खांडबहाले एसएमएस शब्दकोशाची 75 हजारी मजल – लोकसत्ता
जगातील सर्वात पहिल्या एसएमएस शब्दकोशाची महती आता सगळीकडे पसरली आहे. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत ७५ हजारांपेक्षा अधिक जणांनी त्याचा लाभ घेतला आहे. यावरूनच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष पटावी. एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ जाणून घ्यावयाचा असल्यास ‘शब्दकोश’ची आठवण होते. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश पाहायला मिळतात. मात्र आता शब्दकोश विकत घेण्याची गरज भासू नये, इतपत तंत्रज्ञान पुढे गेले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याचीही गरज नाही. फक्त एक एसएमएस करून आपल्याला हव्या असलेल्या शब्दाचा अर्थ जाणून घेता येतो. नाशिकच्या ‘खांडबहालेडॉटकॉम’ने ही सेवा सुरू केली आहे.