मराठी भाषा संवर्धनासाठी मी व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो/ते?
व्यक्तिगत पातळीवर मराठी भाषा संवर्धनासाठी एक छोटासा कौटुंबिक खेळ

गुरुवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी, भारत सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून घोषित केल्याने समस्त मराठी भाषिकांना अतिशय आनंद झाला. सर्वांचेच अभिनंदन! केंद्र तसेच राज्य सरकार आणि विविध खाजगी संस्था मराठी भाषेचे संवर्धन व प्रचार-प्रसार करत असताना माझ्या माय-मराठीसाठी, मातृभाषेसाठी “मी व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो/ते?” असा प्रश्न अनेक मराठी भाषिकांनी विचारला ही खरोखरीच आनंदाची बाब आहे. मराठीचा आग्रह धरण्यासोबतच लेखन, अनुवाद, तंत्रज्ञान निर्मिती, संशोधन, संभाषण, साहित्य निर्मिती, स्पर्धा अशा कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. याबरोबरच हलक्या-फुलक्या खेळांतून भाषा संवर्धन असा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. उदाहरणदाखल असाच एक सोप्पा, मजेशीर आणि विचार केल्यास तितकाच गंभीर खेळाविषयी आपण जाणून घेऊयात.
कुटुंबातील अथवा मित्रमैत्रिणींमध्ये दोन किंवा अधिक सदस्यांनी कोणत्याही आवडत्या किंवा ठरविलेल्या निवडक विषयावर अल्प काळासाठी न थांबता बोलायचे.
खेळाचे नियम
- एकावेळी एकच खेळाडू वक्ता म्हणून आपल्या विषयावर बोलेन.
- वक्त्याने बोलताना फक्त आणि फक्त मराठी भाषेचाच वापर करावा.
- वक्त्याने बोलताना इतर भाषेतील शब्द उच्चारल्यास ऐकणाऱ्या सदस्यांनी आपल्याकडील कागदावर वक्त्याच्या नावावर एक फुली मारावी.
- अशाच पद्धतीने एक एक करून सर्व खेळाडूंनी आपापल्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करावा.
- ज्याच्या नावावर कमीत कमी फुल्या असतील तो खेळाडू विजयी घोषित करावा, प्रोत्साहन म्हणून शक्य असल्यास विजेत्यास बक्षीस द्यावे.
खेळाचे फायदे
- मराठी भाषेचा शब्दसंग्रह वाढेल.
- बोलण्याचे कौशल्य विकसित होईल.
- आत्मविश्वास विकसित होईल.
- एकाच भाषेत बोलण्याची सवय लागेल. (हल्ली एकाच भाषेत बोलणे वाटते तितके सोपे नाही, ते एक कौशल्य बनले आहे.)
- हा खेळ अतिशय सोपा असल्याने कुठेही खेळता येईल, परस्पर प्रेम, सहकार्य तसेच सांघिक भावना वाढीस लागेल.
“माझा मराठाचि बोलु कौतुके । परि अमृतातें ही पैजा जिंके ॥”
– संत श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज.
कृपया हा संदेश अधिकाधिक मराठी भाषिकांपर्यंत पोहचवा व व्यक्तिगत पातळीवर आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी योगदान द्या.
- सुनील खांडबहाले
संगणकीय मराठी शब्दकोश, खांडबहाले.कॉम
https://sunilkhandbahale.com/?s=मराठी+भाषा

