डेटा-सायन्सचे नवीन क्षेत्र

विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’.

विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. कारण यंत्रणेने तसेच तेथील नागरिकांच्या उत्स्फूर्त योगदानातून, त्यांना सभोवतालच्या घडामोडींची तसेच मूलभूत सोयी-सुविधांची इत्थंभूत माहिती उपलब्ध केलेली असते. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’.

आज नळाला पाणी आलेच नाही, रेल्वे नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावतेय, शहर वाहतुकीचा मार्ग अचानक बदलला, रक्तपेढीत हव्या त्या रक्तगटाचे रक्त शिल्लक नाही, किरकोळ दुरुस्तीसाठी काही काळ वीजपुरवठा खंडित झाला, आज कार्यालयाला सुटी आहे, साहेब रजेवर आहेत, बँकेत रोकडच शिल्लक नाही अशा एक ना अनेक गोष्टी आपल्यासाठी नवीन नाहीत. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या आणि नाना वैविध्य असलेल्या देशात काही अडचणी आपणही समजू शकतो. परंतु कुठलीही पूर्वसूचना न मिळता अशा संकटांचा सामना करावा लागणे हे किती क्लेशदायक असते हे आपल्याला वेगळे सांगावयास नको. आपल्या गाव-शहरातील घडामोडी तसेच कधी-कुठे-काय नियोजित आहे याची अचूक माहिती मिळाल्यास नागरिकांचे जीवन सुखकर होण्यास मदत होते. विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. कारण यंत्रणेने तसेच तेथील नागरिकांच्या उत्स्फूर्त योगदानातून त्यांना सभोवतालच्या घडामोडींची तसेच मूलभूत सोयी-सुविधांची इत्थंभूत माहिती उपलब्ध केलेली असते. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’ अर्थात ‘मुक्त-आधारभूत माहिती-उपक्रम.’

‘ओपन-डेटा’ किंवा ‘मुक्त-आधारभूत माहिती’ म्हणजे अशी माहिती, जी सरकारी- निमसरकारी, सेवाभावी तसेच खासगी संस्थांद्वारे अधिकृत संकेतस्थळांवर नियमित प्रकाशित केली जाते आणि जी जनहितार्थ विनानिर्बंध सार्वजनिक केलेली असते. ‘ओपन-डेटा’चा मूळ उद्देश राष्ट्रीय संसाधनांचा इष्टतम उपयोग, आर्थिक अभिवृद्धी, लोकसेवेचा दर्जा, क्रयशीलता, आर्थिक मूल्य सुधारणे यांसोबतच सरकारी उत्तरदायित्व निर्माण करणे व नागरिक आणि प्रशासन यातील संवाद वाढवून सरकारी कामकाजात पारदर्शकता निर्माण करणे असा असतो. ज्याचा फायदा केवळ संस्था व नागरिक यांनाच नाही तर ‘डीप-डेटा-लर्निंग’ म्हणजे माहिती-आदानप्रदान प्रभावाचा सखोल अभ्यास करून नवनवीन लोककल्याणकारी योजना आखण्यासाठी खुद्द सरकारलाही होत असतो. आनंदाची गोष्ट म्हणजे आजमितीला जगभरातील निम्म्याहून अधिक देशांनी या खुल्या माहितीच्या धोरणाचा पुरस्कार केला आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सरकारदेखील यात अग्रेसर आहे. भारत सरकारद्वारा https://data.gov.in या अधिकृत संकेतस्थळामार्फत केंद्र सरकारच्या १०३ विभागांच्या सुमारे पन्नास हजार संसाधनांच्या चार हजारहून अधिक विषयसूची अहवाल उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. या उपलब्ध माहितीवर आधारित देशातील अनेक तरुण स्वतःच्या स्टार्टअप्स सुरू करत आहेत.

सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना ‘विस्डम ऑफ क्राउड’चे महत्त्व समजले आहे. ‘विस्डम ऑफ क्राउड’ म्हणजेच ‘जनशक्तीचे एकत्रित ज्ञान’ अर्थात जटिल समस्यांच्या निराकरणाचा प्रयत्न एकट्यादुकट्या व्यक्तीने, संस्थेने अथवा समुदायाने करण्यापेक्षा व्यक्तिगत स्वरूपात जगभर विखुरलेले जे ज्ञान व कौशल्य आहे यांच्या एकत्र प्रयत्नाने सर्वसमावेशक असे प्रभावी उत्तर शोधण्यावर अनेक देश सध्या भर देत आहेत. विविध वाहतूक मार्गांवरील वाहनांच्या गर्दीची प्रत्यक्षदर्शी स्थिती कळावी यासाठी लोकसहभागातून तयार झालेले ‘वेज’ नावाचे अॅप, नकाशांसाठी प्रसिद्ध गुगल मॅप्स, मुक्त व मोफत ज्ञानकोश म्हणजे विकिपीडिया, संगणक प्रणाली लिनक्स, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउजर, जगप्रसिद्ध खेळण्यांची कंपनी लेगो, एअरबी अँड बी अशा यशस्वी क्राउड-सोर्स्ड उदाहरणांतून प्रभावित होत ‘ओपन-डेटा’ धोरण पक्के होत गेले. प्रगत राष्ट्रांमध्ये ‘ओपन-डेटा’ व ‘विस्डम ऑफ क्राउड’च्या माध्यमातून सामाजिक संशोधन व समाजोपयोगी तंत्रज्ञान निर्मितीस बळ मिळत आहे. त्यामुळे डेटा-विश्लेषण, डेटा सादरीकरण, डेटा-पत्रकारिता ही क्षेत्रे वाढीस लागत आहे. तेथील प्रशासन डेटा-एपीआय अर्थात माहिती-संवाद-यंत्रणा देऊ करत नागरिकांच्या सहभागातून स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या उपाययोजना करत आहेत. उपलब्ध माहितीच्या आधारे देशातील तरुण विद्यार्थी, तंत्रज्ञ व उद्योजक दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी ‘डेटा-ड्रिव्हन-टेकनॉलॉजी-सोल्युशन्स’ अर्थात, माहिती आधारित तंत्रज्ञान सुविधा निर्माण करत आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमधून विविध कार्यशाळा (हॅकेथॉन), शिबिरे, चर्चासत्रे व परिषदा आयोजित केल्या जातात. बदलते वातावरण, वाढते तापमान, शिक्षण आणि आरोग्य, असमानता, गरिबी, वाढता भ्रष्टाचार व बेरोजगारी यांसारख्या जागतिक प्रश्नांसाठी अनेक देश आपली माहिती व आकडेवारी जनहितार्थ प्रसारित व सार्वजनिक करत आहेत. युनायटेड नेशन्स ही संस्था जागतिक मानवी कौशल्य कार्यान्वित करून मोठ्या स्तरावर जागरूकता व लोकशिक्षणसारखे उपक्रम राबवत आहे. यासोबतच गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यादेखील आपले तंत्रज्ञान तरुणांना देत ओपन-डेटाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करण्यास मदत करताना दिसतात.

विकसित राष्ट्रांच्या प्रणालीवर आधारित भारतानेदेखील ‘स्मार्ट सिटी’ धोरण अवलंबले आहे ही आनंदाची बाब. स्मार्ट सिटी निर्मिती प्रक्रियेत सिटिझन्स अर्थात नागरिकही स्मार्ट होणं तितकंच महत्त्वाचं. त्यादृष्टीने नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यास ‘ओपन-डेटा’च्या माध्यमातून आपण सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. विविध नागरिक सुविधा ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून डिजिटलाइज्ड करताना स्थानिक प्रशासनंही लोकोपयोगी माहिती अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील दिसते आहे. विद्यार्थ्यांनी डेटा-सायन्स हे करिअरचे नवीन क्षेत्र निवडल्यास ते ‘डेटा-शास्त्रज्ञ’ बनू शकतात. विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये, इतर महाविद्यालये यातून दरवर्षी बाहेर पडणारे हजारो-लाखो पदवीधर आणि औद्योगिक वसाहती तसेच विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योग-व्यावसायिक आणि विषयतज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नाने ‘डेटा-ड्रिव्हन-टेकनॉलॉजी-सोल्युशन्स’ क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध केल्या जाऊ शकतात.

– सुनील खांडबहाले

Published link : https://divyamarathi.bhaskar.com/news/sunil-khandbahale-writes-about-new-sector-of-data-science-126971887.html

Image link : https://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages///15032020//14rasik-pg3-0.jpg

Sidebar