रेव्होल्यूशन नेक्स्ट Revolution Next

‘मायनॉरिटी रिपोर्ट’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी एका गृहस्थाला अटक करताना म्हणतात, ‘आम्ही तुला अटक करत आहोत, कारण तू आज एक खून करणार होतास.’ पोलिसांना हे कसं कळलं म्हणून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटत असलं तरी पोलिसांना ते पूर्वानुमानी (प्रेडिक्टिव) माहितीच्या आधारे समजलेले असते. सध्या अमेरिकेत पुढील 12 तासांत कुठे गुन्हा घडू शकतो, याचा पूर्वानुमान घेत गुन्हा घडण्याआधीच अमेरिकेतील पोलिस गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इंग्लंडमधील व्यापारी आणि शास्त्रज्ञांना गणिताच्या आधारे अब्जावधी रुपये कमावण्याचे गुपित उलगडल्याचा दावा ते करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत एक खगोलशास्त्रज्ञ संपूर्ण ब्रह्मांड सूचीबद्ध करण्यात व्यग्र आहे. हे सर्व घटनाक्रम एका समांतर धाग्याने जोडले गेलेले आहेत, आणि तो धागा म्हणजे ‘बिग डाटा’.

एरवी गूगलवर शोधल्या जाणा-या सर्च टर्म्सचा अभ्यास करून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकवर पाठवलेल्या पोस्ट व लाइक्सचा अभ्यास करून उत्पादने दाखवली जातात. अमेझॉनवर तुमची वाचनाची आवड लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तके सुचवली जातात. इबेवर तुम्ही नवीन काय वस्तू विकत घेणार ते दर्शवले जाते. अमेरिकेतील वालमार्ट स्टोअरहाउसच्या अधिका-यांवर एक ग्राहक यामुळे खूप चिडला. त्याचे असे झाले की, वालमार्टने पाठवलेले कुरिअर उघडून बघतो तर काय त्याच्या 15 वर्षांच्या मुलीसाठी चक्क बाळासाठी लागणारे साहित्य? वालमार्टच्या अधिका-यांवर भडकलेला तो ग्राहक एके दिवशी मात्र त्यांची माफी मागण्यासाठी गेला. कारण त्याची मुलगी काही महिन्यांपासून प्रेग्नंट असल्याचे त्याला नंतर समजले, जे वालमार्टला त्या मुलीच्या मागील काही महिन्यांच्या खरेदीस्वभावावरून याआधीच समजले होते. याला आधार पुन्हा ‘बिग डेटा’ याचा.

जगातील 2.5 अब्ज म्हणजे 35% लोक इंटरनेटशी जोडले गेली आहेत. फेसबुकवर 955 दशलक्ष, लिंक्ड-इनवर 200 दशलक्ष, तर ट्विटरवर 200 दशलक्ष सक्रिय खातेदार आहेत. एकूण 140 अब्ज म्हणजे जगातील तब्बल 35% फोटोज फेसबुकवर आहेत, तर दर दिवसाला 30 अब्ज पोस्ट्स, 2.7 अब्ज लाइक आणि 70 भाषांमध्ये प्रतिक्रिया (कॉमेंट्स) पाठवल्या जातात. गूगलसह इतर सर्च इंजिनवर दिवसाकाठी 213 दशलक्ष सर्च (शोध) केले जातात, 247 अब्ज इ-मेल दररोज पाठवले जातात, तर ट्विटरवर 400 दशलक्ष ट्विट्स केले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, जी. पी.एस. तसेच विविध इलेक्ट्रॉनिक तसेच वैद्यकीय उपकरणे यांच्या माध्यमातून व जगभरातील कोट्यवधी जनतेच्या आदानप्रदानातून दररोज माहितीचा महापूर निर्माण होत आहे. एकट्या विकीपेडीयावर 4 दशलक्ष इंग्रजी लेख आहेत, तर महाजालावर 133 दशलक्ष ब्लॉग्ज, 400 दशलक्ष वेबसाईटसह 7 अब्ज डीव्हीडी असा माहितीचा महासागर आहे. जगभरातील मोबाइल फोन्सची संख्या एक हजार अब्जाच्यावर गेली आहे. मागील दोन वर्षांत उपलब्ध झालेला डाटा हा यामागील हजारो- लाखो वर्षांत उपलब्ध झालेल्या डाटापेक्षा अधिक आहे.

आजमितीला प्रत्येक 10 मिनिटाला 5 एक्साबाईट डाटा तयार होत आहे. त्यामुळे ‘शितावरून भाताची परीक्षा’चे दिवस इतिहासजमा होऊन त्या जागी आता ‘बिग डाटा’ची जादू चालणार आहे. असे निरीक्षणास आले आहे की, एखाद्या कंपनीत 1000 लोक काम करत असतील, तर हे लोक त्यांच्या रोजच्या कामातून जगातील कोणत्याही मोठ्या ग्रंथालयात असलेल्या एकूण पुस्तकांतील डाटापेक्षा अधिक डाटा निर्माण करत असतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आपल्या हालचालीतून प्रचंड डाटा तयार करत असते. जगभरात निर्माण होणारा हाच गतिमान डाटा संपूर्ण जगाचे जीवनच बदलून टाकणार आहे. म्हणूनच तर त्याला ‘बिग डाटा’ म्हणजे ‘मोठा डाटा’ असे म्हटले जात आहे. याच बिग डाटामुळे कंपन्या कशा चालतात, आपण खरेदी कशी करतो, हवामान अंदाज कसे नोंदवले जातात किंवा संशोधन कसे केले जाते, या सर्वांवरच परिणाम होणार आहे. असंख्य तंत्रज्ञ व प्रचंड वेगाने काम करणारी शक्तिशाली संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) यांच्या मदतीने बिग डाटाचे पृथक्करण (अ‍ॅनेलिसीस) केले जात असून त्या आधारे अचूक अनुमान बांधले जात आहेत. जसे 20-25 वर्षे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण दिनचर्येची इत्यंभूत नोंद ठेवली तर ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत कशी वर्तणूक करेल, याचे अचूक तर्क करता येतील. जपानसारख्या भूकंपशील प्रदेशात भूकंपानंतरच्या सौम्य धक्क्यांच्या अभ्यासावरून पुढील संभाव्य भूकंप कुठे होऊ शकतो, याचे अनुमान काढता येतील. अर्थात, असे असले तरीही ‘बिग डाटा’बद्दल संपूर्ण अवलोकन होण्यास व करण्यास अजून खूपसा वाव असल्याने तरुण वर्गाला ‘डाटा मीमांसा व व्यवस्थापन’ क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या प्रचंड संधी खुणावत आहेत. जसे- बँकिंग व्यवसायातील डाटामुळे लोकांच्या खरेदी-विक्री, बचत, कर्ज व परतफेड सवयींचे विश्लेषण करून आर्थिक क्षेत्रात मोठी क्रांती संभाव्य आहे. शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरातून मिळणा-या प्राप्त डाटापासून समाजाची गरज व शिक्षणातील कमतरता यावर वेळीच उपाययोजना शक्य आहेत. आरोग्य क्षेत्रात नोंदवल्या जाणा-या आकड्यांच्या आधारे समाजातील स्वास्थ्य समस्या, एकंदरीत कल समजणे सोपे जाणार असून भविष्यातील आरोग्यविषयक आलेख सुधारण्यास प्रचंड वाव आहे. शेती व्यवसायातील मोबाइलच्या वाढत्या वापरातून मिळणा-या डाटाचा सूक्ष्म अभ्यास करून शेतीमालाचे उत्पादन वा उत्पन्न यात आमूलाग्र बदल शक्य आहे. सामाजिक व खासगी उत्पादन, सेवा तसेच विपणन व पुरवठा क्षेत्रातून मिळणा-या प्रचंड डाटाचे संशोधन करून मागणी व पुरवठा यात समतोल तसेच नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे शक्य होणार आहे. या आणि अशा अनेक क्षेत्रातील बिग डाटाचा संदर्भ यावर लेखाचा प्रत्येकी स्वतंत्र विषय होऊ शकेल. बिग डाटाची व्याप्ती आणि प्रभाव खूपच मोठा आहे आणि यामुळेच बिग डाटा हा उद्याचा परवलीचा शब्द बनू पाहतो आहे. बिग डाटामुळे तंत्रज्ञानातील नवीन क्रांती आपल्याला खुणावत असताना, तरुण वर्गाने या संधीचे सोने केले तर एका भविष्यवेधी जगाची निर्मिती होईल.

माहिती हाच आधार
अंक 2 आणि अंक 5 हे दोन भिन्न डाटा आहेत परंतु 2 + 5 = 7 म्हणजेच दोनात पाच मिळवल्यास सात होतात, हे आपल्याला कळले याला म्हणतात ‘माहिती’. याचाच अर्थ डाटावर जेव्हा प्रक्रिया केली जाते तेव्हा तो डाटा माहितीत रूपांतरित होतो. नुसता डाटाला काही अर्थ नाही. पुढे हीच माहिती योग्य पद्धतीने वापरल्यास त्याला विस्डम अर्थात विवेक, प्रज्ञा, ज्ञान किंवा शहाणपण असे म्हणतात. म्हणूनच तर म्हटले जाते की, ‘ज्ञान हे फक्त सत्ताच नाही तर संपत्तीदेखील आहे.’ आपण जीवनातील प्रत्येक निर्णय हा माहितीच्या आधारावर घेत असतो. आणि ही माहिती अगदी अचूक हवी असेल तर आपल्याकडे हवा प्रचंड मोठ्या प्रमाणात डाटा आणि त्या डाटावर प्रक्रिया करण्याची क्षमता…

मानवी चेह-याचे भान हवे.
बिग डाटा नावाप्रमाणेच कितीही मोठा असला तरीदेखील फेसबुक, ट्विटर, गुगल या पलीकडेही जग आहे, याचा विसर तज्ज्ञांना पडू नये, असे अपेक्षित आहे. इंटरनेट वापरणारी 35% जनता म्हणजे काही सर्व जग नव्हे. त्यातही भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशात जिथे फक्त 13 कोटी म्हणजे फक्त 10% लोक इंटरनेट वापरतात आणि लाखो-करोडो लोक दुष्काळ, कुपोषण, गरिबी, रोगराईच्या विळख्यात जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत, तिथे ‘बिग डाटा’च्या सर्वसमावेशकतेवर गांभीर्याने विचार व्हायला हवा. आजही या ग्रहावरती 50% हून अधिक लोकांनी आयुष्यात कधीही फोन केलेला नाही किंवा घेतलेला नाही. याला आपण सर्वसमावेशक तंत्रज्ञान म्हणणार का? याला आपण ग्लोबलायझेशन (जागतिकीकरण) समजणार का? जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत तंत्रज्ञान पोहोचत नाही, जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाचे मत विचारात घेतले जाणार नाही, तोपर्यंत तरी बिग डाटा परिपूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.

लेखक हे www.khandbahale.com या मुक्त व मोफत बहुभाषीय शब्दकोश संकेतस्थळाचे निर्माते आहेत.

Published article link : http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-revolution-next-4274146-NOR.html

Sidebar