‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित

संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ ‘संस्कृती भारती’ हा जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटरनेट- रेडिओ जागतिक संस्कृतदिनी अॉनलाइन प्रसारित करण्यात आला. भाषा शब्दकोषांचे संशोधक नाशिकचे भूमिपुत्र सुनील खांडबहाले यांच्या खांडबहाले डॉटकॉमने त्याची निर्मिती केली आहे. हा कम्युनिटी रेडिओ असल्याने आगामी काळात तज्ञांच्या सहाय्याने त्यावर संवादात्मक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे.

 

‘श्रवण’ हे भाषा शिकण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना आहे. पण सोयीनुसार अन् पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल, असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच खांडबहाले डॉटकॉम या तंत्रज्ञान-विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ २४ तास व सातही दिवस सुरू राहिल असा ‘संस्कृत-इंटरनेट-रेडिओ’ ‘जागतिक-संस्कृत-दिना’च्या औचित्याने संस्कृतप्रेमींसाठी गुरुवारी (दि. १५) अॉनलाइन प्रसारित केला.

सुनील खांडबहाले यांनी सांगितले की, मी संस्कृत भारतीचा विद्यार्थी आहे. संस्कृत भाषेचे अध्ययन करत असताना संस्कृत भाषा कानावर पडत होती. परंतु वर्गाबाहेर पडले की संस्कृत-श्रवण दुर्मिळ होते. संस्कृत स्तोत्र, श्लोक, गीते अनेक वेबसाइट्सवर अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु व्यावहारिक जीवनाशी संबंध सांगता येईल असे संवादात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन-संकलित करणे आणि २४ तास अव्याहत श्रवण करता येऊ शकेल इतके सुसह्य करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे खरं तर स्वतःसाठी संस्कृत-संभाषण शिकण्याचे साधन म्हणून मी इंटरनेट रेडिओ डिझाइन केला. पुढे अनेकांच्या आग्रहास्तव आणि सहभागातून ‘संस्कृत भारती’ या नावाने संस्कृत इंटरनेट रेडिओला मूर्त रूप दिले.

इंटरनेटवरील पहिला कम्युनिटी रेडिओ जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा इंटेरनेटवर हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा अॅप डाउनलोड किंवा इन्स्टाॅल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता-करता स्मार्टफाेन, टॅबलेट तसेच संगणकावर संस्कृत इंटरनेट रेडिओ श्रवणाची सुविधा आहे. नजीकच्या काळात सर्वसमावेशक व दर्जेदार कार्यक्रम निर्मितीसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी आपले योगदान देऊ शकतील. अभिव्यक्त होऊ शकतील, अशी योजना असल्याचे सुनील खांडबहाले यांनी सांगितले.

मनोरंजनातून अभ्यास विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषण (जसे शिक्षक-विद्यार्थी, पालक-पाल्य, मित्र, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग-संवाद), विषयवार धडे, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तू-संबंध, लघुकथा-बोधकथा, गीते, कविता, सुभाषिते असा मनोरंजनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. संकेतस्थळावर उपलब्ध www.khandbahale.com/sanskrit किंवा https://tinyurl.com/sanskritradio या संकेतस्थळावर संस्कृत रेडिओ ऐकण्यासाठी विनाशुल्क उपलब्ध आहे.

संस्कृत भाषा संवादासाठी रेडिओ संस्कृत भारतीची निर्मिती संस्कृत भाषेतील संवादासाठी खेडोपाडी पोहाेचलेला अन् संवादाचं उत्तम माध्यम असलेला ‘रेडिओ संस्कृत भारती’ हा कम्युनिटी रेडिओ सुरू केला. वर्षभरापासून त्यावर काम करत होतो. १५० देशातील १५ कोटी लोक वापरत असलेल्या ‘खांडबहाले डॉट काॅमच्या’च ब्रॉडकास्टिंग सर्व्हरवरच तो सुरू केला आहे. ब्राउसिंग बेस असल्याने इंटरनेटशिवाय त्याला इतर रेडिओ चॅनेल किंवा एफएमसारखा खर्च नाही. शिवाय इंटरनेटने डेटा सर्वत्र सहज उपलब्ध असल्याने घरात महिला स्वयंपाक करताना किंवा मुलेही अभ्यास, खेळताना रेडिओ सुरू असल्यास संस्कृतचे शब्द आणि संवाद त्यांच्या कानावर पडतील. मनोरंजनातून आद्य भाषेचा अभ्यास न कळत होईल. आगामी काळात खूप प्रतिसाद मिळेल. – सुनील खांडबहाले, संस्थापक, खांडबहाले डॉट काॅम

News link :

https://divyamarathi.bhaskar.com/news/sanskrit-bharti-is-the-worlds-first-sanskrit-internet-radio-broadcast-1566017205.html

Sidebar