जगाला दिशा देण्याची जबाबदारी भारतीय युवकांची, कोऽहम् पुस्तकाचे प्रकाशन – डॉ. विजय भटकर

महिरावणी गावात संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिरातील विद्याथ्यांशी डॉ. विजय भटकर यांची हितगुज

तुम्ही भारतीय ‘परम’ संगणक कसा निर्माण केला? पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले का? अडचणी आल्या? खर्च किती आला? किती कालावधी लागला? टीम कशी तयार केली? ‘परम’ संगणकाच्या निर्मितीवर अमेरिकेची काय प्रतिक्रिया होती? भविष्यातील संगणक कसा असेल? एलियन्स आहेत का? देव असतो का? भूतें असतात का? तुम्ही वैज्ञानिक असून तुम्हाला अध्यात्मिक आवड कशी लागली? स्वतःची आंतरिक प्रेरणा कशी जागृत करावी? असे एक ना अनेक कुतूहलपूरक प्रश्न विद्यार्थ्यानी भारतीय ‘परम’ या सुपर-कम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर सर यांना विचारले. त्याला अतिशय सविस्तर उत्तर देत भटकर सरांनी शिबिरार्थी विद्याथ्यांशी हितगुज केली. निमित्त होते महिरावणी गावात खांडबहाले कुटुंबियांच्या निवासस्थानी संपन्न होत असलेल्या संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिराचे. 

ज्ञानयोगी गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे, आळंदी (देवाची) व निष्काम कर्मयोगी श्री शिवराम महाराज म्हसकर, पिंपळद (घोलपाचे) यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये नाशिक येथील महिरावणी गावात संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिर ‘ग्लोबल प्रोस्पेरिटी फाउंडेशन’ च्या वतीने आयोजित केले जाते. या शिबिरामध्ये परिसरातील दहा  ते एकवीस वयोगटातील विद्यार्थ्यांना योगासन-प्राणायाम, बोधकथा, स्तोत्र, श्रीमदभगवद्गीता, वारकरी पारंपारिक चालीतील अभंग, भूपाळ्या व गौळणी, संस्कृत-संभाषण, शास्त्रीय संगीतातील अलंकार, टाळ, ठेका, संवादिनी, मृदंग व संगणक-शिक्षण दिले जाते. विद्यार्थीच सर्वांची आवड-निवड लक्षात घेऊन आपला अभ्यासक्रम व दिनचर्या ठरवितात, विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवितात. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सर्व कामे वाटून घेतात आणि जबाबदाऱ्या पार पाडतात. इथे शिक्षकांना पगार नाही व विद्यार्थ्यांना फी नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शारीरिक व सांस्कृतिक शिक्षणासोबतच शिबिरार्थींचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, आधुनिक तंत्रज्ञांची योग्य ती ओळख व उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही उत्स्फूर्तपणे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, योगदान देतात. मंगळवार, दिनांक २८ मे २०२४ रोजी शिबिराच्या सांगता कार्यक्रमासाठी थोरशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्याने मुले आनंदाने उड्याच मारू लागली. ज्यांना आजवर केवळ पुस्तकात किंवा टीव्हीवरच बघितले होते, त्यांना प्रत्यक्ष पाहण्या-ऐकण्याची संधी मिळणार म्हणून मोठया संख्येने शिबिरार्थी व पालक उपस्थित होते. जेंव्हा अमेरिकेने भारताला कम्प्युटर देण्यास नकार दिला त्यावेळी भटकर सरांनी भारतासाठी स्वतःचा कम्प्युटर बनविण्याचा निर्णय घेतला आणि आपले स्वप्न सत्यात उतरविले. त्यांच्या संशोधनामुळेच आज आपल्या देशाने संगणक, स्वाफ्टवेअर, आयटी क्षेत्रात प्रगती केली, त्यांच्यामुळेच आज आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. रंगीत दूरदर्शन, एज्युकेशन टू होम, ब्रॉडबँड अशा अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचे जनक यांचे विचार किती थोर आहेत पण त्यांची राहणी किती साधी आहे याचा अनुभव प्रत्येकाच्याच ओठावर होता. सर देखील मुलांच्या कुतुहलामध्ये रमून मुलांसारखेच झाले. सकाळपासून मुलांमध्ये रमलेले सर दुपारच्या जेवणाचीही वेळ विसरून गेले. विद्यार्थीही सरांना बिलगून होते आणि सरांचाही पाय शिबिरातून निघत नव्हता. सरांच्या सहवासाने मंत्रमुग्ध झालेली ती सकाळ, मंतरलेले ते क्षण विद्यार्थी आपल्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. भविष्यात तंत्रज्ञान खूप विकसित होईल, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवास आव्हान ठरेल, अशावेळी मानवाने उत्तम शिक्षणासोबतच सुसंस्कारित होऊन आपली सद्सदबुद्धी, विवेक जागृत ठेवणे आवश्यक असेल आणि मानवी मुल्यांवर आधारित असलेल्या इंडियन क्नॉलेज सिस्टमच्या प्रार्श्वभूमीवर, उद्याच्या जगाला दिशा देण्याचे उत्तरदायित्व भारतीय युवकांवर आहे असे उद्गार डॉ. विजय भटकर यांनी काढले. त्यासाठी आपण नेमके कोण आहोत? आपल्या जीवनाचे नेमके प्रयोजन काय? आपण अर्थपूर्ण जीवन कसे जगू शकतो? स्वतःचे व इतरांचे जीवन सुखमय कसे करू शकतो? या आणि अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा समग्र विचार सर्वानी करण्याचे आवाहन सरांनी केले. विद्यार्थी व पालक यांनी शिबिरातील विविध अनुभव कथन केले. शेवटी शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आणि ‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह, आयटीतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले, कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर सरांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह, आयटीतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले, कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर सरांच्या हस्ते करण्यात आले

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल. असा विश्वास थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी प्रकाशन करताना व्यक्त केला. नाशिकचे सुपुत्र, आयटी तज्ज्ञ संशोधक व भारतीय २२ राजभाषांचे डिजिटल शब्दकोशकार सुनील खांडबहाले यांनी अमेरिकेच्या एम.आय.टी. या जगप्रसिद्ध विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांच्याकडे गुरुगृही राहून साधकावस्थेत अध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी डॉ. विजय भटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालत व त्याला तंत्रज्ञानाची जोड देत गुगल-मॅप्स प्रमाणे स्पिरिच्युऍलिटी-मॅप्स अर्थात अध्यात्मिक-नकाशे तयार केले. त्यातीलच एका मूलभूत विषयावर आधारित प्रत्येकास समजेल असे सोप्या शब्दांत, नकाशांसह कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हे पुस्तक लिहिले. संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिर या कार्यक्रमप्रसांगी महिरावणी येथे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सदर पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी भाषेतील प्रथम आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डब्ल्यूएनएसचे मुख्य प्रबंधक श्री. अरविंद कुलकर्णी, स्लाईडवेलचे मानवसंसाधन प्रबंधक श्री. अजय इप्पर, अनिसचे महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव डॉ. टी.आर. गोराणे, एमकेसीएलचे नाशिक विभाग प्रमुख श्री. सुभाष पाटील, मुख्याध्यापक श्री. भदाणे, मुख्याध्यापक श्री. वसंत सालगुडे, प्रतिष्टित शेतकरी श्री. दिगंबर ढगे, श्री. शांताराम चव्हाण, सुनील खांडबहाले व त्यांचे आई-वडील सौ मीराबाई व श्री. शिवाजी खांडबहाले आणि पंचक्रोशीतील गावकरी, पालक व शिबिरार्थी विद्यार्थी उपास्थित होते. 

Sidebar