रिमझिम पावसाने दिलेली अंतर्मनाची ओळख

आज पहाटेचा पाऊस नेहमीपेक्षा वेगळा वाटला.
पाऊस तर अनेकदा पाहिला, ऐकला, अनुभवला; पण आज त्याच्या प्रत्येक थेंबात एक शांत संवाद जाणवला.
ना विजांचा कडकडाट, ना वाऱ्याचा गोंधळ… फक्त हळुवार बरसणारी संततधार आणि त्याला साथ देणारे पक्ष्यांचे आनंदी स्वर. त्या क्षणी जाणवले … पाऊस बदलला नव्हता, बदलली होती माझी दृष्टी.
निसर्ग आपल्याला अनेकदा बाहेरचे जग स्वच्छ करताना दिसतो; पण कधी कधी तो आपल्या आतली धूळही धुवून काढतो. आजच्या या रिमझिम सरींनी मनात काही शब्द उमलले… आणि त्या अनुभवाचे हे काव्यरूप.
रिमझिम रिमझिम बरसत होता…
(एका पावसाने दिलेली अंतर्मनाची ओळख)
रिमझिम रिमझिम बरसत होता,
हळुवार धरतीवरती,
संतत सुरांनी गात होता,
प्रेमाची गोड नाती...
धृपद :
रिमझिम रिमझिम बरसत होता,
हळुवार धरतीवरती...
पहिले कितीतरी पाऊस पाहिले,
कितीतरी रूपे त्याची,
पण आज भेटली मजला,
ओळख नव्याने त्याची.
ना कडकड, ना धडधड होती,
ना विजांचा तो खेळ,
ना वाऱ्याची धावपळ होती,
ना ढगांचा तो गोंधळ.
धृपद :
रिमझिम रिमझिम बरसत होता,
हळुवार धरतीवरती,
संतत सुरांनी गात होता,
प्रेमाची गोड नाती...
विजा-वारा नाही सोबती,
म्हणून कळले आज मला,
पावसा तुझ्या निर्मळ रूपाचा,
अर्थ खरा उमगला मनाला.
तू तर होतास असाच नेहमी,
शांत, प्रेमळ, निर्मळ रे,
संभ्रमित आम्हीच मानव,
ओळख तुझी न झाली रे.
थेंब थेंब तू येत राहिलास,
काहीच न मागता,
तहानलेल्या या धरणीला,
जीवन देण्यासाठी.
डोंगर, नद्या, वृक्ष-वेली,
सारे हसले तुझ्या येण्याने,
तू स्वतः विरून गेलास तरी,
पुन्हा फुलले जगणे.
धृपद :
रिमझिम रिमझिम बरसत होता,
हळुवार धरतीवरती,
संतत सुरांनी गात होता,
प्रेमाची गोड नाती...
तुझ्या गोड त्या सुरांमध्ये,
पक्षीही मग गाऊ लागले,
चिवचिव चिवचिव करत त्यांनी,
मनाचे दार उघडले.
जसे आकाश झाले निळे,
जशी स्वच्छ झाली सृष्टी,
केलीस तुझ्या थेंबांनी,
स्वच्छ माझी दृष्टी.
आज मला उमगले रे मित्रा,
चूक माझीच होती,
तुझ्या निर्मळ त्या रूपाची,
ओळख मलाच नव्हती.
बाहेरच्या या जगामधल्या,
विजा-वाऱ्यांनी झाकले तुला,
माझ्याही मनातल्या वादळांनी,
झाकले होते मला.
माझ्याही अंतरात आता,
शांतता अशीच राहू दे रे,
काम-क्रोध-लोभ-मोहाची,
संगत आता नको रे.
मद-मत्सराच्या वीज-वाऱ्यांना,
दूर सारण्याचे बळ दे,
अंतरीच्या मंदिरात माझ्या,
निरंतर दीप तेवत राहू दे.
अंतिम धृपद :
रिमझिम रिमझिम बरसत रहा तू,
असाच धरतीवरती,
मीपण सारे विरघळले,
झालो धरतीची माती...
रिमझिम रिमझिम बरसत रहा तू,
असाच धरतीवरती...
असाच धरतीवरती...
– सुनील खांडबहाले