ज्ञानापासून प्रज्ञेकडे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथील ज्ञानदर्शन २०२६ राष्ट्रीय परिषदेतील माझे चिंतन

मला अलीकडेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आयोजित ज्ञानदर्शन २०२६ या राष्ट्रीय बहुविषयक परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून माझे विचार सादर करण्याचा सन्मान मिळाला.

डॉ. सुनील खंडबहाले यांचा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते सत्कार, तसेच डॉ. जयदीप निकम, डॉ. दीपक करंजीकर आणि डॉ. विजय कांची यांची उपस्थिती.

हा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा होता.

श्रोत्यांमध्ये विविध क्षेत्रांतील संशोधक, प्राध्यापक, शैक्षणिक तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते. विशेष बाब म्हणजे केवळ मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नव्हती, तर सहभागाची गुणवत्ता देखील अत्यंत सखोल होती. सत्रानंतर विचारले गेलेले प्रश्न आणि अनौपचारिक चर्चांमध्ये झालेला संवाद यामध्ये खऱ्या अर्थाने जिज्ञासा आणि बौद्धिक खुलेपणा दिसून आला.

परिषदेच्या सहिंतेमुळे इच्छा असूनही मी इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत व्यक्त होऊ शकलो नाही. हा लेख म्हणजे माझ्या भाषणातील काही महत्त्वपूर्ण विचार हे अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे, विशेषतः भाषीय अडसर असलेले काही श्रोते किंवा जे परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत पण तंत्रज्ञान, ज्ञानप्रणाली आणि मानवी विकास यांच्या संगमात रस घेतात त्यांच्यासाठी उपयोगी ठरतील अशी अशा आहे.

या परिषदेत चार महत्त्वपूर्ण संकल्पना एकत्र आणल्या गेल्या:
डिजिटल परिवर्तन, भारतीय ज्ञान प्रणाली, शाश्वत नवोपक्रम आणि समग्र आरोग्य.

मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ व सारांश ग्रंथाचे प्रकाशन, ज्यामध्ये डॉ. सुनील खंडबहाले, डॉ. जयदीप निकम, डॉ. दीपक करंजीकर, डॉ. विजय कांची आणि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे उपस्थित होते.

पहिल्या दृष्टीक्षेपात या वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे वाटू शकतात. परंतु प्रत्यक्षात ते परस्परांशी घट्ट जोडलेले आहेत.

माझ्या भाषणामध्ये मी केवळ संकल्पनांवर नव्हे, तर त्यांच्या प्रत्यक्ष उपयोगावर लक्ष केंद्रित केले. त्यात मी तीन उपक्रम सादर केले, जे या विचारांना व्यवहार्य स्वरूप प्रदान करतात.

पहिला उपक्रम होता स्पिरिटूअलिटी मॅप्स अर्थात अध्यात्मिक नकाशे.
या उपक्रमामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अंतर्मनाच्या प्रवासाला मार्गदर्शन कसे करता येईल याचा अभ्यास केला जातो. बाह्य प्रगतीवर केंद्रित असलेल्या जगात अंतर्मुख प्रवास अनेकदा अस्पष्ट आणि अप्राप्य राहतो. अध्यात्मिक नकाशे या प्रवासाला संरचित आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करतात.

अध्यात्मिक नकाशे Spirituality Maps सादरीकरण – ज्ञानदर्शन २०२६, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

अध्यात्मिक नकाशामधील “कोहम?” (मी कोण?) या संकल्पनेचा अनुभव घेण्यासाठी https://koham.khandbahale.org/

दुसरा उपक्रम होता Samaysangit समयसंगीत अर्थात वेळेनुसार चालणारे स्वयंचलित भारतीय शास्त्रीय संगीत.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या वेळाधारित तत्त्वांवर आधारित हा उपक्रम आहे. योग्य वेळी योग्य संगीत मनःस्थितीवर सकारात्मक परिणाम करू शकते. ही साधी पण प्रभावी कल्पना आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनात अशा साधनांची मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते.

समयसंगीत Samaysangit मानसिक आरोग्य तंत्रज्ञान – ज्ञानदर्शन २०२६, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी: https://khandbahale.org/samaysangit/

तिसरा उपक्रम होता युनिव्हर्सल रायटीअसनेस प्रिंसिपल्स Universal Righteousness Principles (URP) अर्थात वैश्विक सदाचार मूल्ये.
हा एक संशोधनाधारित आराखडा आहे जो नैतिक जागरूकतेचा शासन, नेतृत्व आणि विश्वास यावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करतो. दीर्घकालीन शाश्वततेसाठी पारदर्शकता, न्याय, उत्तरदायित्व आणि जबाबदारी या मूल्यांची आवश्यकता असते.

वैश्विक सदाचार मूल्ये URP PhD संशोधन सादरीकरण – ज्ञानदर्शन २०२६, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

हे तीन उपक्रम वेगवेगळ्या क्षेत्रांतील असले तरी त्यांचा मूलभूत आधार एकच आहे; आणि ते म्हणजे प्रज्ञेने मार्गदर्शित मानवी विकास.

यानंतर मी माझ्या प्रवासातील एक वैयक्तिक अनुभव शेअर केला.

या परिषदेत सर्वसमावेशकतेवर विशेष भर होता. आणि माझ्यासाठी ही कल्पना केवळ सैद्धांतिक नाही तर ती माझ्या अनुभवातून आलेली आहे.

एकेकाळी मला इंग्रजी भाषा समजण्यास अडचण येत होती. त्या काळात इंटरनेटवरील सुमारे ८०% माहिती इंग्रजीत होती. त्यामुळे ज्ञान मिळवणे कठीण होत होते.

यातूनच एक छोटासा प्रयोग सुरू झाला.

मी भारतीय भाषांसाठी डिजिटल शब्दकोश तयार करायला सुरुवात केली.

उद्दिष्ट सोपे होते:
– लोकांना भाषा शिकण्यास मदत करणे
– विचारांचे भाषांतर सुलभ करणे
– आणि ज्ञान अधिक सुलभ करणे

आज २६ वर्षांनंतर हा उपक्रम २५ दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे, १५० पेक्षा अधिक देशांमध्ये.

या प्रवासातून एक महत्त्वाचा धडा मिळाला:

ज्ञान तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा ते सर्वांसाठी सुलभ आणि समावेशक असते.

ज्ञाकडून प्रज्ञेकडे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य या विषयावर सादरीकरण करताना डॉ. सुनील खांडबहाले – ज्ञानदर्शन २०२६, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल परिवर्तनाच्या युगात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो:

तंत्रज्ञान आपल्याला अधिक सक्षम करेल का?

की प्रज्ञा आपल्याला अधिक जबाबदार बनवेल?

कारण तंत्रज्ञान सांगते आपण काय करू शकतो.

पण मूल्ये ठरवतात आपण काय करायला हवे.

भारतीय ज्ञान परंपरा आपल्याला सांगते की ज्ञान हे केवळ प्रगतीसाठी नाही.

ते संतुलनासाठी आहे.

समरसतेसाठी आहे.

सामूहिक कल्याणासाठी आहे.

या अनुभवातून मला एक साधा विचार मिळाला:

मोठे बदल नेहमी मोठ्या योजनांमधून होत नाहीत.

ते एका छोट्या पावलाने सुरू होतात.

जर हे विचार तुम्हाला पटले, तर आपण पुढील संवादासाठी नक्की जोडले जाऊ.

तंत्रज्ञान आपले जीवन अधिक स्मार्ट बनवू शकते.

पण प्रज्ञाच त्याला अर्थ देते.

– सुनील खंडबहाले, भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासक

ज्ञानदर्शन २०२६, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=7SsOF-z94Gk

Sidebar