IoT is the key element of smart city framework

Do your remember movies “Toy Story” or “Cars” by Disney? It is no more fiction while physical things are talking to each other like human beings. Internet of things (IoT) investment is forecasted to grow up to 6 trillion by 2020 connecting over 34 billion devices to the Internet. वाल्ट डिजने कंपनी निर्मित ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळण्या व गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असच काहीसं प्रत्यक्षात आहे जिथे झाडे, प्राणी, मानव, शहरातील इमारती, रस्ते, हवा, पाणी, गाड्या एकमेकांशी संवाद साधू शकतात. वाटते ना गंमत? पण तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे शक्य झालंय. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यात स्वतंत्र ओळख (आयडी) असलेली यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल उपकरणे आंतरजालाद्वारे (नेटवर्क) एकमेकांना जोडलेली असतात व इंटरनेटमार्फत मानवाच्या हस्तक्षेपाशिवाय एकमेकांसोबत प्रत्यक्षदर्शी (रिअल-टाइम) माहितीचे आदानप्रदान करू शकतात. एमआयटी शास्त्रज्ञ केव्हिन अष्टोन यांनी १९९९ मध्ये प्रथमतः इंटरनेट ऑफ थिंग्ज ची संकल्पना मांडली. त्यांच्या मते तत्कालीन उपलब्ध तंत्रज्ञानानुसार संगणकाला पूर्णतः मानवाने पुरविलेल्या टाइपिंग, आवाज अथवा स्कॅन स्वरूपातील माहितीवरच अवलंबून रहावे लागत होते परंतु भविष्यात इंटरनेटक्रांतीमुळे व मायक्रो-सेन्सर्सच्या प्रगतीमुळे संगणकाला माहितीसाठी मानवाची आवश्यकता भासणार नाही तर उलटपक्षी संगणकच आपापसात माहितीचे आदानप्रदान करून मानवी जीवन सुसह्य करतील. भौतिक जग, संगणक व इंटरनेट यांची एकत्रित प्रणाली मानवाच्या कमीत कमी सहभागाशिवाय बिनचूक व अधिक कार्यक्षम यंत्रणा उभारू शकते. इंटरनेट ऑफ थिंग्ज सध्या अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये प्रभावी ठरत आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन मोठे आव्हान आहे ते म्हणजे संपूर्ण प्रणाली म्हणून एकापेक्षा अधिक घटकांसोबत एकत्रित सुसंवाद साधण्याचे. उदाहरणार्थ वाहतूक यंत्रणेकडून उपलब्ध माहिती आरोग्य यंत्रणा कशी वापरू शकते. वातावरणातील चढउतार नागरी सेवांमध्ये कसे बदल घडवू शकतात इ. एकूणच काय तर वाहतूक, आरोग्य, पर्यावरण, सेवा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा अशा विविध यंत्रणा आपापसात जोडल्या जाऊन एकात्मिक परिणामासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आता तंत्रज्ञ प्रयत्नशील आहेत. मँचेस्टर येथे सिटिव्हर्व उपक्रमांतर्गत स्मार्ट बसथांबे (बसस्टॉप्स) बसविण्यात आले आहेत जिथे प्रवासी प्रतीक्षा करत असल्यास बसचालकाला तात्काळ माहिती मिळते तसेच बसथांब्यावरील स्वयंचलित दिवे फक्त प्रवासी असतानाच गरजेनुसार चालू-बंद होतात. आंतरजाल (मेश नेटवर्क) तंत्रज्ञानाचा वापर करून व्हेनिअम नावाची पोर्तुगीज कंपनी शहरातील सर्व वाहनांचे रूपांतर वायफाय हॉटस्पॉट मध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पोर्टो हे जगातील पहिले असे शहर आहे जिथे घन-कचरा जमा करणाऱ्या गाड्या तसेच बसगाड्यांचा वापर करून फिरते इंटरनेट (इंटरनेट ऑफ मूव्हिंग थिंग्ज) पुरवले जाते. फिनिश स्टार्टअप इनेवो शहरातील कचरापेट्यांवर सेन्सर्सचा वापर करून त्या किती भरल्या आहेत किंवा कसे याची प्रत्यक्षदर्शी माहिती कचरा गोळा करणाऱ्या  व कचरा-प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना पुरवते त्यामुळे एकूण कार्यक्षमता वाढल्याचे लक्षात आले आहे. बार्सिलोनास्थित ऊरबायोटिका नामक कंपनी शहरातील वाहनतळ व्यवस्था (पार्किंग) कार्यक्षम बनविण्यासाठी सेन्सर्सचा प्रभावी वापर करत आहे. बिनतारी (वायरलेस) सेन्सर्सद्वारे वाहतुकीची प्रत्यक्षदर्शी माहिती वाहनचालकांना पुरविल्यामुळे शहरातील वाहतूक गर्दीची समस्या दहा टक्क्यांनी खाली आणण्यात यश मिळाले आहे. टीझेडओए कंपनीने शहरातील हवेतील प्रदूषण, तापमान, आद्रता, हवेचा दाब, प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांची तीव्रता मोजण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विचार करा की आपल्या अनुपस्थितीत आपली सायकल एखाद्याला वापरायला द्यायची आहे. परंतु कुलुप खोलण्यासाठी चावी कशी पाठवायची? अशावेळी चावीच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीशिवाय पर्यायच नसतो. हल्ली चावी-विरहित कुलुपांनी काही प्रमाणात ही समस्या सोडवली आहे. परंतु त्या प्रक्रियेतदेखील सांकेतिक शब्द (पासवर्ड) समोरच्या बरोबर शेअर करावा लागतो. यावर उपाय म्हणून बिटलॉक कंपनीने मोबाईल ऍपच्या माध्यमातून चावी शेअर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे त्यामुळे आपण जगात कुठेही असलो तरी फक्त मोबाईलने सायकलचे कुलूप उघडता येते व सुरक्षितपणे सायकल शेअर करता येते. हेच तंत्रज्ञान गाडी, घर अशा गोष्टी शेअर करण्यासाठी वापरण्यात आले तर? ब्रिस्टल येथील सिटीझन सेन्सिंग उपग्रामांतर्गत फुटबॉल सारख्या उत्पादनांमध्ये सेन्सर्सचा वापर करून नागरिकांच्या गरजा समजावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. क्रीडा क्षेत्रात आयओटी आधारित क्रिकेट बॅट, टेनिस रॅकेट चा वापर करून खेळाडू स्वतःच्या खेळाचे विश्लेषण करू शकतो व आपली कामगिरी सुधारू शकतो. इंग्लंड मध्ये ऑक्सफोर्ड येथे फ्लड नेटवर्क कंपनी पूरसदृश्य काळात विविध ठिकाणांहून पाण्याच्या पातळीची प्रत्यक्षदर्शी माहिती यंत्रणेला पुरवते त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थेला तसेच पर्यावरण कंपन्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी माहितीचा उपयोग होतो. गतिमान जीवनशैलीमुळे प्रत्यक्षदर्शी माहितीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच मानवी जीवनाचा अंगभूत हिस्सा असलेल्या भौतिक वस्तूंचाही आपापसात सुसंवाद हा प्रत्यक्षदर्शी व अव्यहात (अनइंटरपटेड) होणे आवश्यक आहे. भविष्यात यंत्र यंत्रांना शिकवतील, पूर्वचाचण्या, पडताळा, संशोधन व त्रुटी सुधारण्यात वेळ न घालवता एकमेकांस जोडलेल्या उपकरणांमुळे परिस्थितीनुसार व्यवस्थेची निर्णयक्षमता अधिक अचुक होईल. जभरातील कंपन्या दाताच्या ब्रशपासून तर विमानापर्यंत इंटरनेट-योग्य (इंटरनेट-एनेबल्ड) उप्तादनांची निर्मिती करण्यात दंग आहेत. फक्त स्मार्टफोन वर घरातील सर्व उपकरणं नियंत्रित करता येतील असे स्वतःचे होमकिट अँपल कंपनीने तयार केले आहे. सॅमसंगचे स्मार्टथिंग्ज तर मायक्रोसॉफ्ट ने विंडोज आयओटी कोअर १० अशी संगणक प्रणालीच विकसित केली आहे. गोपनीयता व सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच इनरनेट पायाभूत संरचना निर्मितीत मोठी गुंतवणूक केली जात आहे. अनेक देशांची सरकारे व स्थानिक प्रशासनं शहर विकासाच्या धोरणात अनेक यंत्रणा आयओटीचा प्राधान्याने अंतर्भाव करत आहेत. स्मार्ट शहरांच्या विकासात इंटरनेट ऑफ थिंग्ज ची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भविष्यात आयओटीमुळे शहरी जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. मानवी शरीर, प्राणी तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य व औषधनिर्मिती क्षेत्रात भविष्यात मोठी प्रगती होऊ घातली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) नुसार वर्ष २०२० पर्यंत इंटरनेट ऑफ थिंग्ज क्षेत्रात १.७ ट्रिलियन डॉलर्स ची उलाढाल अपेक्षित आहे. अर्थात एवढी मोठी व्यवसाय संधी जगभरातील नवउद्योजक व व्यावसायिकांना भुरळ न घालेल तर नवलच!

Published url at Maharashtra Times : http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=25022017011021# Or read at : http://sunilsunilkhandbahale.com/iot-is-key-element-of-smart-city-framework
Sidebar