गोदावरी आरती पुस्तिका बनविण्याचे प्रशिक्षण

  गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” कार्यशाळेने “जागतिक मुद्रण दिन” साजरा

  गुरुवार, दि. २४ फेब्रुवारी “जागतिक मुद्रण दिन” यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेता यावा, यासाठी “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” अशी राज्यस्तरीय स्पर्धा गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे २४-ते-२८ फेब्रुवारी २०२२२ या काळात घेण्यात आली आहे.

  आज या उपक्रमाची सुरुवात नाशिक मधील अण्णासाहेब वैशंपायन शाळेत “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” या कार्यशाळेने करण्यात आली. यावेळी प्रिंटींग क्षेत्रातील तज्ञ, व्यावसायिक कलाकार व साई एन्टरप्राइजेसचे श्री. दिनेश पैठणकर यांनी विद्यार्थ्यांना पुस्तिका बनविण्याचे प्रशिक्षण दिले. ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक आणि सुजाण नागरिक मंचचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना गोदावरी नदी व संबंधित पाणीप्रश्न याविषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पगार यांनी मुद्रणशास्त्र आणि पुस्तकाचे महत्व विशद केले. अथर्व ऍडव्हर्टाईजींगचे मिलिंद महाजन, कलाशिक्षक संदीप सोनार आणि श्रीराम खांडबहाले यांनी विद्यार्थ्यांना पुस्तिका बनविण्याकामी मदत केली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सुंदर पुस्तिका तयार केल्या. 

  पुस्तिका निर्मिती कार्यशाळेविषयी गोदावरीआरती.ऑर्गचे निर्माते श्री सुनील खांडबहाले यांनी सांगितले कि, “गोदावरीआरती.ऑर्ग” हे लोकसहभागातून जागतिक पाणी प्रश्न सोडविण्यासाठी एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम आणि कृतिशील व्यासपीठ आहे. पुस्तक आपण सर्वजण बघतो, वाचतो परंतु ते कसे तयार होते याचे विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण दिले जावे या हेतूने राज्यभर विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. कागदाचा अपव्यय टाळता यावा आणि एका बाजूने कोऱ्या कागदावर प्रिंट घेता यावी यासाठी पुस्तिकेचे विविध प्रारूप संकेतस्थळावर डाउनलोडसाठी उपलब्ध असल्याने पर्यावरणविषयक सकारात्मक संदेश दिला जात आहे. नवकल्पकता दृष्टीने विचार करता, मोटर कौशल्य म्हणजेच हात व डोळे यांतील सुसूत्रता, आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी असून यानिमित्ताने भारतीय नद्यांविषयी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी “गोदावरी आरती” उपक्रमात गायन, वादन, हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा, नवकल्पकता, पाणीप्रश्न संशोधन अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह https://www.godavariaarti.org/ या संकेतस्थळावर सहभाग घेता येऊ शकतो. नागरिकांच्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल डिजिटल स्वरूपात “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्रदेखील प्रदान करण्यात येणार असल्याचे यावेळी गोदावरीआरती.ऑर्ग चे निर्माते श्री. सुनील खांडबहाले यांनी सांगितले. 

  कार्यशाळेच्या फुटेज आणि फोटोंसाठी:  https://drive.google.com/drive/folders/14sxr5tAV2r4E7_Fs5QrsrihKeZg-zQh_?usp=sharing

  Comments

  So empty here ... leave a comment!

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  Sidebar