स्मार्ट शिक्षण… स्मार्ट सिटीझन्स
स्मार्ट शिक्षणातूनच भविष्यातील स्मार्ट सिटीझन्स निर्माण होतील. त्यासाठी आरंभापासूनच स्मार्ट शिक्षणविषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने स्मार्ट शिक्षणव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्यास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित होतील. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. वाढत्या शहरीकरणामुळे होणारे मानवी स्थलांतर, भौगोलिक व भाषिक वैविध्य, कमकुवत पायाभूत संरचना, कुशल मनुष्यबळाचा अभाव आदी लक्षात घेता भविष्यात स्मार्ट शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक व व्यवसायाच्या व्यापक संधी आहेत.
तो मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉस्टन विद्यापीठातील माझा पहिलाच दिवस होता. घरापासून हजारो किलोमीटर, दूर देशात, त्या दिवशी माझ्या मनात अनेक गोष्टीबद्दल कुतूहल होतं, नवीन जाणून घेण्याची उत्सुकता तर होतीच परंतु मनात काहीशी धाकधूकही होती. आणि दुसरीकडे विद्यापीठाच्या भल्या मोठ्या कॅम्पसमध्ये मला हरवल्यासारखं झालं होतं. मग मी हळूच खिशातून स्मार्टफोन काढला. आयटी विद्यापीठाचं अधिकृत अॅप उघडलं आणि प्रचंड मोठ्या विद्यापीठच्या आवारात मी नेमका कुठे उभा आहे ते समजलं. मला नेमकं कुठे जायचं आहे तेही लक्षात आलं. तिथे पोहोचण्याचे निरनिराळे मार्ग व पर्याय आणि किती वेळ लागेल ते देखील मला त्या अॅपने सुचवले. माझे प्रोफाइल लक्षात घेऊन अॅपने माझे दिवसभराचे वेळापत्रक दाखविले.
वर्ग सुरू होण्यासाठी जरा वेळ होता. मी ग्रंथालयात जाण्याचे ठरविले. ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारातच अॅपने मला ग्रंथालय इमारतीचा नकाशा, पुस्तकांची सूची सर्वकाही माहिती माझ्या स्मार्टफोनच्या पडद्यावर दिली. बरोबर दहा मिनिटं बाकी असताना – मला आता निघायला हवं असं अॅपने सुचवलं, कारण वर्गाकडे पायी जाण्यासाठी किमान पाच मिनिटं लागणार होते. वर्गात जाऊन बाकावर बसलो. लागलीच तासाचे वेळापत्रक, वर्गावर तास घेणाऱ्या प्राध्यापकांच्या माहितीसह व अभ्यासाचे साहित्य संगणकाच्या पडद्यावर आपोआप उघडले गेले. प्राध्यापकाकडे देखील संगणकावर सर्व विद्यार्थ्यांची माहिती होती. संपूर्ण तासाभरात प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासात किती व कशी गुंतवणूक होती तसेच परस्पर संवाद कसा होता, नेमून दिलेली कामगिरी प्रत्येकाने किती वेळात कशी पार पाडली याचा डेटा प्राध्यापकाकडे असल्याने त्यांना विद्यार्थ्यांचे परीक्षण करणे सोपे होते. दुसऱ्या दिवशी माझा अभ्यास-गट कोणत्या अभ्यास-खोलीत जमलेला आहे ते अॅपने मला नेमके सांगितले. परंतु तितक्यातच स्मार्टफोनवर ग्रंथालयातून पुस्तक घेऊन जाण्याची सूचना आली म्हणून ग्रंथालयाकडे वळालो. मला पोहोचायला पाच मिनिटं अधिक लागणार असल्याचा संदेश माझ्या अभ्यास-गटाला आपोआप पाठवण्यात आला. पूर्णतः नवीन वातावरण व अनोळख्या संस्कृतीत स्मार्ट शिक्षणाने पुढे वर्षभर मला माझे शैक्षणिक, वैयक्तिक व व्यावसायिक जीवन संतुलित करण्यासाठी मोलाची साथ दिली.
प्रगत राष्ट्रांत विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत स्मार्ट शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांचा वर्षभराचा डेटा, त्यांची हजेरी, येण्याजाण्याच्या वेळा, सवयी, अभ्यासातील गती, आवडीनिवडी, आरोग्यविषयक माहिती याशिवाय विद्यापीठातील विविध कार्यक्रम, घटनाक्रम, परिषद-कार्यशाळा, व्याख्याने यात विद्यार्थ्यांचा सहभाग अशा महत्वपूर्ण घटकांचे अद्ययावत विद्यार्थी केंद्रित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते. स्मार्टफोन, संगणक तसेच वायरलेस नेटवर्कचा वापर करून भेटीच्या वेळा ठरवणे, मुलाखतीची जागा आगाऊ राखून ठेवणे, अभ्यासाचे नियोजन करणे, अभ्यास-गटाचे उपक्रम ठरवणे सोपे झाले. एमआयटी विद्यापीठातील स्मार्ट शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन यासह प्रत्येक घटक कुठे कमी पडतो, कुठे चांगली कामगिरी होत आहे, सुधारणा करण्यास कुठे वाव आहे अशा माहितीसह एकूणच शिक्षणव्यवस्थेचा स्पर्धात्मक विकास केला जातो. तेथील विविध इमारतींमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला गेला असल्याने विद्यापीठातील एकूणच ऊर्जा, सुरक्षा, दळणवळण, परस्पर-संवाद अधिक कार्यक्षम आहेत. सोबतच आभासी शिक्षण (व्हर्च्युअल लर्निंग), दृक्श्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) माध्यमे, ऑनलाइन व दूरस्थ (डिस्टन्स) शिक्षण यामुळे विविध बाह्य-भागीदारांसोबत (पार्टनर्स) समकालीन (कंटेम्पररी) शिक्षण सुलभ व सुखावह करण्यात आले आहे. ‘फ्लिप-क्लास’ सारख्या शिक्षणपद्धतीमुळे शिक्षकांनी अध्यापन करण्याऐवजी विद्यार्थ्यांनाच स्वयंअध्ययनासाठी उद्युक्त करण्यात येते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा चेहरामोहराच बदलत चालला आहे. शिक्षणाचा गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांची शिक्षण आत्मसात करण्याची पातळी वाढवण्यासाठी स्मार्ट क्लासचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.
डेटाआधारित संवादात्मक व सहभागात्मक शिक्षण प्रणाली, प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक गुंतवणूक, त्याची आवडनिवड कळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे एकही विद्यार्थी मागे न राहता सर्वांना समान संधी देणे शक्य होऊ शकेल. वर्गातील तापमान, प्रकाश तीव्रता, ध्वनिलहरींची स्पष्टता, कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण या सर्वांचा विद्यार्थ्याच्या अभ्यासपातळीवर होणारा परिणाम अभ्यासणे व विद्यापीठ पातळीवर त्याचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे.
शिक्षणप्रक्रियेतून तयार झालेले कुशल मनुष्यबळ व बाजारपेठ आणि उद्योगक्षेत्राची गरज याची योग्य ती सांगड लावली तरच रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञान निश्चितच शिक्षणव्यवस्था व उद्योगक्षेत्र यांचा सुसंवाद वाढवू शकते. शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे लक्षात घेऊन भविष्यातील शहरांमध्ये अाबालवृद्धांना आवड व सोयीनुसार शिक्षण घेणे शक्य झाले पाहिजे. विशेषतः महिलांसाठी शिक्षणव्यवस्था सुरक्षित व सुलभ केल्या गेल्या पाहिजेत. ‘डेटा लिटरसी’ अर्थात माहिती साक्षरता सारख्या उपक्रमांमुळे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये समाजातील जटिल समस्यांविषयी जागृती करणे, स्मार्ट सोशल मीडियासह इतर तंत्रज्ञानाचा अवलंब करत स्मार्ट लोकशिक्षण शक्य आहे.
स्मार्ट शिक्षणातूनच भविष्यातील स्मार्ट सिटीझन्स निर्माण होतील. त्यासाठी आरंभापासूनच स्मार्ट शिक्षणविषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने स्मार्ट शिक्षणव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्यास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित होतील. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. वाढत्या शहरीकरणामुळे होणारे मानवी स्थलांतर, भौगोलिक व भाषिक वैविध्य, कमकुवत पायाभूत संरचना, कुशल मनुष्यबळाचा अभाव आदी लक्षात घेता भविष्यात स्मार्ट शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक व व्यवसायाच्या व्यापक संधी आहेत.
– सुनील खांडबहाले
Published at : https://divyamarathi.bhaskar.com/news/smart-learning-smart-citizens-126548015.html
Image Link : https://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/19012020/Mar26-1386187-large.jpg