इक दिन बिक जाएगा, माटी के मोल जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल, रतन टाटांच्या प्रेमळ स्मृती – सुनील खांडबहाले

Sunil-Khandbahale-with-Ratan-Tata-at-MIT-Boston
फोटो: रतन टाटा आणि सुनील खांडबहाले, एम.आय.टी. बोस्टन, अमेरिका (७ ऑक्टोबर २०१५)

आजही मला स्पष्ट आठवतं. ७ ऑक्टोबर २०१५, बोस्टनची ती सुंदर सकाळ, आठ-साडे आठची वेळ. चांगलीच थंडी पडलेली होती. त्यामुळे एकावर एक तीन-चार कपडे मी अंगावर घातलेले होते. ई-५२ क्रमांकाच्या एम.आय.टी. स्लोन स्कुल इमारतीकडे नियमित वर्गासाठी मी लगबगीने चाललो होतो. वातावरणात धुकं होतं. तितक्यात ई-१५ क्रमांकाच्या एम.आय.टी. मिडिया लॅब इमारतीच्या मार्गावर रतन टाटांसारखी एक व्यक्ती सूट आणि टाय घालून चालत असताना मला दिसली. एक क्षण मला वाटले की माझी नजर मला काही तरी धोका देत आहे. “रतन टाटा यांच्यासारखे प्रसिद्ध व्यक्ती भारतापासून इतक्या दूर अमेरिकेमध्ये एम.आय.टी. परिसरात असे एकटे कशाला फिरतील? ते असूच शकत नाही!” मी स्वतःशीच पुटपुटलो. मी डोळे चोळले. “आपण खरंच खात्री करून घ्यावी” या विचाराने नाही तर ती एखादी चुंबकीय शक्ति असल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो आणि झपाझप पावलं टाकत मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो सुद्धा. काय आश्चर्य! ते खरंच रतन टाटा होते! आपसूकच माझे हात त्यांचा चरणस्पर्श करण्यासाठी झुकले. खांद्याला त्यांच्या हातांचा स्पर्श झाला तसा मी एकदम शहारलो. संपूर्ण अंगात विजेच्या झोताने अचानक प्रवेश करावा तसे क्षणभर झाले. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी अतिशय आस्थेने माझी विचारपूस केली. माझ्या एम.आय.टीच्या प्रवासाबद्दल विचारले. “आय एम प्राउड ऑफ यु” हे त्यांचे शब्द आजही माझ्या कानात गुंजत आहेत. “मेक शुअर यु सर्व्ह युअर मदरलँड आफ्टर ग्रॅज्युएशन! आवर कन्ट्री नीड्स पीपल लाईक यु.” अशी अपेक्षा व्यक्त केली. “सर, आय प्रॉमिस यु!” मी देखील त्यांना शिक्षणानंतर मायदेशी परतेन असं वचन देत आश्वस्त केलं. “गॉड ब्लेस यु माय सन” म्हणत त्यांनी मला आशीर्वाद दिला. जगप्रसिद्ध एम.आय.टी. विद्यापीठाच्या मधोमध उभं असलेलं रतन टाटा नावाचं उत्तुंग विद्यापीठ मी त्या क्षणी अनुभवत होतं. त्या अद्भुत भेटीची ती स्मृती कायम माझ्या मनावर कोरलेली राहील.

९ ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटा सर गेल्याची बातमी कळाली आणि काळजात धस्स झालं. खरं तर तेंव्हाच हे सारं मला लिहायचं होतं, पण व्यक्त होण्याचं बळ माझ्यात एकटवत नव्हतं. ज्यांना आमच्या ह्या भेटीबद्दल माहित होतं अशा अनेकांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केले. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी विचारलं. इतक्या महान व्यक्तीचा तो साधेपणा, नम्रता, दयाळूपणा, प्रेम आणि सतत देशभक्तीची जाणीव यांसारख्या दैवी संपदांमुळे आम्हा भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदरभावना निर्माण न करेल तरच नवल! भारताचे रत्न आदरणीय रतन टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातच नाही तर सर्वसामान्य जनमानसात देखील एक विलक्षण हुरहूर अनुभवयला आली. प्रत्येकाच्या ओठी रतन टाटांचे नाव आणि त्यांच्याविषयी आदर पाहावयास मिळाला. जणू आपल्या घरातलंच कुणी जेष्ठ व्यक्ती गेल्याची पोकळी लोकांच्या मनात निर्माण झाली. याचं कारण रतन टाटांनी जो औद्योगिक वारसा निर्माण केला यामुळे नाही, तर त्यांनी एक आदर्शवत जीवन जगत लोकांच्या जीवनावर जो प्रभाव टाकला हे आहे.

साधारणतः एक वर्षांपूर्वीच एके काळी मोठे वलय असलेले परंतु नीतिमत्तेच्या अधःपतनामुळे उत्तरायुष्य तुरुंगवासात व्यतीत कराव्या लागणाऱ्या एक भारतीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. परंतु ज्या लाखो लोकांना त्यांनी मोठे केले किंवा ज्यांच्यासाठी त्यांनी खेळ, मैदाने, सिनेसृष्टी, विमानं, उद्योग परिवार अशी अनेक व्यासपीठं निर्माण केली अशांतल्या एकानेही त्यांच्या मृत्यूवर एक चकार शब्दसुद्धा काढला नाही, ना कुणाचे डोळे ओले झाले. एवढेच कशाला त्यांच्या स्वतःच्या कुटुंबानेदेखील त्यांच्या अंत्यदर्शनाकडे पाठ फिरवली. आणि नीतिमत्तेने परिपूर्ण आणि आदर्शवत जीवन जगलेल्या ८६ वर्षाच्या रतन टाटांचे जाणे आजदेखील कुणालाही मान्य नाही.

परवाच (गुरुवारी, २६ डिसेंबर) देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा संपूर्ण देशावर शोककळा पसरली. सुप्रसिद्ध तबला वादक पंडित जाकिर हुसैन १५ डिसेंबरला आपल्याला सोडून गेले. प्रत्येक प्रसंगी ह्या थोर विभूतींना अभिवादन करत सोशल मेडिया, वृत्तपत्रं यांची रकानेच्या रकाने भरून लोकं व्यक्त झाले. अशा वेळी ‘धरम-करम’ सिनेमातील मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या गीताचे मुकेशजींचे स्वर कानात गुंजू लागतात,

“इक दिन बिक जाएगा, माटी के मोल
जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल
दूजे के होंठों को, देकर अपने गीत
कोई निशानी छोड़, फिर दुनिया से डोल”

२८ डिसेंबर हा रतन टाटांचा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांच्या प्रेमळ स्मृती पुन्हा जाग्या झाल्या.
“आदरणीय रतन टाटांसारख्या ईश्वर-विभूती कधीही नाहीशा होत नसतात; त्या सदैव अमर असतात. ते तत्वज्ञान जगत नसतात, त्यांचं जीवनच तत्वज्ञान बनतं. सर, मी आपल्या प्रेरणेनेच मायदेशी परतलो आणि आपण दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे करत आहे.”
— सुनिल खांडबहाले

Sidebar