Silicon Valley Battle | सिलिकॉन व्हॅलीतील सत्तासंघर्ष

१४ मे २०१४. त्या दिवशी मार्क झुकेरबर्गचा वाढदिवस होता. वयाच्या ३० व्या वर्षात त्याने पदार्पण केले होते. संपूर्ण फेसबुक मध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. रंगीबेरंगी फुग्यांच्या गर्दीत उभा असलेला मार्क आणि जल्लोषात साजरा होणारा त्याचा वाढदिवस खरं तर नवकल्पकतेचा आनंदोत्सव होता. त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होताना स्वप्नातही वाटलं नव्हतं कि एकदिवस मला फेसबुकमध्ये काम करायला मिळेल. पुढे दोन वर्षानंतर एम.आय.टी. त शिकत असताना ती संधी चालून आली. एक वेगळेच विश्व् अनुभवता आले आणि तसेच हायटेक जगतातले अनेक बारकावे देखील. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने खरे तर फेसबुक, गुगल, ड्रॉपबॉक्स, ऑटोडेस्क, जीई डिजिटल, पेपाल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, इंटेल, ईबे सारख्या एरव्ही आभासी जगतातील अनेक कंपन्यांना वास्तवात अनुभवण्याची संधी मिळाली. का या कंपन्या लोकांच्या मनावर, पर्यायाने जगावर राज्य करतात? काय असतात त्यांच्यापुढील आव्हानं? सिलिकॉन व्हॅलीत राहून कसे सोडवतात ते सगळ्या जगाचे प्रश्न? कशी ओळखतात ते आपल्या ग्राहकांची नस? मात्र हे समजून घेण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीच्या इतिहासात डोकावणे योग्य ठरेल.

सिलिकॉन व्हॅली हा जगाच्या नकाशावरील कोणता देश नाही, राज्य नाही, जिल्हा नाही कि नाही एखादे शहर. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रॅन्सिस्को बे-एरिया शहराचा दक्षिण भाग संपूर्ण जगभर ’सिलिकॉन व्हॅली’ या विशेष नावाने ओळखला जावा यातच त्याची महती सिद्ध होते. नव्हे नव्हे तर सिलिकॉन व्हॅलीचे मॉडेल म्हणजेच कित्ता जगभर गिरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल सॅफो यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही नवीन कल्पनेचे संस्कृतीत रूपांतर होण्यासाठी किमान ३० वर्षे लागतात. याच विद्यापीठाचे अभियांत्रिकी विभागप्रमुख फ्रेडरिक टर्मन यांनी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना एकत्र येऊन स्वतःच्या कंपन्या सुरु करण्यास प्रोत्साहित केले. १९३० मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डेव्हिड पॅकर्ड आणि विल्यम हॅव्हलेट यांनी पॅलो अल्टो च्या छोट्याश्या गॅरेज मध्ये आपली इलेक्ट्रॉनिक कंपनी सुरु केली आणि ‘सिलिकॉन व्हॅली’ या नव्या पर्वाचा जन्म झाला. पुढे जॉर्डन फ्रेंच आणि फ्रेड मुरे यांनी त्यांच्यासारख्याच समविचारी ध्येयवेड्या तरुणांना एकत्र आणत विचार आणि संसाधने यांच्या आदानप्रदानासाठी ’’होम्ब्रेव कॉम्पुटर क्लब’ नावाचे खुले व्यासपीठ स्थापन केले. सिलिकॉन व्हॅली या संकल्पनेला खतपाणी घालत प्रत्यक्षात आणण्यासाठी तरुणांच्या या पुढाकाराचा महत्वाचा वाटा आहे . नुकत्याच प्रकाशित झालेल्या ’सिलिकॉन व्हॅली इंडेक्स २०१६’ च्या अहवालानुसार २९८४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या सिलिकॉन व्हॅलीने पंधरा लाखाहून अधिक तंत्रज्ञांना रोजगार देत हजारो नवीन स्टार्टअप्स ला आकर्षित केले आहे. या प्रदेशाने, कॅलिफोर्निया हे राज्य फ्रांस देशाला मागे टाकत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यास प्रमुख योगदान दिले आहे. आणि या सर्वांचे मूळ आहे ते म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील दिवसागणिक होणारे प्रचंड बदल आणि त्यासाठी कंपन्यांची लागलेली चढाओढ.

एकेकाळची इंटरनेट जगतातील अग्रगण्य असलेली कंपनी याहू अगदी नामशेष व्हावी हे तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे एक बोलके उदाहरण ठरावे. १९९७ मध्ये याहू ने गुगल १ मिलियन डॉलरला विकत घेण्याचे नाकारले जे गुगल आज ५३० बिलियन डॉलर किमतीचे आहे.
२००६ मध्ये याहू ने १ बिलियन डॉलर ला फेसबुक विकत घेण्याचे नाकारले जे फेसबुक आज ३५० बिलियन डॉलर किमतीचे आहे.
२००८ मध्ये मायक्रोसॉफ्ट ने ४५ बिलियन डॉलर ला याहू विकत घेण्याची तयारी दर्शवली जी याहू ने नाकारली.
आणि शेवटी २०१६ मध्ये याहू मात्र ४.८ बिलियन डॉलरला व्हरायझन ने विकत घेतली कि जी याहू कंपनी कधी काळी इंटरनेट जगतातील क्रमांक एक ची आणि १५० बिलियन डॉलर किंमत असलेली कंपनी होती. भविष्याचा अचूक वेध घेणारे मात्र नेत्रदीपक यशाचे मानकरी ठरले. एकोणिसाव्या शतकातील मेनफ्रेम कम्पुटरचे जनक ’बिग ब्लु’ म्हणजेच आय बी.एम. आणि त्यांना सॉफ्टवेअर पुरविणारे मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स आणि पॉल अँलेन. परंतु पुढे १९७७ मध्ये अँपल चे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांनी आय.बी.एम. ला आव्हान देत पर्सनल कम्पुटर ची संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि तंत्रज्ञानातील सर्व गणितेच बदलून टाकली. पर्सनल कम्पुटर हि खरोखरीच एक क्रांती ठरली. अँपल ची मोहिनी जशी अनेक गुंतवणूकदारांवर पडली तशी ती बिल गेट्स यांनाही. आय.बी.एम. सोबतचा करार मोडीत काढत मायक्रोसॉफ्टने अँपल सोबत संधान बांधले जे फार काळ टिकले नाही. स्टीव्ह जॉब्ज यांच्या म्हणण्यानुसार खरे तर झेरॉक्स पार्क हिच कंपनी संगणक युगावर राज्य करू शकली असती परंतु त्यांना ग्राफिकल यूजर इंटरफेस चे सामर्थ्य योग्य वेळी समजू शकले नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा अँपल ने घेतला. स्वतःचा मायक्रोप्रोसेसर बनविण्यात अपयशी ठरल्यावर मायक्रोसॉफ्टशी काडीमोड घेतलेल्या महत्वाकांक्षी अँपल ला पुढे विंडोज साठी चिप बनविणाऱ्या इंटेल ची मदत घ्यावी लागली. वेळ-काळानुसार ह्या कंपन्या अनेक तडजोडी करत आपला शत्रू आणि मित्र कसे बदलवतात हेही अगदी मजेशीर आहे. सिलिकॉन व्हॅलीत चाललेल्या सत्तासंघर्षांला अनेक पैलू आहेत.

एक म्हणजे तंत्रज्ञान. वेगाने बदलणारे जग आणि त्याच्या गरजा लक्षात घेता, जगाच्या अनेक दशके पुढे राहण्यासाठी सर्वच तंत्रज्ञान कंपन्या अहोरात्र झटत असतात. आपल्या एकूण उत्पन्नाचा अधिकांश भाग ते संशोधनावर खर्च करतात. ‘ग्लोबल इनोवेशन १०००’ ने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०१५ मध्ये अँपल ने ६ बिलियन, गुगल ने ९.८, अमेझॉन ने ९.३, मायक्रोसॉफ्ट ने ११.४ तर सॅमसंग ने सर्वाधिक १४.१ बिलियन डॉलर संशोधनावर खर्च केले. त्यामुळे महत्वपूर्ण संशोधनांची नक्कल केली जाऊ नये म्हणून पेटंट म्हणजेच एकाधिकार मिळविण्यासाठी चढाओढ चाललेली असते. त्यासाठी एकमेकांना कोर्टकचेऱ्यांमध्ये ओढण्यासाठी देखील ते मागे पुढे पाहत नाहीत. वकिलांचा ताफाच असलेला न्यायविभाग कंपन्यांचे अविभाज्य अंग झालेले आहे. अँपल, मायक्रोसॉफ्ट आणि झेरॉक्स चे ’ग्राफिकल यूजर इंटरफेस’ प्रकरण हि खरी पेटंट युद्धाची सुरुवात म्हणावी लागेल. मायक्रोसॉफ्ट ने विंडोज ३.० ची घोषणा केली आणि स्टीव्ह जॉब्जने अँपल ची संकल्पना चोरल्याबद्दल बिल गेट्स ला कोर्टात खेचले. लागलीच झेरॉक्स ने अँपल वर संकल्पना चोरीचा दावा दाखल केला कारण विंडोज असलेली सर्वप्रथम संगणक प्रणाली स्टीव्ह जॉब्ज ने झेरॉक्स पार्क मध्येच प्रात्यक्षिकाच्या वेळी बघितली होती. त्यानंतरचे आयबीएम आणि नॉव्हेल यांच्यातले यूनिक्स आणि लिनक्स चे पेटंट भांडण, व्हर्जिनियाच्या छोट्याच्या एनटीपी कंपनीने रिसर्च इन मोशन च्या ब्लॅकबेरीला दिलेले ५३ मिलियन डॉलर्सचे आव्हान, इबे आणि मार्क-एक्स्चेंज चे प्रकरण, इंटेग्राफने इंटेलकडून वसूल केलेले ३०० मिलियन किंवा टेक्सस मधली अगदी ३० लोकांची स्टार्टअप असलेल्या आयफोरआय कंपनीने मायक्रोसॉफ्ट सारख्या बलाढ्य कंपनीकडून मायक्रॉफ्ट वर्ड साठी एक्सएमएल तंत्रज्ञान चोरण्याच्या आरोपात नुकसानभरपाई म्हणून वसूल केलेले २९० मिलियन डॉलर. यातूनच पेटंट-युद्ध हे देखील सिलिकॉन व्हॅलीच्या अंगवळणी पडल्याचे दिसते. नुकतेच अँपल आणि सॅमसंग च्या डिझाईन पेटंट युद्धात अँपलने सॅमसंगकडून ५४८ मिलियन डॉलर ची रक्कम वसूल केल्याचे सर्वश्रुत आहेच.
आपले अधिराज्य शाबूत ठेवण्याचा दुसरा प्रकार म्हणजे मर्जर आणि अक्वेझिशन अर्थात विलीनीकरण आणि संपादन. हार्वर्ड विद्यापीठाच्या बिजनेस रिव्हिव्ह अहवालानुसर ९०% विलीनीकरण आणि संपादन अयशस्वी होतात. मायक्रोसॉफ्ट ने घेतलेल्या नोकियाचे व नंतरच्या विंडोज फोनचे काय झाले हे आपल्याला माहितीच आहे. असे असले तरी ”मोठा मासा छोट्या मास्यांना खातो” या उक्तीनुसार मोठ्या कंपन्यांकडून छोट्या कंपन्या गिळंकृत होत असताना दिसतात. कधी त्या तंत्रज्ञान मिळविण्याच्या हेतूने तर कधी प्रतिस्पर्ध्याला शह-काटशह देण्याच्या उद्देशाने. ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, गुगल हि काही अशा प्रथांचे मात्तबर. एकट्या गुगल ने गेल्या १२ वर्षात ४० बिलियनच्यावर गुंतवणूक करत दिडशेहून अधिक कंपन्या संपादित केल्या आहेत. इंटरनेट, मोबाईल, फोटो, व्हिडीओ, जाहिरात, स्थानिक भाषा अशा माहितीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपले पाय भक्कम करताना गुगलने युट्युब, अँड्रॉइड, डबलक्लिक, मोटोरोला, वेज अशा अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या काबीज करत आपले स्थान मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच सायबर-सुरक्षा क्षेत्रातील सिमेंटेक ने ब्लु कोट सिस्टम ४.६५ बिलियन डॉलर्स ला विकत घेतली, डेल ने ६७ बिलियनला ए.एम.सी. १०.३ बिलियनचे ओरॅकल-पीपलसॉफ्ट संपादन, फोन उत्पादनातली अग्रेसर कंपनी मोटोरोला हिचे गुगलने १२.५ बिलियन ला केलेले संपादन, एच.पी.-एडीएस १३.९ बिलियन डॉलर, डब्लू.डी.सी-स्कॅनडिस्क १५.७८ बिलियन, एच.पी. ने १८.७ बिलियन ला विकत घेतलेले कॉम्पॅक आणि त्यानंतरचे सर्वात गाजलेले फेसबुकने १९ बिलियन डॉलरला विकत घेतलेले व्हाट्सअप. हा व्यवहार जगभर वृत्तपत्र आणि इतर माध्यमांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला. एवढी मोठी रक्कम एका छोट्या कंपनीला द्यायला मार्क झुकेरबर्ग तयार व्हावा हे सगळ्यांसाठी नवलच होतं. कित्येकांनी तर हा अवाजवी व्यवहार असल्याचेच सुतोवात केले. परंतु इंटरनेट वरील फेसबुककरांची घटती संख्या आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वाढता आलेख बघता फेसबुकला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलणं संयुक्तिक होतं. हे सगळं होत असताना गुगल शांत बसेल तरच आश्चर्य! गुगल ने रचनात्मक बदल करत गुंतवणूकदारांना शाश्वती देण्यासाठी ’अल्फाबेट’ ह्या प्रमुख कंपनीची निर्मिती करून वेगळीच खेळी खेळली. गुगल आणि अँपल यांपैकी कोणती कंपनी क्रमांक एकची याविषयी जरी दुमत असलं तरी अल्फाबेटची निर्मिती केल्याबरोबर गुगलची पालक कंपनी अल्फाबेट हि बाजारमूल्यानुसार जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. एके काळची मक्तेदारी गाजवणारी मायक्रोसॉफ्ट मात्र सोसिअल मिडीयाच्या खुल्या विचारप्रणालीत आपले अंदाज बांधायला चुकली आणि गरबडत गेली. तसं पाहिलं तर जेमी वेल्सच्या विकिपीडिया कडून एन्साक्लोपेडियाला मिळालेल्या धड्यातून बिल गेट्स च्या मायक्रोसॉफ्ट ने काहीतरी शिकायला हवं होतं. गुगलच्या सर्च-इंजिनला टक्कर देण्यासाठी काढलेले बिंग पुरते फसल्याने पुढे मायक्रोसॉफ्टचे अनेक गणितं चुकली. स्काईप मात्र लाभात राहिली. त्या पाठोपाठ उशिरा का होईना पण मायक्रोसॉफ्ट ने २६ बिलियन डॉलर मोजून लिंक्ड-इन विकत घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा आजपर्यंतचा हायटेक जगतातील सर्वात मोठा व्यवहार मानला जात असला तरी नुकतेच कॅलिफोर्नियाच्या ऍव्हगो या सेमीकंडक्टर कंपनीने ब्रॉडकॉम विकत घेण्याचा ३७ बिलियन डॉलरचा व्यवहार पूर्ण केला ज्याची फारशी चर्चा झाली नाही.

विलीनीकरण आणि संपादन याच्या अनेक पाऊले पुढे जाऊन स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची नवीन एक फंडा आलाय तो म्हणजे स्टार्टअप. हल्ली अनेक अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आणि जे या क्षेत्राकडे वळू इच्छितात अशा साऱ्यांनीच स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहित करण्याचे मनावर घेतले आहे. फेसबुकचे ’एफबी-स्टार्ट, गुगलचे ’स्टार्टअप इकोसिस्टिम’, मायक्रोसॉफ्टचे ’मायक्रोसॉफ्ट व्हेंचर’ असे ’ओपन इनोवेशन’ व्यासपीठ नवसंशोधकांसाठी तयार केले आहेत. तंत्रज्ञान कंपन्यांच्या ’व्हेंचर-विंग्स’ अथवा गुंतवणूक दारांच्या मदतीने तरुणांना नवनवीन कल्पनांवर काम करण्यासाठी आकर्षित केले जात आहे. यामुळे अनेक गोष्टी साध्य होतात. एकतर मोठ्या कंपन्यांना बाजारातील त्यांच्या ब्रँड-व्हॅल्यू आणि ब्रँड-इमेजमुळे जे उपक्रम स्वतः करणं शक्य होत नाही ते या छोट्या स्टार्टअप्स करू शकतात. दुसरे म्हणजे प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास त्यांचे विलीनीकरण अथवा संपादन करणे सोपे जाते आणि त्यासाठी होणारी गुंतवणूक मोठ्या कंपन्यांसाठी खूपच कमी असते शिवाय मूळ संशोधनासाठी महत्वपूर्ण डेटा मिळतो तो वेगळाच.

गुंतवणूक आणि गुंतवणूकदार हा देखील सिलिकॉन व्हॅलीच्या यशोशिखराचा मुख्य आधारस्तंभ आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही. संपूर्ण अमेरिकेत होणाऱ्या एकूण गुंतवणुकीच्या एक तृतीयांश गुंतवणूक एकट्या सिलिकॉन व्हॅलीत होते यावरूनच इथे अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरु करण्यास का प्राधान्य देतात ते लक्षात येणासारखे आहे. जगातील इतरत्र असलेल्या कोणत्याही गुंतवणूकदारांपेक्षा सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार उद्योगाच्या यशस्वीतेसाठी सगळ्याच बाबतीत सरसा असल्याचे जाणवते. मग तो त्यांचा स्वतःचा अनुभव असो वा नेटवर्क. विशेष म्हणजे इथले बहुतांशी गुंतवणूकदार हे स्वतः यशस्वी उद्योजक आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक पाठबळापलीकडील मोलाचे मार्गदर्शन सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप्सच्या यशासाठी महत्वाचे ठरते. अल्पावधीत मुबलक गुंतवणूक मिळवणारी टॅक्सी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारी कंपनी उबर आणि आदरातिथ्य क्षेत्रातील एअरबीअँडबी म्हणूनच नावारूपास आल्या. नवनवीन उत्पादन निर्मिती व घोषणा यांसह कंपनीचे बाजारमूल्य वाढवत अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही कंपन्यांची नेहमीच कसरत चाललेली असते.

कुठल्याही परिस्थितिक व्यवस्थेसाठी शिक्षण संस्थांचा महत्वाचा वाटा असतो. स्टॅनफर्ड विद्यापीठ हे पहिल्यापासून सिलिकॉन व्हॅलीचे मुख्य प्रवर्तक राहिलेले आहे. गुगल, फेसबुक हि स्टॅनफर्ड विद्यापीठाचीच उपउत्पादने. कुशल मनुष्यबळ तयार करण्यासोबतच जगभरातील कौशल्य आकर्षित करण्यासाठी विद्यापीठ यशस्वी झालेले आहे. इथल्या विद्यापीठांची व्हॅलीतल्या कंपन्यांशी असलेले जवळचे संबध, संशोधनासाठी पोषक उपक्रम यांचेही व्हॅलीच्या यशात महत्वाचे योगदान आहे. कंपन्यांच्या परस्पर चढाओढीमुळे विद्यापीठांसोबत दर्जेदार उपक्रम करण्यास प्रमुख कंपन्या तत्पर असतात.

हायटेक जगतातली स्पर्धा केवळ उत्पादन किंवा तंत्रज्ञान या पुरतीच मर्यादित नाही. एकदा रतन टाटा, अजीम प्रेमजी, नारायण मूर्ती आणि भारतातील अन्य प्रस्थापित उद्योजकांना विचारण्यात आले की जर तुम्हाला केवळ एक गोष्ट सोबत घेऊन कंपनी सोडायचा प्रसंग आल्यास काय पर्याय निवडाल? तर सर्वांचेच उत्तर होते ’मनुष्यबळ’.
सिलिकॉन व्हॅलीतील बहुतांशी युनिकोर्न कंपन्यांच्या यशाचे रहस्य देखील दडले आहे ते मनुष्यबळात. जगभरातील सर्वोत्तम विद्वान आकर्षित करणे हे या कंपन्यांपुढे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी ते पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार असतात. जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार १९१८ पर्यंत अमेरिकेला ३० लाख तंत्रज्ञांची कमी पडणार आहे. आयबीएम सारख्या जगप्रसिद्ध कंपनीने डायटोना बीच वर सनबाथ घेणाऱ्या फ्लोरिडा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आकर्षित करण्याकरीता अक्षरशः बीचबर तंबू ठोकला आणि अधिकाऱ्यांनी हाप चड्ड्या घालून विद्यार्थ्यांना आयबीएम कि-चेन्स आणि पेन वाटले. गुगल, लिंकेड-इन पाठोपाठ आता जवळ जवळ सर्वच प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या हुशार मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशिप म्हणजेच पगारी प्रशिक्षण देऊ करतात. स्पर्धा आयोजित करतात. स्टेम म्हणजे सायन्स, टेकनॉलॉजि, इंजिनीअरिंग आणि मॅथ्स क्षेत्रातील बुद्धिमान विद्यार्थी मिळविण्यासाठी तर विद्यापीठांकडे अक्षरशः पदर पसरतात. त्याकामी प्रत्येक विद्यापीठासाठी विशेष समन्वयक नेमलेले असतात. पदवीधर तंत्रज्ञांना आकर्षित करणे हि त्यांची प्रमुख जबाबदारी असते. प्रचंड ऊर्जा असलेली आणि काही तरी नवीन करून दाखवत जग बदलवण्याची स्वप्न बघणारी तरुणाई आणि त्यांची खाण्यापिण्यापासून तर आरोग्य-मनोरंजनापर्यंत काळजी घेणाऱ्या कंपन्यांचा रम्य परिसर बघताना एख्याद्या विद्यापीठात वावरत असल्याचा भास होतो. गुगल, फेसबुकचे कॅम्पस तर इतके मोठे आहेत कि एखादे वसवलेले शहर वाटावे. तिथे फिरताना मला तर अनेकदा प्रश्न पडायचा कि इथे जर सगळेच कर्मचारी हसण्या-खेळण्यात, दंगा-मस्ती आणि खाण्या-पिण्यात रमलेले असतात तर मग काम करतं कोण? बरं, इथे सर्व काही मोफत! खाण्या-पिण्याची तर चंगळच असते. वर्षभर अमेरिकेतले पिझ्झा-बर्गर खाऊन माझा जीव तर अगदी विटला होता. त्यामुळे फेसबुक मधले इंडियन किचन हे तर माझ्या सर्वात आवडीचे ठिकाण बनले होते. सिलिकॉन व्हॅलीत फिरताना पावला पावलाला भारतीय तरुण दिसतात यावरूनच सिलिकॉन व्हॅलीच्या एकूण प्रगतीत भारतीयांचे किती योगदान आहे हे वेगळे सांगावयास नको. सॅमसंग लॅब ला भेट देतानाही असाच काहीसा अनुभव आला. कर्मचाऱ्यांसाठी २४ तास आणि सातही दिवस खुल्या असलेल्या हायटेक संस्कृतीची तरुणाईला मोहिनी पडली नाही तरच नवल! इथे जसे नवीन मनुष्यबळ मिळवण्यासाठी चढाओढ होताना दिसते तसेच एकमेकांचे अनुभवी तंत्रज्ञ पळविण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा चाललेली असते. अनेकदा तीच ती बुद्धिजीवी लोकं ह्या कंपनीतून त्या कंपनीत स्थलांतरित होताना दिसतात.

विद्वान तंत्रज्ञांना संशोधनासाठी योग्य ते पोषक वातावरण आणि मोकळीक देणं हेही तितकेच गरजेचं. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामासाठी आपल्या सोयीच्या वेळा आणि जागाही ठरविण्याची मोकळीक असते. घरी बसूनही आपले काम करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. परंतु कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतच त्यांच्या पाळीव प्राण्यांचीही इतकी काळजी घेतलेली असते कि कंपनी परिसर सोडून अनेकदा घरीही जावेसे वाटत नाही. गमतीने गुगलला कधी कधी ‘माउंटन व्हिव्ह चॉकलेट फॅक्टरी’ नावानेही संबोधले जाते. गुगल मध्ये तर आठवड्यातला एक दिवस तुम्ही तुमच्या नित्त्याच्या कामाव्यतिरिक्त कशावरही काम करू शकता. गुगल मध्ये प्रवेश करताच स्पेस शिप वन बी फोर्टी थ्री दृष्टीस पडते ते ह्या संस्कृतीचाच एक निष्पत्ती. अभियांत्रिकी तंत्रज्ञ आणि व्यवस्थापक यासोबतच साहित्यिक, चित्रकार, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशा अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र काम करतात. कल्पक व्यक्तींना तर इथे विशेष वाव आहे. मी गूगल ला सर्वप्रथम भेट दिली तेंव्हा प्रतीक्षा कक्षातील फोटोफ्रेम मध्ये एकच एक चेहरा प्रत्येक फोटोंमध्ये दिसला म्हणून विचारणा केली तर समजले कि टॅन चेड-मेंग ह्या गुगलच्या अभियंत्याला कंपनीत आलेल्या प्रत्येक विशेष व्यक्तीसोबत आपला स्वतःचा फोटो काढण्याचा छंद आहे. आणि गुगल त्याच्या ह्या अनोख्या छंदाचा सम्मान करते. जेंव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुगलला भेट दिली तेंव्हा त्यांनी स्वतः टॅन चेड-मेंग याला बोलावून त्याच्यासोबत आपला फोटो काढून घेतल्याचा गमतीदार किस्साही त्यांनी सांगितला. कंपनीत वावरताना पावलोपावली इथल्या अनोख्या कामाची संस्कृती जाणवते. सिलिकॉन व्हॅली कि जिथे फक्त तुमची बुद्धिमत्ता हाच शिक्का चालतो अशा वुद्धीवंतांसाठी स्वर्गापेक्षा तसूभरही कमी नाही असे मला वाटते. वेळप्रसंगी कंपनीचे मूळ निर्माते बाजूला होऊन बुद्धीवंतांना कंपनीत महत्वाचे स्थान देतात. म्हणूनच तर जन्माने अमेरिकन असलेल्या कंपन्यांचे मुख्य सूत्र अनेक जाती-धर्म आणि वंशांचे लोक चालवताना इथे दिसतात. चुकीचे निर्णय घेण्याची भीती इथे नाही. किंबहुना ’मूव्ह फास्ट अँड ब्रेक थिंग्स’ असे फेसबुक सारख्या कंपन्यांचे ब्रिदवाक्यच आहे. चुका करा आणि त्यातून लवकरात लवकर शिका यासाठी हवे ते पाठबळ देत कर्मचाऱ्यांना प्रोत्सहीत करतात. गुगल, फेसबुक तर मला एखाद्या प्रयोगशाळेसारखे वाटतात, जिथे तुमचे संशोधन तुम्हाला हवे तसे करण्याची पूर्ण मुभा आहे. सॅमसंग, अँपल त्यामानाने जरा आवृत पद्धतीच्या जाणवतात.

तंत्रज्ञान जसे लोकांचे भवितव्य ठरवते तसेच बाजारपेठाही कंपन्यांचे भवितव्य ठरवत असतात. त्यामुळेच ह्या कंपन्या बाजारपेठेच्या पर्यायाने ग्राहकाच्या अधिकाधिक जवळ राहण्याचा प्रयत्न करत असतात. ग्राहकांची संस्कृती, चालीरीती, रिवाज, भाषा, भौगोलिक परिस्थिती अशा सर्वांच गोष्टींचा विचार केला जातो. विकसित देशातील जीवन सुसह्य झाल्यामुळे विकसनशील देश हे तंत्रज्ञान कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे. परंतु ह्या नव्या उगवत्या बाजारपेठांमध्ये जम बसविणेही तितकेच आव्हानात्मक आहे. स्थानिक प्रशासकीय नियमन आणि नियंत्रण समजून घेणेही क्लिष्ट असते. फेसबुकच्या फ्री बेसिक उपक्रमाला भारतात गाशा गुंडाळायला लागणे अथवा उबर कंपनीला अनेक देशात आपला व्यवसाय बंद करावा लागणे हि अशीच काही उदाहरणं देता येतील. त्यामुळेच बाजारपेठेशी नाळ असलेले कंपनी प्रमुख निवडणे, परिषदा आयोजित करणे अथवा सहभागी होणे असे प्रयत्न केले जातात. गुगल ने भारतीय वंशाचे सुंदर पिचाई अथवा मायक्रोसॉफ्टने सत्या नडेला यांची नेमणूक करणे हा व्यवसाय नीतीचाच एक भाग आहे.

संशोधक/उद्योजक, शिक्षण संस्था, गुंतवणूकदार, स्थानिक प्रशासन, कंपन्या ह्यासोबतच सिलिकॉन व्हॅलीच्या विकास आणि सत्तासंघर्षात असे अनेक वेगवेगळे घटक असले तरी एक गोष्ट एव्हाना सर्वांच्या लक्षात आली आहे ती म्हणजे आपल्या मूळ व्यवसायाशी निगडित एकूणच इकोसिस्टिम अर्थात परिस्थितिक व्यवस्था तयार करणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुगल. आपला सर्च इंजिन हा मूळ विषय ठेवून त्याला विस्तृत करण्याची आणि त्याचे मोनेटायजेशन किंवा व्यावसायिकरण करण्यासाठी जे जे करता येईल ते ते करताना गुगलचे प्रयत्न दिसतात. मग ते संपादन असो, नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक असो, गुगल एक्स सारखे महत्वाकांक्षी प्रयॊग कि ज्यात भविष्यातील स्वयंचलित कार, इंटरनेट सर्वदूर पोहोचविण्यासाठी हवेत फुगे सोडण्याचा प्रकल्प लून अथवा टीकेचा निशाणा ठरलेला गुगल ग्लास. उत्पादकाला फक्त त्याचे उत्पादन उच्च दर्जाचे असून चालत नाही तर ते उत्पादन वापरणाऱ्या ग्राहकाच्या सर्वांगीण समस्या आणि विकासाची काळजी असावी लागते. माहिती तंत्रज्ञान या शब्दातच ’माहिती’ ह्या शब्दाचे स्थान जसे ’तंत्रज्ञान’ या शब्दाच्या आधी आहे त्याचप्रमाणे त्याचे महत्वही.

तंत्रज्ञान कंपन्यांचे दुसरे मोठे आव्हान आहे ते म्हणजे हि माहिती मिळवणं. फेसबुक ने व्हाट्सअप चे केलेले संपादन किंवा मायक्रोसॉफ्ट ने लिंक्ड-इन चे केलेले संपादन हे आपले कार्यक्षेत्र रूंदावण्याबरोबरच लाखो वापरकर्त्यांचा डेटा मिळवणे यासाठीच होते. राजकीय, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रात प्रभावी असलेले ट्विटर आणि त्याचे ३२० मिलियन वापरकर्ते यावर सेल्सफोर्स, मायक्रोसॉफ्ट, व्हरायजन, गोल्डमन तथा गुगल सह अनेक कंपन्या डोळा ठेवून आहेत. गुगल आणि सेल्सफोर्स यांच्यासोबत निर्णायक वाटाघाटी सुरु असल्याचा बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. ऑर्कुट, बझ, वेव्ह, गुगलप्लस असे अनेक सोशियल मीडियाचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ट्विटर विकत घेणे गुगलच्या दृष्टीने सोशियल मीडियात फेसबुक, लिंकेड-इन सोबत महत्वाचे स्थान प्राप्त करून देण्यात निर्णायक ठरू शकते. यापूर्वीच गुगल सर्च मध्ये ट्विटरचे फीड दाखवत जाहिरात संदर्भात ट्विटरशी करारबद्ध आहे त्यातूनच ट्विटर यूजर्सचा डेटा गुगलसाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. दिवसागणिक नुकसान मोजणारे ट्विटर तसे बऱ्याच वर्षांपासून विक्रीसाठी बाजारात आहे आणि नुकत्याच होणाऱ्या हालचालींकडे तंत्रज्ञान कंपन्यांसोबतच जगाचे लक्ष लागलेले आहे.

ग्राहकाला संपूर्ण सुविधा पुरविण्याबरोबरच नवनवीन पर्याय द्यावे लागतात. आणि यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे आपल्या ग्राहकांबद्दल उत्पादकाला असलेले अधिकतम ज्ञान. तुमच्या आवडी-निवडी, सवयी, मित्र-परिवार, परस्पर संबंध, संवाद, वैचारिक ठेवण, सामाजिक पत, उदरनिर्वाहाची साधने, आर्थिक स्तर अशा एक ना अनेक बारकावे. आयबीएम च्या म्हणण्यानुसार आधुनिक तंत्रज्ञान दर दिवसाला २.५ क्विंटिलियन डेटा तयार करतो म्हणजेच आज जगात उपलब्ध असलेला ९०% डेटा हा मागील केवळ २ वर्षात तयार झालेला आहे. जगातील 2.5 अब्ज म्हणजे 35% लोक इंटरनेटशी जोडले गेली आहेत. फेसबुकवर 955 दशलक्ष, लिंक्ड-इनवर 200 दशलक्ष, तर ट्विटरवर 200 दशलक्ष सक्रिय खातेदार आहेत. एकूण 140 अब्ज म्हणजे जगातील तब्बल 35% फोटोज फेसबुकवर आहेत, तर दर दिवसाला 30 अब्ज पोस्ट्स, 2.7 अब्ज लाइक आणि 70 भाषांमध्ये प्रतिक्रिया (कॉमेंट्स) पाठवल्या जातात. गूगलसह इतर सर्च इंजिनवर दिवसाकाठी 213 दशलक्ष सर्च (शोध) केले जातात, 247 अब्ज इ-मेल दररोज पाठवले जातात, तर ट्विटरवर 400 दशलक्ष ट्विट्स केले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, जी. पी.एस. तसेच विविध इलेक्ट्रॉनिक तसेच वैद्यकीय उपकरणे यांच्या माध्यमातून व जगभरातील कोट्यवधी जनतेच्या आदानप्रदानातून दररोज माहितीचा महापूर निर्माण होत आहे. एकट्या विकीपिडीयावर 4 दशलक्ष इंग्रजी लेख आहेत, तर महाजालावर 133 दशलक्ष ब्लॉग्ज, 400 दशलक्ष वेबसाईटसह 7 अब्ज डीव्हीडी असा माहितीचा महासागर आहे. जगभरातील मोबाइल फोन्सची संख्या एक हजार अब्जाच्यावर गेली आहे. असंख्य तंत्रज्ञ व प्रचंड वेगाने काम करणारी शक्तिशाली संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) यांच्या मदतीने बिग डाटाचे पृथक्करण (अ‍ॅनेलिसीस) केले जात असून त्या आधारे अचूक अनुमान बांधले जात आहेत. जसे 20-25 वर्षे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण दिनचर्येची इत्यंभूत नोंद ठेवली तर ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत कशी वर्तणूक करेल, याचे अचूक तर्क करता येतील. एरवी गूगलवर शोधल्या जाणा-या सर्च टर्म्सचा अभ्यास करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकवर पाठवलेल्या पोस्ट व लाइक्सचा अभ्यास करून उत्पादने दाखवली जातात. अमेझॉनवर तुमची वाचनाची आवड लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तके सुचवली जातात. इबेवर तुम्ही नवीन काय वस्तू विकत घेणार ते दर्शवले जाते. सध्या अमेरिकेत पुढील 12 तासांत कुठे गुन्हा घडू शकतो, याचा पूर्वानुमान घेत गुन्हा घडण्याआधीच अमेरिकेतील पोलिस गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इंग्लंडमधील व्यापारी आणि शास्त्रज्ञांना गणिताच्या आधारे अब्जावधी रुपये कमावण्याचे गुपित उलगडल्याचा दावा ते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत एक खगोलशास्त्रज्ञ संपूर्ण ब्रह्मांड सूचीबद्ध करण्यात व्यग्र आहे. हे सर्व घटनाक्रम एका समांतर धाग्याने जोडले गेलेले आहेत, आणि तो धागा म्हणजे ‘बिग डाटा’. त्याचाच पुढचा भाग म्हणजे ’इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ज्यात दैनंदिन वापरातील वस्तू एकमेकांशी जोडलेल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहितीची आदानप्रदान करून स्वयंचलित राहतील.

थोडक्यात काय तर माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पर्सनल कंप्युटर पासून ते इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मिडिया अशा कालानुरूप झालेली स्थित्यंतरांतर आता बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, एआय म्हणजे आर्टीफिसिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निग, रोबोटिक्स, ऑटोनॉमस कार्स, कॅशलेस करन्सी आणि व्हर्चुअल रिऍलिटीचा बोलबाला आहे. त्यात अग्रेसर राहण्यासाठी एकच स्पर्धा प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसह स्टार्टअप जगतात लागलेली आहे. मुबलक संसाधनं, आधारभूत संरचना आणि संपत्ती हाताशी आहे. कोट्यावधी वापरकर्ते असलेल्या ह्या कंपन्यांच्या प्रमुखांना दररोज उठून नवीन काय देणार? असा एकच प्रश्न पडलेला असतो. अतिशय वेगाने वाढणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रात्री झोपताना असलेले कंपनीचे स्थान सकाळी उठल्यावर शाबूत असेलच याची शास्वती नसते. त्यामुळे भविष्याचा अचूक वेध घेण्याशिवाय आणि त्यासाठी योग्य त्या पद्धतीने अग्रेसर राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. इतिहास साक्षी आहे कि यात जो हुकला तो संपला!

सुनील खांडबहाले
एमआयटी स्लोन फेलो
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि, बोस्टन अमेरिका

Sidebar