महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन सुनील खांडबहाले यांनी विश्वास सार्थकी लावला – महाराष्ट्र टाइम्स

भारतीय भाषांमध्ये डिजिटल शब्दकोश निर्मिती करणारे सुनिल खांडबहाले यांची गतवर्षी ‘महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली होती. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्यावर वाढलेल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून देशातील सर्व राजभाषा टिकविण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प सोडला. वर्षभरात पूर्ण केलेल्या या उपक्रमाचा परिचय त्यांच्याच शब्दांत…

शनिवार, १६ मार्च २०१३. तो दिवस मला आजही मला चांगला आठवतो. ‘कोहिनूर म.टा. सन्मान’ कार्यक्रमाचं एक निमंत्रण म्हणून खरं तर मी पंचतारांकित आय.टी.सी. ग्रांट मराठा हॉटेल, मुंबई येथे पोहोचलो होतो. अतिशय नयनरम्य अशा रोषणाईत मराठी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ सर्वच सिनेतारकांचा राबता बघून मी पुरता भांबावून गेलो होतो. पहिल्याच रांगेत माझ्या नावाने खुर्ची आरक्षित असल्याचे बघून तर माझी भंबेरीच उडाली. ज्या मांदियाळीला आपण केवळ चित्रपटातच पहात किंवा ऐकत आलोय अशा दिग्गजांच्या पुढे बसण्याचे धाडस माझ्याने कदापी शक्य नव्हते म्हणून मी गुपचूप सर्वात मागच्या रांगेत जाऊन बसलो. परंतु संपादक साहेबांनी मला त्या गर्दीत शोधले व पूर्वनियोजित ठिकाणी आणून बसविले. आश्चर्याचा दुसरा धक्का मला तेव्हा बसला जेंव्हा त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन’ साठी माझी निवड झाली असल्याचे सांगितले. खूपच सुखद परंतु तितकाच मनावर दडपण आणणारा क्षण होता तो.

१२ भारतीय भाषांमध्ये डिजिटल शब्दकोश निर्मितीची महाराष्ट्र टाइम्सने त्यावेळी सर्वप्रथम घेतलेली दखल व पुरस्कार यांबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे आणि राहील. परंतु माझ्या मते पुरस्कार मिळतात तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. समाजाच्या अपेक्षाही वाढतात आणि ते रास्तही आहेच. माझा तो सन्मान महारष्ट्रातील शेतकऱ्यांना अर्पण करताना त्यावेळीच मी ठरवलं होतं की येत्या एक वर्षाच्या कालावधीत आणखी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण असं काहीतरी करायचं. ‘मटा’ च्या माध्यमातून आज मला आपणा सर्वांना कळविताना अतिशय आनंद होत आहे की, बरोबर एक वर्षानंतर खांडबहाले.कॉमने सर्व राजभाषांच्या म्हणजेच एकूण २२ भारतीय भाषांच्या शब्दकोश निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

जगात एकूण सात हजार भाषा आहेत, परंतु दर चौदा दिवसांनी पृथ्वीवरील एक भाषा नाश पावत आहे, कारण ती भाषा बोलणारी कुणी व्यक्तीच शिल्लक राहिली नाही. भाषांचा हा सांस्कृतिक वारसा टिकावा या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लुप्त होणाऱ्या भाषांचे संवर्धन व प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘ग्लोबल लँग्वेज हेरिटेज’ असा उपक्रम हाती घेतला असून विज्ञान, कृषी, विधी, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य अशा एकूण १६ विविध क्षेत्रांतील २२ भारतीय भाषांमध्ये १ कोटीहून अधिक शब्दभांडार आपण तयार झाले आहे.

८ फूट उंच आणि ४ फुट रुंद अशा निष्पाप झाडाचा बळी घेतल्यास पुस्तकी शब्दकोशाच्या साधारणतः २० प्रति छापल्या जातात. गेल्या वर्षभरात तब्बल ८ कोटीहून अधिक वापरकर्त्यांची भर पडून आजमितीस जगभरात १२ कोटीहून अधिक वापरकर्ते संगणक, मोबाइल फोन, इंटरनेट, टॅब्लेट, एस.एम..एस.च्या माध्यमातून आपल्या डिजिटल डिक्शनरीज वापरतात. ‘ग्लोबल लँग्वेज एन्व्हायर्नमेंट’ नावाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आपण तब्बल १० लाखांहून अधिक झाडांचे संरक्षण करू शकलो आहोत म्हणजे एक सबंध जंगल यामुळे वाचू शकले आहे.

जागतिकीकरणामुळे सर्व जग जरी जवळ येत आहे तरी देखील विविध भाषांमुळे आपण विभागलो गेलो आहोत. या पार्श्वभूमीवर वैश्विक एकात्मता नांदावी म्हणून ‘ग्लोबल लँग्वेज फ्रेंडशिप’ अर्थात ‘भाषा-मैत्री’ नावाने सुरू केलेला उपक्रम गेल्या एका वर्षात आपण महाराष्ट्रातल्या शेकडो शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहोचविला.

मराठी भाषेत शुध्दलेखनाच्या होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मराठी शुध्दलेखन तपासणीसाठी संगणकप्रणाली तयार करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू केले गेले व नुकत्याच झालेल्या जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्याची मर्यादित आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लवकरच ती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. केवळ शिक्षणामुळे माझं जीवन बदललं, इतरांचही बदलावं म्हणून ग्रामीण भागातील मुलांसाठी मी आणि माझ्या कुटुंबाने एक छोटीशी शाळाही सुरू करण्याची धडपड केली आहे.

मी पुरस्काराबद्दल कधीही कुठं स्वत:हून वाच्यता केली नाही परंतु गेल्या वर्षभरात जिथं कुठं गेलो तिथं युथ आयकॉन म्हणून विशेष आदर मिळाला. अनेकजण तर महाराष्ट्र टाइम्स ऐवजी महाराष्ट्र सरकारने पुरस्कार दिल्याचं म्हणायचे. आनंद होतो. ‘मटा’च्या वाचकांनीही भरभरून प्रेम दिलं. कौतुक झालं, अनेक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले पण सुरुवात केली ती ‘मटा’ने. युथ आयकॉन म्हणजे नेमकं काय असतं ते मला माहीत नाही पण एक चांगला नागरिक म्हणून जगण्याचा माझा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न आहे. आजून खूप काही करायचं आहे. त्यासाठी हवेत फक्त आपल्या सर्वांचे आशीर्वाद.

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/sunil-khandbahale/articleshow/32094924.cms

Sidebar