Community Solar Systems for smart-energy cities

Half of the world population lives in cities and by 2050, it will rise to three quarter. Did you know the fact that 75% of the total energy is consumed by cities only, adding 80% of the global carbon emission? While rapid urbanization, future demands technology based social innovations in the energy segment. कल्पना करा की शहरातील उद्याने, खेळांची मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते, पाण्याचे तलाव,  कालवे-पाट (कॅनॉल), नदी, धरणे अशा सार्वजनिक जागांवर सौर फलक (सोलर पॅनल) चे उंच छत लावले गेले तर? त्यामुळे उद्यान-मैदानांवर थंड सावली तर मिळेलच, रस्त्यांवरून जाताना गार हवा तर मिळेलच, सूर्याच्या प्रकाशापासून पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण तर होईलच पण घर-वापरासाठी वीज देखील मिळाली तर? ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार विश्वातील एकूण उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते. म्हणूनच, वाढती लोकसंख्या व शहरीकरणाबरोबरच आपल्याला दरडोई ऊर्जा वापर कमी करण्याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत. सूर्य हा अनादी काळापासून ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे. ऊर्जेचे इतर स्रोत तोकडे पडत असताना, सोलर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सूर्यकिरणांच्या आधारे सौर-ऊर्जा निर्मिती यशस्वी ठरत आहे. परंतु सौरऊर्जा अजूनही प्रचंड महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच शहरी भागात जागेची कमतरता असते व अनेकदा खाजगी जागेवर यंत्रणा उभी करण्यास अडचणी येतात. यावर नामी उपाय म्हणजे ‘कम्युनिटी सोलर सिस्टम’ अर्थात समुदाय सौर ऊर्जा व्यवस्था. यालाच अनेकदा सौर-उद्यान (सोलर-गार्डन) किंवा सौर-शेत (सोलर-फार्म)  असेही म्हणतात ज्यामध्ये सरकारी अथवा खाजगी मिळकतीवर निर्माण केलेल्या सौरऊर्जेचा एकापेक्षा अधिक घरे सहकारी पद्धतीने वापर करतात. उपक्रमासाठी लागणारी जागा ही समुदायातील लोकांच्या मालकीची असणे बिलकुल गरजेचे नाही हा महत्वाचा मुद्दा. एखाद्या छोट्या आकाराच्या जागेत उभा केलेला सौरऊर्जा उपक्रम हा त्या त्या समुदायाच्या मालकीचा असू शकतो किंवा पूर्णपणे खाजगी देखील असू शकतो. व्हर्चुअल नेट मीटरिंगच्या वापरामुळे, उपक्रमातून निर्माण झालेल्या एकूण ऊर्जेच्या समप्रमाणात समुदायातील प्रत्येक सभासदास वीजबिलात पैशांची बचत होते. कम्युनिटी सोलर ही नवीन संकल्पना असल्याने त्याकडे जगभर एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून बघितले जात आहे. यामध्ये स्वतःच्या घरावर एकसुद्धा सौरपॅनल न लावता जगातील कोणत्याही उपक्रमात ऑनलाईन गुंतवणूक शक्य आहे. त्यामुळे आभासी जगात (व्हर्चुअल वर्ल्ड) कम्युनिटी सोलर गुंतवणुकीसाठी अधिक लोकप्रिय होत आहे. माहिती व तंत्रज्ञान क्रांतीमुळे येत्या काळात मानव वैयक्तिक तसेच सामूहिक वापरासाठी ऊर्जा निर्मितीसह सानुकूल व नियंत्रित ऊर्जा वापर (कस्टमाईझ्ड अँड कंट्रोल्ड एनर्जी कन्झमशन) साठी प्रयत्नशील आहे. अमेरिकास्थित मोझाईक नावाची कंपनी अशा प्रकारच्या कम्युनिटी सोलर उपक्रमांत गुंतवूणक करण्याची सुविधा पुरवते. अधिकाधिक लोकवस्तींनी कम्युनिटी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी सौर प्रकल्पांतील गुंतवूणकांवर करसवलतीसंह नागरिकांसाठी एकूण प्रक्रिया सोपी करत जगभरातील सरकारं प्रोत्साहन देत आहेत. फ्लोरिडा राज्यातील डेन्व्हर येथे किटसन आणि पार्टनर कंपनीने वर्ष २००६ मध्ये अमेरिकन सरकार, पर्यावरणवादी व आयबीएम तंत्रज्ञान कंपनीसोबत एकत्र येऊन तब्ब्ल एक्याण्णव हजार एकरांवर तयार केलेला बॅबकॉक रँच नावाचा अमेरिकेतील पहिला अद्ययावत कम्युनिटी सोलर उपक्रम उभा केला. साधारणतः पन्नास हजार लोकवस्तीसाठी पूर्णपणे अक्षय ऊर्जेच्या स्वरूपात सौर ऊर्जा पुरविण्याचा मानस असून नवीन स्थापित केलेल्या शहरात अनेक पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला गेला आहे. अमेरिकेत वुई-सन-अलायन्स, मायक्रोग्रीड आणि क्लीन-कोईलन्स सारख्या कंपन्या कनेक्टिकट, मॅसॅचूसेट्स, न्यूजर्सी आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांत कार्बन उत्सर्जन कमी करून अक्षय (रिन्यूएबल) ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. मेरीलँड येथील युनिव्हर्सिटी पार्क कम्युनिटी सोलर उपक्रम, कोलोरॅडो येथील क्लीन-एनर्जी-कलेक्टिव्ह, वॉशिंग्टन येथील बेनब्रिज आयलंडवरील सकाई सोलर, कॅलिफोर्नियाचे सोलरशेअर, फ्लोरिडाचे ऑर्लॅंडो यूटिलिटीज कमिशन, व्हरमॉंट तसेच उटाह चे  सोलर उपक्रम अशी कम्युनिटी सौरऊर्जेची अनेक यशस्वी उदाहरणं आहेत. आजमितीला जगभरातील पन्नास टक्के लोकसंख्या ही शहरांमध्ये रहात असून वर्ष २०५० पर्यंत ही आकडेवारी पंचाहत्तर टक्क्यांवर जाणार आहे. एकूण ऊर्जेच्या पंचाहत्तर टक्के ऊर्जा शहरांसाठी खर्च होते तर ऐंशी टक्के कार्बनडायॉकसाईड उत्सर्जन हे फक्त शहरांमधून होत असते. त्यामुळेच जगभर शहरांसाठीचे पर्यावरणविषयक धोरण हे केंद्रस्थानी आहे. यामध्ये इमारती आणि वाहतूक व्यवस्था यांना सर्वाधिक ऊर्जा लागत असल्याने त्यांचा अग्रक्रमाने विचार करण्यात आला असून त्यांनतर स्मार्ट-ग्रीडसह एकात्मिक (इंटिग्रेटेड) शहरी ऊर्जा व्यवस्था यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. पथदर्शक, सूचक दिवे (सिग्नल्स), वाहनं यांसह जिथे-जिथे शक्य तिथे वाहतूक व्यवस्थेत सौर ऊर्जेचा वापर क्रमप्राप्त आहे. भारतात वर्ष २०४० पर्यंत पंचाहत्तर टक्के नवीन इमारतींचे निर्माण शहरी भागात होणार आहे त्यामुळे हे नव्याने होणारे बांधकाम व वसाहती ऊर्जा-कार्यक्षम (एनर्जी-इफिसिएंट) बनविण्यासाठी पुरेसा वाव आहे. इमारतींमध्ये वापरली जाणारी ऊर्जा मुख्यत्वे थंड (कुलिंग), उष्ण(हिटिंग), स्वयंपाक(कुकिंग) व उपकरणांसाठी वापरली जाते ज्यासाठी सूर्य, वारा यासारख्या अक्षय-ऊर्जा स्रोतांचा वापर सहज शक्य आहे. देशातील नवतरुण व उद्योजकांनी याकडे व्यावसायिक संधी म्हणून बघितल्यास यॊग्य तंत्रज्ञान व संशोधनाच्या आधारे अक्षय ऊर्जा निर्मिती खर्च निश्चित कमी होऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासह योग्य सरकारी धोरणं राबविल्यास शहरं खऱ्या अर्थानं एनर्जी-स्मार्ट होतील.
Published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=18022017009006# Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/community-solar-systems-for-smart-energy-cities
Sidebar