संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित

जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रक्षेपित केला जाणारा इंटेरनेटवरील हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे.

भाषा संवर्धनार्थ वेगळा प्रयोग

नाशिक : ‘श्रवण‘ हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि प्रभावी माध्यम. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपध्दती, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर  येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु सोयीनुसार आणि पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ  शकेल, असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन येथील खांडबहाले डॉट कॉम भारतीय भाषा आणि तंत्रज्ञान विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन, प्रचार, प्रसारणार्थ २४ तास आणि सातही दिवस अव्याहतपणे सुरु राहील, असा ‘संस्कृत इंटरनेट रेडिओ‘ जागतिक संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृतप्रेमींसाठी ऑनलाईन सादर केला.

 

संस्कृत भाषेचे अध्ययन करतांना ही भाषा कानावर पडते. परंतु एकदा वर्गाबाहेर पडले की, संस्कृत श्रवण दुर्मीळ होते. संस्कृत स्तोत्र, श्लोक, गीत अनेक संकेतस्थळावर अस्ताव्यस्त स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु व्यावहारिक जीवनाशी संबंध सांगता येईल, असे संवादत्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादन, संकलित करणे आणि २४ तास अव्याहत श्रवण करता येऊ  शकेल इतके सुसहय करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षांने जाणवले. यामुळे स्वत:साठी संस्कृत संभाषण, शिकण्याचे साधन म्हणून आपण इंटरनेट रेडिओची संकल्पना मांडून अनेकांच्या सहभागातून त्यास मूर्त स्वरुप दिल्याचे संस्थेचे संचालक सुनील खांडबहाले यांनी सांगितले.

जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रक्षेपित केला जाणारा इंटेरनेटवरील हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. डब्लूडब्लूडब्लू.खांडबहालेडॉटकॉम या संकेतस्थळावर संस्कृत रेडिओ ऐकण्यासाठी विना:शुल्क उपलब्ध आहे. यासाठी कोणतीही आज्ञावली, अ‍ॅप डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता करता स्मार्टफोन, टॅबलेट तसेच संगणकावर संस्कृत इंटरनेट रेडिओ श्रवणाची सुविधा असल्याने श्रोत्यांसाठी अधिक सोयीचे आहे. नजिकच्या काळात सर्वसमावेशक, दर्जेदार कार्यक्रम निर्मितीसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी आपले योगदान देऊ  शकतील आणि अभिव्यक्त होऊ  शकतील अशी योजना असल्याचे खांडबहाले यांनी सांगीतले. त्यासाठी विषयतज्ज्ञ आणि संस्कृतप्रेमींनी सूचना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संवाद आणि संभाषण

संस्कृत रेडिओत विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद, संभाषण (जसे शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य संवाद, मित्र संवाद, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग, संवाद), विषयवार धडे, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तू, संबंध, लघुकथा-बोधकथा, गीत, कविता, सुभाषित असा मनोरंजनात्मक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

News Link :

https://www.loksatta.com/nashik-news/online-sanskrit-internet-radio-launched-zws-70-1952031/

Sidebar