संगणकावर मराठीत कसे लिहावे?

इंग्रजीचे आक्रमण समर्थपणे पेलण्यासाठी ‘मराठीत बोला, मराठीत लिहा’ हा मंत्र जपला तरच आपली मराठी भाषा तग धरून राहील, ही वस्तुस्थिती आहे. संगणकावरही मराठीत ई-मेल, चॅटिंग करण्याची मजा अनुभवता यावी, यासाठी हा लेखप्रपंच..

‘मराठी’चा मुद्दा नेहमीच तारस्वरात मांडला जातो, पण आज सगळीच क्षेत्रे व्यापत चाललेल्या संगणकाच्या माध्यमाद्वारे होणाऱ्या सुलभ संपर्क यंत्रणेचा विचार करता मात्र, ‘मराठी’बाबत जणू प्रश्नचिन्हांची मालिकाच उभी ठाकते.त्यातही मुख्यत: भेडसावते ती ‘फॉन्ट’ची समस्या. परिणामी संगणकावर एकाने मराठीत लिहिलेला मजकूर दुसऱ्याला वाचता वा पाहाता येईलच, अशी स्थिती नाही. पण अलीकडे ही अडचण दूर सारण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत आणि ते देखील अगदी मोफत!  अनेकदा या पर्यायांबाबत ऐकून माहिती असते, पण प्रत्यक्षात ते डाऊनलोड कसे करायचे, वापरायचे कसे त्याविषयी संभ्रम असतो. हे पाहता त्या अनुषंगाने प्रात्यक्षिकासह केलेली प्रश्नोत्तररूपी मांडणी..

संगणकावर मराठीत कसे लिहावे? नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न. त्यावर अनेक तज्ज्ञांची अनेक मते. विविध माध्यमांचे विविध मार्गदर्शन. त्यामुळे एकच कोलाहल निर्माण होतो. असो, आपण आता मूळ मुद्यावर येऊ आणि त्यासाठी काही प्रश्नांची प्रात्यक्षिक पद्धतीने उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करू, जसे :
संगणकावर मराठीत कसे लिहावे ?
त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर आहे ?
ते कुठे मिळते?
त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील का?
ते कसे इन्स्टॉल करायचे ?
आणि ते कसे वापरायचे ?

आता एक एक करून त्यांची उत्तरे पाहू.

१) संगणकावर मराठीत कसे लिहावे ?
संगणकावर मराठी लिहिणे अतिशय सोपे आहे आणि त्यासाठी कुठलेही प्रशिक्षण घेणे गरजेचे नाही. अगदी संगणकाचे जुजबी ज्ञान असेल तरी देखील आपण मराठीत संगणकावर लिहू शकतो, हे विशेष.

२) त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर आहे ?
अनेक सॉफ्टवेअर बाजारात आहेत. तुम्ही Marathi Typing असे इंटरनेटवर सर्च केले की अनेक पर्याय समोर येतील. सगळ्यांनी नावे व कृती एकाच वेळी सांगून इथेच  गोंधळ नको, म्हणून आपण एक एक करून बघू. त्यातही मोफत व सर्वत्र सहजतेने उपलब्ध पर्यायांचा प्राधान्याने विचार करू.

३) ते कुठे मिळेल ?
ही सॉफ्टवेअर दोन प्रकारांमध्ये मोडतात. ऑनलाइन मराठी लिहिण्याची सेवा आणि ऑफलाइन मराठी लिहिण्याची संगणक प्रणाली. ऑनलाइन सेवा ही तात्काळ व तुलनेने वापरण्यास अधिक सोपी आहे. परंतु त्यासाठी इंटरनेट सतत सुरू ठेवणे गरजेचे आहे. ऑफलाइन प्रकारात ही सर्व सॉफ्टवेअर त्या त्या वेबसाइट वरून डाऊनलोड करून घेता येतात. नंतर इंटरनेट सुरू नसले तरी चालते. काहींच्या सीडीज् देखील बाजारात उपलब्ध आहेत.

४) त्यासाठी काही पैसे द्यावे लागतात का?
यातील बरीचशी सॉफ्टवेअर मोफत असली तरी काहींसाठी पैसे मोजावे लागतात.

५) ते कसे ‘इन्स्टॉल’ करायचे ?
संगणकावर मराठी लिहिण्याच्या पहिल्या ऑनलाइन प्रकारात कुठलेही सॉफ्टवेअर डाऊनलोड अथवा इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच ऑनलाइन मराठी लिहिणे हा प्रकार खूप सोपा आणि सर्वाना सहज जमण्यासारखा आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण हा मराठी लिहिण्याचा ऑनलाइन पर्याय जाणून घेऊ. त्यासाठी तुमच्याकडे हवे केवळ इंटरनेट कनेक्शन. प्रत्यक्षात ते कसे वापरता येते ते आता आपण पाहू. प्रथम इंटरनेट सुरू  करा. त्यावर http://www.google.com/transliterate/Marathi ही वेबसाइट उघडा. खालील प्रमाणे चित्र दिसेल.

.. आता मराठीत फोनेटिक पद्धतीने म्हणजेच उच्चारा प्रमाणे लिहायला सुरू करा. (जसे ata  – आता, marathi – मराठी, liha – लिहा.) इथे मराठीत लिहिलेले तुम्ही हवे तिथे Copy & Paste करू शकता.
अशीच आणखी एक चांगली वेबसाइट बघू- जी लिहिताना मराठी शब्ददेखील सुचवते.

http://www.quillpad.in/editor.html ही वेबसाइट उघडा. खालील प्रमाणे चित्र दिसेल.
मराठी भाषा निवडा आणि उच्चाराप्रमाणे लिहायला सुरू करा. जसे ‘नमस्कार’ लिहिण्यासाठी namaskar आणि ‘भारत’ लिहिण्यासाठी bharat . याशिवाय http://www.marathityping.com/ तसेच http://www.gamabhana.com/gambghana pro/  या आणखी काही वेबसाइटस् की ज्या ऑनलाइन मराठी लिहिण्यासाठी आपल्याला मदत करतात. तुम्हाला जी सोयीची वाटेल ती वापरा. शेवटी आपल्याला संगणकावर मराठीत लिहिता येणे महत्वाचे!
आतापर्यंत आपण बघितले ऑनलाइन मराठी लिहिण्याबद्दल; परंतु सतत काही इंटरनेट सुरू ठेवणे शक्य नसते. बऱ्याचदा आपण ऑफलाइन काम करणे पसंत करतो. म्हणून ऑनलाइन सारखीच सुविधा इंटनेटशिवाय मिळू शकली तर अधिक बरे होईल, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यात निराश होण्याचेही काही कारण नाही. मग आपण ऑफलाइन सॉफ्टवेअरचाही विचार करायला हवा. हे ऑफलाइन असल्यामुळे आणि त्यातूनही ते सॉफ्टवेअर असल्यामुळे डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागते, हे आधी लक्षात घेतले पाहिजे.
वेळ आणि जागेअभावी आपण फक्त मोफत मिळणाऱ्या काही सॉफ्टवेअरची माहिती बघू. त्यातही  Windows ही Operating System (OS) तथा संगणक प्रणाली सर्वपरिचित व अधिक वापरात असल्याने या लेखात केवळ विंडोजबद्दलच बोलू.

सर्वप्रथम तुमच्याकडे हव्यात तीन गोष्टी :
१) संगणक
२) विंडोज इन्स्टॉलेशन सीडी
३) इंटरनेट सुविधा
आता खालील प्रमाणे कृती करा.
१) सर्वप्रथम संगणकावरील सर्व प्रोग्राम्स बंद करा.
२) आता इंटरनेट सुरू करा.
३) http://www.google.com/ime/transliteration/ वेबसाइट ओपन करा.
खालील प्रमाणे चित्र दिसेल.
४) मराठी भाषा निवडा व डाऊनलोड बटनाला क्लिक करा.
५) Run बटनला क्लिक करा. डाऊनलोडींग सुरू होईल. पुढे काही प्रश्न विचारल्यास सकारात्मक उत्तरे द्या. जसे Yes, Accept, allow, OK, Continue इत्यादी.

६) I Accept ला टिक करून Next बटनावर क्लिक करा.
७) तुमचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले.
आता पुढे काय? – तर ते सेट करायचे.
८) My Computer मध्ये जाऊन Control panel ओपन करा.
९) Control panel मधील Regional and Language सेटिंग उघडा.
१०) Language टॅब निवडा व Install Files For Comples Script &…  ला टिकमार्क केलेले नसल्यास टिकमार्क करून Apply करा. (वरील सर्व स्क्रीन विंडोज एक्स पी च्या आहेत. Window, Vista, Windows 7 यांच्या स्क्रीन्स देखील थोडय़ाफार फरकाने सारख्याच आहेत. तरी देखील इंग्रजी समजणाऱ्यांसाठी अधिक मदत http://www.google.com/ime/transliteration/help.html  या संकेतस्थळावर दिलेली आहेच.)
११) या प्रोसेस दरम्यान तुम्हाला विंडोजची सीडी विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे विंडोजची इन्स्टॉलर सीडी ही सीडी-रॉममध्ये टाका व पुढील सूचनांचे पालन करा.
१२) ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खालील चित्रात दर्शविल्याप्रमाणे Details  बटन दाबा.
१३) Details मध्ये गेल्यावर तुम्हाला  Google Marathi Input दिसेल. त्याला क्लिक करा आणि Key Settings बटन चित्रात दाखविल्याप्रमाणे क्लिक करा.

१४) आता आपल्या संगणकात इंग्लिश व मराठी अशा दोन भाषा असल्यामुळे त्या दोन्हीपैकी हवी ती वापरता येणे आवश्यक आहे. म्हणून Switch between input languages चा पर्यायनिवडून खालील चित्राप्रमाणे Change Key sequence ला क्लिक करा.
१५) खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल. त्यात Switch input language आणि Switch Keyboard layout  हे दोन्ही पर्याय निवडा आणि सगळी OK ची बटने दाबत दाबत बाहेर पडा.
१६) तुमचे कॉम्प्युटर आता मराठी लिहिण्यासाठी तयार झाले.
१७) परंतु मराठी लिहिण्यासाठी एकदा कम्प्युटर  फी२३ं१३  म्हणजे बंद करून चालू करणे गरजेचे आहे.

.. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ते वापराचे कसे ?
१८) संगणकावरील कोणताही एडिटर प्रोग्राम सुरू करा, जसे-Word, Notpad,  Excel, email इत्यादी.
१९) किबोर्डवर Alt + Shift ही दोन्ही बटन्स एकाच वेळी दाबा. यानंतर मराठी सुरू हाईल.
२०) पुन्हा Alt + Shift दाबल्यास इंग्रजी लिहिता येईल.
२१)  Task Bar वरील Language Bar वरील बटनांचा उपयोग करून भाषा बदलवता येते. अशा पद्धतीने इंग्रजीत व मराठीत हवे तसे लिहिता येते.

मराठी टायपिंग हे Phonetic म्हणजे उच्चाराप्रमाणे असल्यामुळे लिहिणे खूप सोपे आहे जसे- पाणी लिहायचे झाल्यास Pani  असे टाईप करा, भारत – bharat, घर – ghar, आशीर्वाद- ashirvad इत्यादी. आहे की नाही सोपे ! आणि विशेष म्हणजे हे युनिकोडमध्ये आहे. काही शब्द सुरुवातीला येत नसतील तर स्क्रीनवरील किबोर्ड आहेच मदतीला. मी देखील हा संपूर्ण वार्तालाप याच सॉफ्टवेअरच्या मदतीने लिहिला आहे. वरील सर्व कृती ही जरा वेळखाऊ वाटत असली तरी एकदाच करावी लागेल. अर्थात, तुम्ही एखाद्या संगणक जाणकारालाही कामाला लाऊ शकता; परंतु स्वत: केल्याचे समाधान काही औरच नाही का? म्हणूनच जरा सविस्तर मांडणी केली. आणि हे समाधान मिळणे अधिक सोयीचे व्हावे म्हणून मित्रांच्या सल्ल्यानुसार याचे व्हीडीओ प्रात्यक्षिकही तयार केले आहे. www.khandbahale.com/articles वर तुम्ही ते बघू शकता. इतरांनाही सांगा आणि आपली मराठी संगणकावर झळकू द्या, संगणकाद्वारे मराठीत एकमेकांशी संपर्क साधा, विचारांची देवाण-घेवाण करा.

 
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक अनोखी भेट मोफत ई-बुक : संगणकावर मराठी कसे लिहावे?
https://issuu.com/khandbahale/docs/e_book_how_to_type_marathi_on_computer?viewMode=doublePage&e=4383290/5182398

Published article link : http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=138973:2011-02-25-12-39-14&Itemid=1

Sidebar