शब्दांची डिजिटल क्रांती – चित्रलेखा दिवाळी अंक २०१७
खरं तर मला चित्रकार व्हायचं होतं. दहावी नंतर चित्रकलेलाच प्रवेश घ्यायचे असं मी मनोमन ठरवलेलही होतं. परंतु झाले वेगळच. दहावीला बोर्डात आलो. त्यामुळे कुणी म्हणे मुलाला डॉक्टर करा, कुणी म्हणे इंजिनिअर करा. ..झाले, शेवटी इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनारिंगच्या डिप्लोमा ला प्रवेश घेतला आणि एक नवीन संघर्ष सुरु झाला…
१४ मे २०१४. त्या दिवशी मार्क झुकेरबर्गचा वाढदिवस होता. वयाच्या ३० व्या वर्षात त्याने पदार्पण केले होते. संपूर्ण फेसबुक मध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. रंगीबेरंगी फुग्यांच्या गर्दीत उभा असलेला मार्क आणि जल्लोषात साजरा होणारा त्याचा वाढदिवस. खरं तर नवकल्पकतेचा आनंदोत्सव होता. त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होताना स्वप्नातही वाटलं नव्हतं की एक दिवस मला फेसबुकमध्ये काम करायला मिळेल. एक वेगळेच विश्व् अनुभवता आले आणि तसेच हायटेक जगतातले अनेक बारकावे देखील. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने खरे तर फेसबुक, गुगल, ड्रॉपबॉक्स, ऑटोडेस्क, जीई डिजिटल, पेपाल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, इंटेल, ईबे सारख्या एरव्ही आभासी जगतातील अनेक कंपन्यांना वास्तवात अनुभवण्याची संधी मिळाली. प्रचंड ऊर्जा असलेली आणि काही तरी नवीन करून दाखवत जग बदलवण्याची स्वप्न बघणारी तरुणाई आणि त्यांची खाण्यापिण्यापासून तर आरोग्य-मनोरंजनापर्यंत काळजी घेणाऱ्या कंपन्यांचा रम्य परिसर बघताना एखाद्या विद्यापीठात वावरत असल्याचा भास होतो. गुगल, फेसबुकचे कॅम्पस तर इतके मोठे आहेत कि एखादे वसवलेले शहर वाटावे. तिथे फिरताना मला तर अनेकदा प्रश्न पडायचा कि इथे जर सगळेच कर्मचारी हसण्या-खेळण्यात, दंगा-मस्ती आणि खाण्या-पिण्यात रमलेले असतात तर मग काम करतं कोण? बरं, इथे सर्व काही मोफत! खाण्या-पिण्याची तर चंगळच असते. वर्षभर अमेरिकेतले पिझ्झा-बर्गर खाऊन माझा जीव तर अगदी विटला होता. त्यामुळे फेसबुक मधले इंडियन किचन हे तर माझ्या सर्वात आवडीचे ठिकाण बनले होते. सिलिकॉन व्हॅलीत फिरताना पावला पावलाला भारतीय तरुण दिसतात यावरूनच सिलिकॉन व्हॅलीच्या एकूण प्रगतीत भारतीयांचे किती योगदान आहे हे वेगळे सांगावयास नको. सॅमसंग लॅब ला भेट देतानाही असाच काहीसा अनुभव आला. कर्मचाऱ्यांसाठी चोवीस तास आणि सातही दिवस खुल्या असलेल्या हायटेक संस्कृतीची तरुणाईला मोहिनी पडली नाही तरच नवल! तशी ती मलाही पडेल की काय याची भीती वाटत होती. ज्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून अनेक तरुण अमेरिकेची वाट धरतात अशा काही कंपन्यांचे प्रस्ताव धुडकावून मायदेशी परतणं खूप धाडसाचं होतं. पण त्यावेळी ते धाडस केलं याचा आज मनस्वी आनंद होतोय.
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एम.आय.टी. बॉस्टन हे जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ. तिथल्या अद्ययावत आणि भव्यदिव्य अशा कॅम्पस मध्ये अभ्यास करताना फ्लॅशबॅक सारखं मला माझे जिल्हा परिषद शाळेचे दिवस आठवले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पाचेकशे लोकवस्तीचं वांजोळे नावाचं एक छोटंसं खेडं. हातात हात देत एकमेकींच्या आधाराने जणू काही “मोडेन पण वाकणार नाही” असं म्हणत जिद्दीने उभ्या असाव्यात अशा चार भिंती. उन्हाळ्यात छानसा कवडसा तर पावसाळ्यात पावसाच्या सरींची चाहूल देणारे ते गळके छत. रात्री तिथं उंदीर घुशींची शाळा भरत असावी. रात्रभर त्यांनी पोखरलेल्या मऊ मातीवर बसायला कोण आनंद वाटायचा. एक दरवाजा अन एक खिडकी असलेल्या त्या शाळेला शिक्षकही एकच. वर्ग मात्र चार. पहिली ते चौथी. गुरुजींना रात्री झोप शांत लागत असणार नक्कीच. तसं नाशिक तालुक्यातील महिरवणी हे आमचं गाव. आम्ही मळ्यात राहायचो. झोपडी वजा घर. खाणारं एक तोंड कमी होईल म्हणून शिक्षणाला आत्त्याकडं. तसं आत्याकडेही खूप सुकाळ होता असं काही नाही पण किमान दूधदुभतं होतं आणि भातशेती मात्र उत्तम असायची. मजा होती. निरागस वाटावी अशी साधी माणसं, हिरवेगार डोंगरदऱ्या, वैतरणा धरणाचा मागचा भाग. गायी म्हशी पाण्यावर नेताना आमच्या पण मनसोक्त आंघोळी व्हायच्या. म्हशीच्या पाठीवर बसून पाण्यात विहार करण्याची मजा काही औरच. तिथं फक्त चौथीपर्यंतच शाळा असल्याने दुसऱ्या आत्त्याच्या गावाला म्हणजे तळेगावला जावं लागलं पुढच्या शिक्षणासाठी. शेतीकाम करून दररोज १४ किलो मीटर तंगड्या तोडत अनवाणी शाळेला जायचे. खूप खडतर प्रवास होता तो. आडरानातून, काट्याकुसळातून, चिंचोळ्या दगडांतून.. ऊन-वारा-पाऊस अंगावर घेत आम्ही मुलं मजेनं आरोळ्या द्यायचो “कशासाठी..शाळेसाठी.. कशासाठी..पोटासाठी..” मोठं झाल्यावर आपण कितीही जग बघितलं तरी सुद्धा बालपणीच्या आठवणी मनात घर करतात त्या कायमच्या हेच खरं. आणि त्यातून घडतात ते संस्कार. माझ्या आजोबा आज्जीचा खूप प्रभाव राहिला माझ्यावर. घरी अठराविश्वे दारिद्र्य असूनसुद्धा किमान एक तरी वाटसरूला जेऊ घातल्याशिवाय अन्नाला न शिवणारे माझे आजोबा. आणि घरी आलेल्याला रिकाम्या हाताने कधीच न जाऊ देणारी माझी प्रेमळ आज्जी. माणसं कशी जोडावी हे ह्या दाम्पत्यांकडून शिकलो. वडील माझे पक्के वारकरी. पंढरपूर आळंदी हेच त्यांच्यासाठी स्वर्ग. भजन कीर्तन म्हंटल तर खाणंही विसरणारे. भावंडानी वेगळं काढलं तेंव्हा फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथ काखेत घेऊन बाहेर पडले. आणि आमच्या साऱ्या घराचा खंबीर आधार म्हणजे आमची आई. शाळेचे तोंडही न पाहिलेली पण कसं कुणास ठाऊक, शिक्षणाची दूरदृष्टी असलेली ही माता मुलांच्या भविष्यासाठी अपार कष्ट उपसायला तयार झाली. म्हणूनच आम्ही घडलो. तिच्यामुळेच आम्हाला शाळेची गोडी लागली. आम्ही तीन भावंडं. माझे थोरले बंधू आज न्यायाधीश म्हणून सेवेत आहेत. माझे धाकटे बंधू पीएचडी नंतर आज शिक्षणसेवेत प्राध्यापक म्हणून रुजू आहेत. आणि मी इंजिनिअरींग आणि मेनेजमेंटचे शिक्षण घेऊन भाषा संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. आम्हाला खऱ्या अर्थाने परीसस्पर्श झाला तो शिक्षणाचा आणि जीवनाचे सोने झाले. जिल्हा परिषद शाळा ते एम.आय.टी पर्यंतचा प्रवास मोठा मजेदार राहिला.
खरं तर मला चित्रकार व्हायचं होतं. जमेल तसं माझा चित्रं काढण्याचा छंद मी कायम जोपासत असतो. चित्रं व्यक्तीला नवीन दृष्टी देतात. जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. चित्र म्हणजे एक अविष्कार असतो. निर्मितीचा तो एक निखळ आनंद असतो. दहावी नंतर चित्रकलेलाच प्रवेश घ्यायचे असं मी मनोमन ठरवलेलही होतं. परंतु झाले वेगळच. दहावीला बोर्डात आलो. त्यामुळे कुणी म्हणे मुलाला डॉक्टर करा, कुणी म्हणे इंजिनिअर करा. ..झाले, शेवटी इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनारिंगच्या डिप्लोमा ला प्रवेश घेतला आणि एक नवीन संघर्ष सुरु झाला…
माझं संपूर्ण शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं. इंग्रजी ही साहेबांची भाषा म्हणून तिचा खूप तिरस्कार केला शाळेत असताना. पण आता झाली का पंचाईत. काही समजायचं नाही आणि इंजिनिअरिंगचे सर्व शिक्षण हे इंग्रजीतून. बाकीची मुले प्रोफेसरला उत्तर द्यायची, प्रतिप्रश्न करायची. माझ्या तर सर्व डोक्यावरूनच जायचे. घाम सुटायचा. खूप घाबरल्या सारखं व्हायचं. आपल्याला हे झेपेल की नाही असं वाटत असतानाच काही मुलं तर अक्षरशः पळून गेली. मीही शिक्षण सोडण्याचा विचार केला. परंतु आई-वडील डोळ्यासमोर दिसू लागली. किती अपेक्षेने त्यांनी आपल्याला इकडं पाठवलं? आणि आपण असं मधेच पळून जायचं? नाही. आपण लढू असं मनाशी पक्क करत एका प्राध्यापकांसमोर माझी व्यथा मांडली. तू डिक्शनरीचा वापर कर असा मला सल्ला त्यांनी दिला. आयुष्यात पहिल्यांदा मी डिक्शनरी हा शब्द ऐकत होतो. त्यांच्या लक्षात आलं. माझी धांदल ओळखून त्यांनी स्वतःची डिक्शनरी मला दिली आणि ती कशी वापरायची ते पण शिकवलं. दररोज प्राध्यापक जे शब्द फळ्यावर लिहितात ती वहीत उतरवून रूम वर आल्यावर डिक्शनरीत पाहू लागलो. तेंव्हा कुठे मला अर्थ लागे की वर्गात काय शिकवलं जात होतं. प्रामाणिकपणे हेच सातत्य ठेवत वर्षभर डिक्शनरीचा सराव केला. वर्षाच्या शेवटी जेंव्हा निकाल लागला तेंव्हा समजलं की साठ पैकी फक्त चार विद्यार्थी सर्व विषयांत पास झालेत. मी त्यात नसणारच हे मला माहित होतं पण जेंव्हा निकाल घ्यायला गेलो तेंव्हा कळलं की मी अव्वल आलो होतो. बस्स त्याच वेळी मला माझ्या यशाचे रहस्य कळालं की आपण हे यश का मिळवू शकलो? तर फक्त डिक्शनरीला मित्र केल्या मुळच. त्याच क्षणी ठरविलं की आयुष्यात या मित्राची साथ कधीच सोडायची नाही. डिप्लोमा अभ्यासक्रमादरम्यान डिक्शनरी वापरण्याच्या नित्यक्रमातून तीन वर्षात माझ्याकडं वीसेक हजारांचा शब्दसंग्रह जमा झाला होता. त्यावेळी वाटलं की आपलं तर निभावलं. पण भाषिक अडथळ्यामुळे आपल्यासारख्या खेड्यातून आलेल्या मुलांना, मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना जीवनात अनेक दिव्यांना सामोरं जावं लागतं. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी खूप फरफट होते त्यांची. शिक्षण अर्धवट सोडतात, अभ्यासात मागे पडतात, भाषेवर प्रभुत्व नसल्याने मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. नोकऱ्या मिळाल्या तरी बढती मिळत नाही. विद्वता असूनही सिद्ध करता येत नाही. न्यूनगंड तयार होतो. व्यवसायाच्या अनेक चांगल्या संधी गमावून बसतात हे मी स्वत:च्या अनुभवातून शिकलो होतो. परंतु अशा अडचणींवर मी प्रयत्नपूर्वक मात करू शकलो होतो. “जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।” या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे शब्दकोश निर्मितीचा माझा निर्णय पक्का झाला. सुरुवातील झेरॉक्स म्हणजे सत्य प्रती वाटायला सुरवात केली. मग विचार केला पुस्तक छापावं. पण त्यासाठी लागणारा खर्च आणि त्याची उपयोगिता बघता नवकल्पक काही तरी करावं असं वाटू लागलं. त्यातून जन्म झाला डिजिटल शब्दकोश या संकल्पनेचा. परंतु मला संगणक येत नव्हतं. मग मी ज्या मित्रांना येतं त्यांच्याकडे मदत मागितली. त्याचा फार काही उपयोग नाही झाला. मग स्वतःच संगणक शिकावं या विचाराने एका नामांकित संगणक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज केला. त्यात पास देखील झालो. पण त्यासाठी आवश्यक खर्च मला न परवडणारा होता. मी त्यांना विनंती केली प्रशिक्षण शुल्क एकरकमी न देता हळूहळू करत देतो. तुमच्याकडेच झाडायचं-पुसायचं काहीतरी काम पण करेन. त्यावेळी वाईट वाटलं होतं पण त्यांनी माझी विनंती नाकारली याचा मला खरच आनंद होतोय आज. जे होतं ते चांगल्यासाठीच.
मी घर सोडलं. पळूनच गेलो म्हणता येईल. नाशिकलगतच्या सातपूर गावात एक छोट्याश्या खोलीत स्वतःला सहा महिने कोंडून घेतलं. सोबत होते मित्राचे एक संगणक आणि काही पुस्तकं. माझा एकलव्यासारखा अभ्यास सुरु झाला तिथं. पुस्तक वाचायचं आणि त्याप्रमाणे संगणकावर प्रात्यक्षिकं करून बघायची. वीस बावीस तास एका जागेवर बसून असायचो. दिवस रात्र कधी व्हायचे कळायचं नाही. तारीख-वाराशी काही संबध उरला नाही. इतका रमून गेलो मी संगणकाच्या दुनियेत की तहान-भूक आणि साऱ्या जगाचा विसर पडला. त्याचा परिणाम दुसऱ्याच समस्येत झाला. सतत च्या बसण्यामुळे पाठीचा, मणक्याचा त्रास सुरु झाला. इतका भयानक की ऑपरेशन करावे लागले. डॉक्टर बोलले की आता बैठं काम करूच नका. परंतु मी इतका जिद्दीला पेटलो होतो की संगणकाचा मॉनिटर स्क्रीन खुर्चीत ठेवला आणि मी टेबलावर छातीवर आडवा पडून माझं स्वयंशिक्षण सुरूच ठेवलं. खूप झपाटल्यागत काळ होता तो. परंतु त्या सहा महिन्यात मी जगातल्या सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे संगणकीय भाषा शिकलो. शेवटी मला हवे तसे डिक्शनरी सॉफ्टवेअर बनवलं आणि तयार झाला जगातील पहिला मराठी बोलता संगणकीय शब्दकोश. मी बनविलेल्या संगणकीय शब्दकोशाची वैशिष्ट्ये आणि नाविण्यपूर्णता बघता प्रसारमाध्यमांनीही चांगले वार्तांकन केले. विषयाला योग्य न्याय मिळाला. आणि इथून सारेच काही बदलले. अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या. संपर्क मिळाले. सूचना मिळाल्या. यातूनच अनेक भाषातज्ञ व जाणकारांशी मैत्री झाली. त्यांतली समाजशील मनाची माणसं एकत्र जोडली. पुढे इंग्रजी-हिंदी, हिंदी-इंग्रजी असे शब्द्कोशही बनविले आणि माझा विषय देशपातळीवर पोहचला. त्यानिमित्ताने सरकारी, निम-सरकारी, शैक्षणिक संस्थाना भेटी देण्याच्या संधी मिळाल्या.
पुढील येणारा काळ हा इंटरनेटचा असणार आहे याची चाहूल मला वेळीच लागली. त्यामुळे इंटरनेट वापरताना भविष्यात भाषेची अडचण अधिक प्रमाणात लोकांना भेडसावणार हे स्वाभाविकच होतं. तेंव्हा आपण संगणकासाठी बनविलेले शब्दकोश इंटरनेट धारकांनाही मिळायला हवेत असे वाटू लागले. वर्ष होत २००३-२००४. काळाची पावलं ओळखून मी आपले सर्व काम इंटरनेटवर टाकण्याचे ठरविले. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून योग्य ते बदल केले. आणि www.khandbahale.com या संकेतस्थळाची निर्मिती करत जागतिक पटलावर प्रवेश केला. हा माझ्या व्यावसायिक जीवनातील हा एक मैलाचा दगड. कारण यामुळे माझ्या कामाच्या सीमारेषा फक्त रुंदावल्याच नाही तर सीमारेषेचे बंधनच गळून पडले. त्यात अकल्पित दुग्धशर्करा योग म्हणजे इंटरनेट जगतातही पहिलावहिला मराठी शब्दकोश निर्मितीचा मानही आपल्यालाच मिळावा. इंटरनेट जग जरी माझ्यासाठी पूर्णत: नवीन होते तरी सतत शिकण्याच्या वृत्तीमुळे त्यात रमणे मला फारसे कठीण गेले नाही. एक-एक करत मी मराठी, हिंदी व नंतर इंग्रजी ऑनलाईन डिक्शनरी बनविली. सर्वप्रथम आणि एकमेव असल्या कारणाने देश-विदेशातून तिचा शोध होऊ लागला. खांडबहाले.कॉम नावारुपास येऊ लागली तसे अनेक वापरकर्ते, विविध भाषातज्ञ, अनुवादक मंडळी संपर्कात यायला लागली. यातूनच कल्पनामंथन, विचारांची देवाणघेवाण सुरु झाली. मराठी प्रमाणेच इतरभाषिकांनाही सारख्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं हे लक्षात आलं. यातूनच बहुभाषिक शब्दकोश बनविण्याची गरज मला भासू लागली. चांगल्या कामासाठी अनेकांना एकत्र करत विविध भाषेतही याच स्वरुपात शब्दकोश निर्मितीचा चंग मी बांधला. नवनवीन प्रयोग सुरु झाले. वृत्तपत्रे, प्रसिद्धी माध्यमांनीही चांगली दखल घेतली, किंबहुना त्यामुळेच जनमानसांत पोहचू शकलो. हुरूप वाढल्याने, नंतर पुढील काही वर्षांत अनेक भाषातज्ञांच्या मदतीने गुजराती, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली अशा बावीस भारतीय राजभाषांमध्ये ऑनलाईन डिक्शनरी बनविल्या. आजमितीला सुमारे दीडशे देशांतून पंधरा कोटी वापरकर्त्यांची संख्या असलेले खांडबहाले.कॉम हे भारतीय भाषांसाठीचे इंटरनेट वरील सर्वोत्तम श्रेणी प्राप्त झालेले संकेतस्थळ! साऱ्या जगभरातून दररोज लक्षावधी लोक येथे भेट देतात आणि शब्दांचे, त्यामाध्यमातून भाषांचे आदान प्रदान करतात. वेगवेगळ्या भाषांतील येथे उपलब्ध असलेल्या शब्दसंख्येने आज महासागराचे रूप धारण केले आहे.
भविष्याचा वेध घेत २००८ मध्ये मी मोबाईल प्रोग्रामिंगला सुरुवात केली. लक्ष होतं मोबाईल डिक्शनरी तयार करणं. येणारी क्रांती मोबाईल क्षेत्रातच होईल हे माझं अनुमान अचूक होतं. त्या वेळी १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात १० कोटी इंटरनेटधारक हा आकडा तसा समाधानकारक मुळीच नाही परंतु ९० कोटी मोबाईलधारकांची संख्या मात्र निश्चित आशादायी आहे. २०१० मध्ये जेंव्हा आम्ही मराठीतली पहिली मोबाईल डिक्शनरी जगाला देता आली. कोणत्याही मल्टीमेडिया फोनवर चालू शकणारे व आकाराने रिंगटोन पेक्षाही छोटे डिक्शनरी अप्लिकेशनस् भारतीय भाषांमध्ये विकसित केल्याने नोकिया, सॅमसंग, सोनी सारख्या मोबाईल कंपन्यांनीही सन्मानित केले. गुगल प्लेस्टोअर वर खांडबहाले डिक्शनरी अँप्स खूप लोकप्रिय आहेत आणि सर्वाधिक डाउनलोड केली जातात. संशोधन हे सर्वसमावेशक असावे म्हणजे समाजातील गरजू घटकाला त्याचा लाभ घेता येऊ शकतो. साध्यातील साध्या फोनवरदेखील देखील वापरता येऊ शकेल अशी एस.एम.एस. डिक्शनरी अर्थात लघुसंदेश शब्कोश आम्ही बनू शकलो. आम्ही आता गावोगाव जाऊन, शाळा-कॉलेजात जाऊन विद्यार्थ्यांना त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली.
शिक्षणाने माझं माझ्या कुटुंबाचं जीवन अंतर्बाह्य बदलून गेलं. आपल्याला झालेला शिक्षणाचा परिसस्पर्श समाजातील गरजूंना देखील व्हावा यासाठी ग्रामीण भागात छोटीशी शाळा सुरु केली. दळणवळणाच्या साधनांचा अभाव, खराब रस्ते यामुळे दूर गाव खेड्यावरची मुलं येऊ शकत नव्हती म्हणून “एज्युकेशन ऑन व्हिल्स” म्हणजे फिरती शाळा उपक्रम सुरु केला. मला जसं संशोधनाची संधी मिळाली, लोकांचं सहकार्य मिळालं तसं शहरातील तरुण पिढीला मनातलं प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळावं म्हणून विचार सुरु असतानाच शहरात कुंभमेळा येऊ घातला होता. शहरातील पदवीधर मुलांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याची ती योग्य संधी होती. माझे समविचारी मित्र व मी मिळून कुंभमेळ्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीच्या कार्यशाळांचे शहरभर आयोजन सुरु केले. शहर आणि देश-विदेशातून पंधराशेहून अधिक विद्यार्थी संशोधक सहभागी झाले. सोबत सरकारी यंत्रणा, शैक्षणिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक-व्यावसायिक, भांडवलदार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या. त्यातून नवसंशोधनाची मोठी चळवळ शहरात उभी राहिली. नोकरीच्या शोधात शहर सोडणारे पदवीधर स्वतःच्या व्यवसायाचा विचार करू लागले. एमआयटी, गुगल, मॅक्रोसॉफ्ट, इंटेल, फेसबुक, महिंद्रा, टीसीएस, युनिलिव्हर सारख्या कंपन्या सहभागी झाल्या. इन्होवेशन कल्चर अर्थात संशोधन-संस्कृतचं बीज रोवलं गेलं. अल्पावधीत त्याचा वृक्ष होऊन फळंही मिळायला सुरुवात झाली. नुकतंच टीसीएस फाउंडेशन ने संपूर्ण अद्ययावत असं संशोधन केंद्र शहरात उभं केलंय. तिथे शहरातील तरुण राज्य आणि देशपातळीवरील संशोधकांसोबत अनेक स्थानिक आणि जागतिक स्वरूपातील संशोधन करण्यात व्यस्त आहेत. विचार करा कि आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशात देखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही हजारो वर्ष निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरू शकता. अतिशयोक्ती वाटते ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात आल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे हे वेगळे सांगावयास नको. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत आहे. दररोज निर्माण होणारा हा डाटा इतका मोठा आहे की जगभरात असलेला ९० टक्के डाटा केवळ मागील दोन वर्षात निर्माण झाला आहे. बिग-डाटा च्या प्रभावामुळेच संशोधनाची गती वाढण्यास नजीकच्या काळात मदत झाली आहे. वाढते शहरीकरण, बेरोजगारी, इंधन-ऊर्जा नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा, गरिबी, दळणवळण, भ्रष्टाचार, ग्लोबल वार्मिंग या आणि अशा अनेक समस्यांकडे तंत्रज्ञांच्या माध्यमातून नवसंशोधनाची एक व्यावसायिक संधी म्हणून बघितल्यास भारतासारखा देश जगाच्या विकासाला सर्वसमावेशक आणि निर्णायक अशी दिशा देऊ शकतो. स्मार्ट तंत्रज्ञान, आयओटी, आर्टिफिशियल इंटीलीजेंस, व्हर्चुअल रियालिटी, बिग डेटा सारखी नवीन क्षेत्र तरुणांना खुणावत आहेत. मानवाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी संशोधनाच्या दृष्टीने देशातला तरुण उभा राहिला पाहिजे. नोकरी मागण्यापेक्षा रोजगारनिर्मिती केली जाऊ शकते. आपल्या देशात पुरेसं कार्यक्षम मनुष्यबळ आहे. प्रतिभा प्रत्येकाकडं असते मात्र त्याला योग्य वेळी योग्य ते व्यसपीठ आणि मार्गदर्शन मिळायला हवं यासाठी प्रयन्त सुरु आहेत.
मी काही खूप भव्यदिव्य काम केले असे मला बिलकुल वाटत नाही. विद्यार्थीदशेत इंग्रजीवर मात करणे ही माझी तत्कालीन गरज होती. ‘परिस्थिती माणसाला घडवत असते’ तसा मी घडत गेलो. ‘गरज ही शोधाची जननी असते’ तसा शोध लागत गेला. हां, एक मात्र मी जरूर केले की मला लागलेला शोध स्वत:पुरता न ठेवता इतरांसोबत वाटत गेलो. ‘ज्ञान वाटल्याने वाढते’ तसे माझेही वाढले. अडचणीही अनेक आल्या पण मी त्यावर हिमतीने मात करत सातत्याने पुढे चालत राहिलो. कारण केवळ स्वप्नरंजनात गुंगून जाऊन ध्येयपूर्ती होत नसते. ”असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी” असे म्हणून स्वस्थ बसून केवळ मनोरथांचे इमले बांधून काहीच साध्य होत नसते याची मला जाणीव होती. या सर्व प्रवासात मी इतका तल्लीन झालो की हेच काम पुढे माझी जिद्द कधी आणि कशी बनले ते माझे मलाच कळलं नाही. प्रतिकूलतेच्या भट्टीत जेव्हा ही जिद्द तावून-सलाखून निघते आणि वास्तवतेच्या ऐरणीवर भल्याबुऱ्या अनुभवांचे घाव तिच्यावर बसतात, तेव्हाच तिला खरा आकार मिळतो.
– सुनील खांडबहाले (एमआयटी स्लोन फेलो) मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि, बोस्टन, अमेरिका.