंता लक्षात घेता आरोग्य क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यावर पुनःश्च विचार केला जात आहे. बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज व नागरिकांकडून वाढत असलेला एकूणच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा आरोग्यविषयक कंपन्या व सरकारे यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे. वर्ल्ड हेल्थ संस्थेनुसार जगभरात ४.३ दशलक्ष तर एकट्या भारतात सहा लक्ष डॉक्टरांची कमतरता आहे. वाढती जागतिक लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता मोबाईल हेल्थला भविष्यात अनन्यसाधारण महत्व असणार आहे. अतिशय कार्यक्षम व कमी खर्चिक अशा डिजिटल सेन्सर्सच्या मदतीने वातावरणातील बदल, शुद्धता, तापमान, ध्वनी, कंप, दबाव, पाणी गुणवत्ता, गती, प्रदुषण अशा विविध घटकांचा डेटा जमा करणे शक्य झाले आहे. आर्टिफिशियल इंटीलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग्जच्या मदतीने उपलब्ध महाकाय माहितीचे (बिग-डेटा) पृथक्करण करून दुषित पाणी किंवा अन्नविषबाधा या मागील स्रोत ओळखण्यासाठी विश्लेषण करता येऊ लागले आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अवकाशातून तुंबलेल्या पाण्याचे निरीक्षण करून रोगराई नियंत्रणात आणता येते. मोबाईल फोन डेटाचा वापर करून लोकांच्या गर्दीचा ओघ व त्यांच्या प्रवास सवयी याचा अभ्यास करून झिका सारखे जीवघेणे रोग आटोक्यात आणले जाऊ शकतात. शहरातील कोणत्या ठिकाणी कोणते रोग पसरत आहेत व काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी स्थानिक प्रशासने वैद्यकीय माहितीचा आधार घेत आहेत. प्राप्त माहिती सार्वजनिक करून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली जात आहे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत  संभाव्य अफवांनाही आळा बसतो व कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होते. आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी रुग्णालये आणि चिकित्सालयांत  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. उदाहरणार्थ प्रगत राष्ट्रांत ‘डिजिटल हेल्थ रेकॉर्ड’ च्या माध्यमातून नागरिकांना त्यांची आरोग्यविषयक प्रत्यक्षदर्शी (रिअल-टाइम) माहिती मिळते ज्यामुळे त्यांना योग्य त्या प्रतिबंधात्मक दक्षता घेणे शक्य होते. इंग्लंड मध्ये नाइटिंगेल हॉस्पिटल येथे मूळ रचना प्रक्रियेतच रुग्ण अभिप्राय आणि ज्ञानेंद्रियांविषयी अभ्यास समाविष्ट करून घेण्यात आला आहे ज्यामुळे रुग्ण आणि कर्मचारी यांच्यात एक आश्वासक व उपचारात्मक वातावरण निर्माण होते. व्यक्तीच्या अश्रुंचे विश्लेषण करून शरीरातील ग्लुकोज पातळी मोजणारे गुगल स्मार्ट ग्लास तंत्रज्ञान, ऑर्गन-ऑन-चिप, वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड, स्पर्शविरहित तापमापक अशी नवनवीन उत्पादने भविष्यातील आरोग्यव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकणारी असतील. सॅन फ्रान्सिस्को शहरात ‘गरम असुरक्षा निर्देशांक’ अर्थात ‘हिट व्हल्नरेबिलिटी इंडेक्स’ प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हवामानातील बदल वाढत्या तापमानास कारणीभूत ठरतात आणि उष्माघातामुळे आजार आणि मृत्यूच्या शक्यता वाढतात. यामुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपग्रह प्रतिमा, तापमान आणि लोकसंख्याशास्त्र यांचा अभ्यास करून संवेदनशील भागात, रहिवासी आणि सार्वजनिक आरोग्य कर्मचारी यांच्यात सुसंवाद स्थापित करण्याचे तंत्र विकसित केले आहे. नॉर्वे येथील ओस्लो शहरात जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी सेन्सर्स व स्काईप व्हिडीओचा वापर केला जात आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना त्यांच्याच घरात आरोग्यविषयक सुविधा मिळणे शक्य झाल्याने तेथील सरकारचा नर्सिंग होमवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला आहे. डायरिया, मलेरिया, निमोनिया सारख्या आजारामुळे दर वर्षाला जगभर पाच वर्षे वयाखालील साधारणतः सात दशलक्ष मुले मृत्युमुखी पडतात. यावर उपाय म्हणून अमेरिकेतील बोस्टन हॉस्पिटलने जगातील पहिला इंटरनेट आधारित ‘ओपन पेडिआयट्रीक’ उपक्रम सुरु केला आहे ज्यामध्ये कुणालाही मागणीनुसार जीवनदायी वैद्यकीय शिक्षण देऊ केले जाते. स्वतः:च्या शरीराविषयी असलेला न्यूनगंड कमी व्हावा व सकारात्मक स्वाभिमान वाढीस लागावा यासाठी न्यूयॉर्क शहराने ट्विटर, युट्युब, फेसबुक सारख्या सोशिअल मीडियाचा प्रभावी वापर करत ‘न्यूयार्क गर्ल’ नावाचा उपक्रम चालू केला आहे. त्यासोबतच आरोग्यविषयक कार्यशाळा सुरु करून नागरिकांचे स्वास्थ टिकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुबई शहरात आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षाला तेरा टक्क्यांनी वाढ होत असून वर्ष २०२१ पर्यंत दुबई शहरात १.३ दशलक्ष मेडिकल प्रवासी अपेक्षित असल्याने मेडिकल टुरिझम मध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. इतर देशांच्या मानाने भारत देशात कमी खर्चात उत्तम आरोग्यसुविधा मिळत असल्याने जगभरातील लोक आपल्याकडे देखील मेडिकल टुरिझम व्यवसायात मोठी उलाढाल होताना दिसत आहे. स्मार्ट शहरे ही स्वस्थ असली पाहिजे. त्यासाठी एकात्मिक (इकोसिस्टम) सार्वजनिक आरोग्यवस्थेचा विचार व्हायला हवा. शहरात नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी निसर्गरम्य उद्याने, व्यायामासाठी खुल्या व्यायामशाळा, खेळासाठी प्रशस्त मैदाने, योगा व ध्यान केंद्रे, पायी तसेच सायकल चालवण्याची संस्कृती नागरिकांमध्ये रुजावी यासाठी विशेष पादचारी व सायकल पथ, विना कार प्रदेश (नो कार झोन), फुलांनी व झाडांनी गजबजलेले रस्ते, स्वच्छ-सुंदर वसाहती, शुद्ध पिण्याचे पाणी व जागोजागी कचरापेट्या व स्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहे या सर्वानाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तीव्र स्वरुपाच्या आजारांचे व्यवस्थापन (क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट), रुग्ण मुलाखत नोंदणी, रुग्ण सेवा पाठपुरावा, प्रतिबंधात्मक आरोग्य, टेलिमेडिसिन आणि दूरस्थ आरोग्य (रिमोट हेल्थ), लसीकरण, रक्तपेढी व्यवस्थापन, माता-बालक माहिती, आणीबाणी पॅनिक बटन, सर्वकाळ तत्पर रुग्णवाहिका, मध्यवर्ती रुग्ण डेटा आणि वैद्यकीय उपकरणे व औषध निर्मिती कंपन्या तसेच आरोग्य तज्ञ व वैद्यकीय व्यावसायिक या सर्वांचेच परस्पर सहकार्य व सुसंवाद अपेक्षित आहे. या अनुशंघाने आरोग्य डेटा, आरोग्य विश्लेषण, रुग्णांसाठी स्मार्टकार्ड, गेमिफिकेशन तसेच मेडिकल टुरिझम अर्थात आरोग्य पर्यटन क्षेत्रात मोठ्या ववसायिक संधी देशातील तरुण, उद्योजक व व्यावसायिकांना खुणावत आहे.

Published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=11032017009012 Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/how-smart-health-of-smart-cities-could-transform-public-healthcare/
Sidebar