कनेक्टिंग वर्ल्ड की कलेक्टिंग डेटा

गेल्या ५ आठवड्यात रिलायन्स जिओमध्ये तब्ब्ल ५ जागतिक कंपन्यांनी एकूण ७८,५६२ करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. पैकी फेसबुक (समभाग ९.९ टक्के, गुंतवणूक – ४.६२ लक्ष करोड), सिल्व्हर लेक(समभाग – १ टक्के, गुंतवणूक – ५६५५.७५ करोड), विस्टा(समभाग – २.३ टक्के, गुंतवणूक ११,३६७ करोड), जनरल अटलांटिक(समभाग १.३४ टक्के, गुंतवणूक ६,५९८.३८ करोड) आणि केकेआर(समभाग – २.३२ टक्के, गुंतवणूक – ११,३६७ करोड). सामान्य माणसास प्रश्न असा पडतो की, रिलायन्स जिओकडे असे काय आहे की, कोरोना व्हायरस अर्थात कोव्हिड-१९ हे जागतिक महामारी संकट आणि अगदी जागतिक मंदीच्या काळात देखील इतक्या मोठ्या प्रमाणात ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करू शकले? 

अर्थातच याचे उत्तर आहे – “रिलायन्स जिओचे तब्ब्ल ३८८ दशलक्ष भारतीय वापरकर्ते!” जगाची १७.७ टक्के अर्थात १.३८ अब्ज लोकसंख्या असलेला भारत देश डिजिटल क्रांतीच्या संक्रमणातून प्रवास करत असताना, आधुनिक भारतीय उपभोक्त्यास अखंडित व वेगवान इंटरनेट-जोडणीची ऊर्जा देणारा व एकार्थाने भारतीय मोबाईल नेटवर्कवरती वर्चस्व गाजवणारा रिलायन्स जिओ देशपातळीवर संधी करण्यासाठी अनेक जागतिक कंपन्यांचे आकर्षण ठरेल यात नवल ते काय? आणि दुसरे म्हणजे, मोठ्या बाजारपेठेसोबतच गुंतवणूकदारांस हवा असतो तो दूरदृष्टी असलेला उद्योजक, प्रभावी नेतृत्व, मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात अंगभूत सुविधा असलेली संस्था, त्यांचे कुशल मनुष्यबळ आणि त्यातली त्यात विद्यमान सरकार दरबारी जर चलती असेल तर मग पाचही बोटे तुपातच ! ५ सप्टेंबर २०१६ ला अधिकृतरीत्या श्रीगणेशा केलेल्या रिलायन्स जिओने अल्पावधीतच ३१.७ टक्के मोबाईल बाजारपेठेवर ताबा मिळवत भारतातील सर्वात मोठे तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याचा मान मिळवला. खंडित आणि मंद वेगाने चालणारे इंटरनेट, डेटासाठी मोजावी लागणारी अवाजवी किंमत अशा भारतीय नेटकऱ्यांच्या अडचणी रिलायन्सने योग्य वेळी अचूक ओळखल्या आणि देशभर आपल्या फायबरऑप्टिक्स जाळ्याचा विस्तार करत सुरुवातीला ६ महिने मोफत सेवा देऊन डेटा क्षेत्रात ‘प्राईस-वॉर’ अर्थात किंमत-युद्ध सुरु केले. त्यामुळे रिलायन्सची लोकप्रियता शिखरावर पोहचली. अनेक दशके टेलिकॉम क्षेत्रातील प्रस्थापित दिग्गज्जांना जे जमलं नाही ते रिलायन्सने स्वबळावर अल्पावधीत करून दाखवलं. काहीही असो, डेटा-रिव्होल्यूशन अर्थात ‘डेटा-क्रांती’ चे रिलायन्स जिओ हे जनक ठरले हे मात्र मान्य करावेच लागेल. उपरोक्त भागीदारीचा विचार करताना, गुंतवणूकदारांची पार्श्वभूमी व गुंतवणूक करण्याची त्यांची पद्धती देखील लक्षात घ्यायला हवी. यातील बहुतेक गुंतवणूकदार डिस्ट्रप्टिव्ह अर्थात विदारी तंत्रज्ञान, क्रांतिकारी व्यवसाय योजना यामध्ये विनियोग करणारे राहिले आहेत तर विशेष चर्चेचा विषय ठरलेल्या फेसबुकसाठी क्रमांक २ ची लोकसंख्या असलेली महाकाय भारतीय बाजारपेठ ही नेहमीच आकर्षण राहिली आहे. यामध्ये फेसबुक आर्थिक देवाणघेवाण, वस्तू खरेदी-विक्री अशा सुविधा देऊ करत, केवळ संवादाचे साधन म्हणून लोकप्रिय असलेल्या आपल्या मेसेंजिंग ऍप ‘व्हाट्सऍप’चा विस्तार व्यापक व्यापारक्षेत्र-व्यासपीठामध्ये करू पाहत असल्याचे समजते. परंतु मुख्य म्हणजे नफा-विभागणी तत्वावर, जिओद्वारे मिळणाऱ्या उपभोक्त्यांच्या अति-सखोल व गुणवत्तायुक्त डेटाच्या आधारे फेसबुक आपला जाहिरात व्यवसाय अधिक बळकट तर करेलच, सोबत ‘ट्रैंज़ैक्शनल रेव्हेन्यु’ म्हणजेच प्रत्येक आर्थिक प्रक्रियेवर महसूल मिळविण्याचा उत्पन्न-स्त्रोत उभा करू शकेल. 

व्यावसायिक भागीदारी ही नेहमी दुतर्फा फायद्याच्या मुद्द्यांवर होत असते. प्रथमपक्षी, गेल्या अनेक वर्षांपासुन तोट्यांत असलेल्या उद्योगधंद्यांमुळे रिलायन्सवर १.६१ लक्ष कोटीचे कर्ज होते. त्यामुळे आर्थिक-वर्षाअखेरीस कर्ज कमी करण्यासाठी व खेळते भांडवल उभे करत आपल्या शेअर-बाजारात उर्जितावस्था निर्माण करण्यासाठी रिलायन्सला परकीय गुंतवणूक आवश्यकच होती. सदर व्यावसायिक भागीदारीमुळे रिलायन्सला आपल्या उद्देशात अपेक्षित असे यश मिळाले. तर दुसरीकडे, फेसबुकचे एकट्या भारतात २८० दशलक्ष आणि फेसबुकच्या व्हाट्सऍपचे ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. असे असले तरी जागतिक सोशियल मिडिया स्पर्धेत फेसबुकची अनेक आघाड्यांवर पीछेहाट झालेली दिसत आहे. जगातील सर्वात मोठी डिजिटल सोसायटी असलेल्या भारतीय बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवण्यासाठी फेसबुकचे ‘फ्री-बेसिक्स’, ‘एक्सप्रेस वाय-फाय’ सारखे प्रयत्न फसले. मागील काही वर्षांत इंटरनेट वरील फेसबुककरांची घटती संख्या आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वाढता आलेख बघता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फेसबुकने १९ बिलियन डॉलरला विकत घेतलेल्या व्हाट्सअपने फेसबुकला तारले. सामाजिक वाणिज्यस्टार्टप ‘मिशो’, शैक्षणिक स्टार्टप ‘अनअकॅडेमी’ सह इतर काही भारतीय स्टार्टअप्समध्ये फेसबुकने वेळोवेळी केलेली भरघोस गुंतवणूक फेसबुकची भारतीय बाजारपेठेविषयी असलेली विशेष ओढ अधोरेखित करते. ‘केम्ब्रिज अनॅलिटीका’ घोटाळा प्रकरण समोर आल्यापासून ‘डेटा-सुरक्षा’ विषयक गमाविलेली विश्वासहर्ता पुन्हा मिळविण्यासाठी फेसबुक सतत धडपडत आहे. दुर्दैवाने भारतामध्ये डेटा-सुरक्षा-गोपनीयता विषयक हवी तशी जागरूकता आजून निर्माण झालेली नसल्याने, भारताच्या वापरकर्त्यांवर फेसबुकची भिस्त टिकून राहिली. परंतु अगदी अलीकडे चीनचे ‘बाईटडान्स टिकटॉक’ हे नवीन स्पर्धक ३५० दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांसह अधिक लोकप्रिय ठरत असल्याने फेसबुकसाठी भारतीय स्मार्टफोन-बाजारपेठेत नवीन ऊर्जा मिळणे आवश्यक झाले होते. या व्यावसायिक भागीदारीच्या निमित्ताने उभय पक्ष आपापल्या व एकत्रित वृद्धीची नवीन समीकरणं मांडताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षांपासून फेसबुक भारतात आपली ‘व्हाट्सऍप्प-पे’ ही  पेमेंट सेवा प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे परंतु भारत सरकारच्या कडक नियमावलींच्या तडाख्यात तो प्रस्ताव अडकून पडला. रिलायन्सचे सर्वेसर्वा यांच्याशी हातमिळवणींने तो सुलभ होईल असे फेसबुकच्या मनीमानसी असल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. किंबहुना जिओ पेमेंट बँक च्या मदतीने व्हॉट्सऍप-पे वाणिज्य क्षेत्रात आपले भविष्य आजमावु शकेल. तर रिलायन्ससाठी जिओटिव्ही, जिओसान, जिओपे तसेच विविध उत्पादने विकणारा ब्रॅण्ड जिओमार्ट भारतात ४०० दशलक्ष वापरकर्ते असलेले व्हाट्सऍपच्या लोकप्रियतेच्या हायवेवर वेग पकडू शकेल असा कयास रिलायन्सचा असावा. 

थोडक्यात उभय पक्ष चीनच्या ‘वुईचाट’ ऍपची प्रतिकृति भारतात सुरु करू इच्छिताना दिसतात. परंतु, फेसबुक-जिओच्या व्यावसायिक संधीमुळे जिओ सेवा वापरणाऱ्या भारतीय नागरिकांचा डेटा फेसबुकच्या हातात जाईल हे वेगळे सांगावयास नको. मागे मी एका लेखात यासंदर्भाने एक वक्त्यव्य केले होते की, भविष्यात मानव जातीला सर्वात मोठा संभाव्य धोका कुठला असू शकतो? अणूयुद्ध ? जागतिक तापमानवाढ? पाणी प्रश्न? की अगदी परग्रहावरील जीवसुष्टीकडून होणारा हल्ला? … तर, माझ्या मते मानव जातीला सर्वात मोठा धोका हा आहे तो असा की, “समस्त मानव जातीच्या मेंदूचा ताबा जगातील काही मोजक्या लोकांच्या हाती असणे”.  १९९० मध्ये, संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-लीने वर्ल्ड-वाईड-वेब (डब्लू.डब्लू.डब्लू) चा शोध लावला. १९९५-२००० च्या काळात ‘डॉट-कॉम’ युग उदयास आले. तेंव्हा इंटरनेटवरील अधिकतर माहिती एकतर्फी (सर्व्हर साईडेड) आणि स्थिर (स्टॅटिक) स्वरूपात होती. आपापल्या व्यवसायविषयक प्रबोधन व्हावे एवढाच उद्देश होता. पुढे जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतसे इंटरनेटचे स्वरूप परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) होऊ लागले. स्थिर माहितीने गतिमान (डायनॅमिक) स्वरूप घेतले. माहितीचे आदानप्रदान वाढू लागले व त्यामुळेच डेटाचे महत्व देखील तंत्रज्ञान कंपन्यांच्या लक्षात येऊ लागले. पैसा, मानवसंसाधन, पायाभूत सुविधा यासोबतच डेटा देखील एक संपत्ती (असेट) आहे हे त्यांना कळून चुकले. १९९७ मध्ये ‘सिक्स डिग्रीज’ नावाची पहिली सामाजिक माध्यम (सोशिअल मीडिया) संकेतस्थळ (वेबसाईट) सुरु झाले. १९९९ मध्ये ब्लॉगिंग सुरु झाल्यानंतर २००० मध्ये लिंक्ड-इन, मायस्पेस, २००५ मध्ये युट्युब तर २००६ मध्ये फेसबुक ने सामाजिक-माध्यमाच्या रूपाने इंटरनेटची परिभाषाच बदलून टाकली. लोकांची अधिकाधिक माहिती गोळा करणे आणि प्राप्त माहितीच्या विक्रीतून पैसे मिळविणे हेच त्यांचे उत्पन्नाचं साधन (‘बिजनेस मॉडेल’) बनले. साधारणतः २००४ पासून डाटा-अनॅलिटीकस अर्थात माहिती विश्लेषण सुरु झाले. त्यातून जणू या कंपन्यांना अलिबाबाची गुहाच हाती लागली. या काळात केवळ आपल्या व्यवसायाशी निगडित माहिती संकलित केली जात होती परंतु चव लागल्यावर थांबतील ते व्यावसायिक कसले? अधिक व्यवसाय, अधिक नफेखोरी त्यांना खुणावू लागली. तसतशी असंबंध व्यावसायिक जगतातून देखील लोकांची सार्वजनिक, व्यक्तिगत, आर्थिक, गोपनीय माहिती येनकेनप्रकारे जमा करण्याचा ह्या मंडळींनी सपाटाच लावला. एव्हाना निर्मात्यांना कळून चुकले की लोकांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर त्यांना सोशल मीडियावर जास्त काळ खिळवून ठेवण्याची गरज आहे. ह्यातूनच ‘उपभोक्ता-गुंतवणूक’ (यूजर-एंगेजमेंट) असा गोंडस शब्दप्रयोग जन्माला आला. 

सोशल मीडियावर आपल्या प्रत्येक हालचालीवर तंत्रज्ञानाची बारीक पाळत असते. आपण उठतो कधी, झोपतो कधी, कुठे जातो, कुणाशी बोलतो, काय बोलतो, आपल्या आवडी-निवडी, प्रतिक्रिया, आपण कुठल्या कारणाने आनंदी होतो, व्यथित होतो, उल्हसित होतो, प्रक्षुब्ध होतो अशी आपली आणि आपल्या एकंदरीत सवयी-स्वभाव व नातेसंबंधांची कुंडलीच सोशल मीडियाकडे असते. आपला ऑनलाईन वापर, माहितीचे आदानप्रदान, आर्थिक व्यवहार, सांस्कृतिक चालीरीती, आर्थिक स्तर, सामाजिक, राजकीय मतं याचे सखोल आणि सूत्रबद्ध विश्लेषण केले जाते. कृत्तीम बद्धिमत्ता प्रणाली (आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अल्गोरिथम) याचा प्रभावी वापर करून, आपल्याला काय हवं-नको ते ठरवलं आणि दाखवलं जातं. आपल्या वर्तुणुकीचा अभ्यास करून कुठल्या गोष्टीस आपण कसे प्रतिसाद देऊ याचा अनुमान (प्रेडिक्शन) बांधला जातो. त्यानुसार आपल्यावर भावनिक व मानसिक प्रयोग केले जातात. सोसिअल पोस्ट्स, ईमेल, जाहिराती यांच्या माध्यमातून माहितीचा भडीमार केला जातो. कोण-किती-कसा व केंव्हा खर्च करतो यावर लक्ष ठेवून जाहिरातींचा भडीमार करत जाहिरातदारांनी उत्पादने उपभोक्त्यांच्या माथी मारणं व आपली खळगी भरणं हा यांचा खरा धंदा. खोट्या बातम्या (फेक न्यूज) च्या माध्यमातून आपले विचार प्रभावित (ब्रेन वॉश) केले जातात. आणि त्यांना हव्या त्या बाजूने आपल्याला ते उभे करतात आणि इच्छित ते मिळवतात.  विशेष म्हणजे हे सर्व काही घडते ते आपल्या नकळत! 

फेसबुक-जिओ च्या मैत्रीला वरवर ‘किरकोळ विक्री’ व्यवसायाच्या भलीकरणाची सुरेख झालर जरी विणलेली दिसत असली तरी त्याखाली लपलेली ‘डेटा-मैत्री’ जाणकारांच्या नजरेतून सुटलेली खचितच नाही. एकीकडे रिलायन्स जिओच्या ‘मुठ्ठी’त ३१.७ टक्के भारतीयांचा असलेला डेटा तर दुसरीकडे ‘डेटा-सुरक्षा’ विषयक प्रश्नचिन्ह असलेली सोशियल मिडिया कंपनी. स्पर्धात्मक आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात ‘डेटा हेच चलन’ बनले आहे. नागरिकांच्या खाजगी माहितीवर मालकीहक्क असल्याच्या अविर्भावात करार करणाऱ्या मंडळींच्या हातात-मुठ्ठीत आपला डेटा देऊन आपण आत्मनिर्भर कधी आणि कसे होणार?  मला विशेष याचे वाटते की, जानेवारी २०२० मध्ये अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेज़ोस यांच्या भारतातील १ अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणुकीच्या घोषणेला अगदी सरकारी पातळीवरून जाहीर विरोध करणारे, फेसबुक-जिओ भागीदारीबद्दल एकदमच गप्प कसे?    

परंतु असे असले तरी, देशाची बिकट आर्थिकावस्था, कोरोना महामारीचे संकट आणि वाढती बेरोजगारी या पार्श्वभूमीवर फेसबुकसारख्या जागतिक कंपन्यांची गुंतवणूक नक्कीच आशादायी आहे. बहुअंशी जागतिक मानसिकता चीनविरुद्ध असताना, हा करार भविष्यात अधिकाधिक अंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना भारताकडे हाक देणारा आहे. फेसबुक-जिओ मॉडेलच्या धर्तीवर भविष्यात अन्य मार्केटप्लेस आणि टेलेफोन कंपन्या एकत्र येत ग्राहकांना विविध पर्याय देऊ शकतील, जेणेकरून एकाधिकारशाही निर्माण होण्यास वाव मिळणार नाही. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार गुगल ही जागतिक सर्च-इंजिन इंटरनेट कंपनी भारतातील व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. चला, एकंदरीत स्पर्धा सुरु झाली म्हणायची तर! “ग्राहकराजा सुखम् भवेत्”. व्हाट्सऍप आणि जिओ जोडले गेल्यास, भारतीय उपभोक्त्यांना चीनच्या ‘वुईचाट’ सारखे सुपरऍप् मिळू शकते, जेणेकरून व्हाट्सऍपचा वापर फक्त संवाद/संदेश, फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, फाईल्स देवाणघेवाणीपुरताच मर्यादित न राहता जिओमार्टसारख्या मार्केटप्लेसवरून विविध ब्रॅण्ड्सच्या वस्तू देखील खरेदी/विक्री करता येऊ शकतील. किराणा, शेतीमाल तसेच वीज/गॅस/पाणी/फोन-बिलं, प्रवास/सिनेमा तिकिटे आदींसाठी वेगवेगळी अँप्लिकेशन्स न वापरता एकाच ऍप वरूनच आर्थिक व्यवहारासह विविध सेवा देणे-घेणे सुसह्य होऊ शकेल. भारतात असलेले ६० दशलक्ष छोटे-मोठे व्यापार-उद्योग या संधीचा नक्कीच फायदा घेऊ शकतात. रोजगार-व्यवसायाच्या नवीन संधी यानिमित्ताने उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फक्त भारतीयांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडीत असलेल्या या कराराच्या सर्व अंगाने विचार व्हावा एवढीच किमान अपेक्षा. खरं तर तंत्रज्ञानाचा सुयोग्य-नैतिक मूल्याधारित प्रयोग केल्यास उद्योग-व्यवसायांचे लोकशाहीकरण सहज-शक्य आहे.

– सुनील खांडबहाले

Sidebar