ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी
ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक सिद्धांत, तरुण पिढीने, आधुनिक तंत्रज्ञ-वैज्ञानिकांनी ज्ञानेश्वरी का वाचावी?

“विठोबाचा प्राणसखा – ज्ञानोबा माझा”
विश्वातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व व गुरूंचेही श्रीगुरू संतहृदयसम्राट ज्ञानसूर्य संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज हे श्रीज्ञाननाथ म्हणूनही ख्यातकीर्त आहे.
- संतविदुषी जनाबाईंनी त्यांना ‘महाविष्णूंचा अवतार’ म्हटले,
- संतश्रेष्ठ श्रीतुकोबारायांनी ‘ज्ञानियांचा राजा गुरूमहाराव’ म्हटले,
- तर त्यांच्या शिष्या बहिणाबाईंनी ‘भागवतधर्म मंदिराचा पाया’ असे संबोधले.
- संतश्रेष्ठ नामदेवरायांनी ‘योग्यांची माऊली’ म्हटले तर,
- संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांनी ‘कैवल्याचा पुतळा,’ असा त्यांचा अपार महिमा गायिला.
- असा सर्वज्ञांनी एकमुखाने गौरविलेला महापुरूष म्हणूनच समर्थांसनी त्यांना ‘कवीश्वर-शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणून वंदन केले.
कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा || १ ||
संत एकनाथ महाराज
साधकाचा मायबाप | दरुशने हरे ताप | सर्वांभुती सुखरुप | ज्ञानोबा माझा || २ ||
ज्ञानियांचा शिरोमणि | वंद्य जो का पूज्यस्थानी | चिंतकाचा चिंतामणी | ज्ञानोबा माझा || ३ ||
चालविली जड भिंती | हरली चांगयाची भ्रांती | मोक्षमार्गाचा सांगाती | ज्ञानोबा माझा || ४ ||
रेड्यामुखीं वेद बोलविला | गर्व द्विजांचा हरविला | शांतीरुपें प्रगटला | ज्ञानोबा माझा || ५ ||
ब्रह्म साम्राज्य दीपिका | वर्णियेली गीतेची टीका | विठोबाचा प्राणसखा | ज्ञानोबा माझा || ६ ||
गुरुसेवे लागी जाण | शरण एका जनार्दन | चैतन्याचें जीवन | ज्ञानोबा माझा || ७ ||
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही तर श्रीज्ञानोबारायांची साक्षात वाङमयी मूर्तीच आहे आणि ज्ञानेश्वरीतील पसायदान हे अध्यात्माचे सर्वोच्य शिखर. संतश्रेष्ठ श्री ज्ञाननाथांनी हरिपाठ, अमृतानुभव व चांगदेव पासष्टी, तसेच साक्षात्कारलब्ध व अनुभूतीपूर्ण अशा असंख्य अभंगरचना करून विश्वाचे पारमार्थिक भावविश्व समृद्ध केले आहे.
म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं । येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ज्ञानेश्वरी १-४७॥
महाभारत
अर्थात, म्हणून महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात सापडणार नाही, यासाठी हे त्रिभुवन व्यासांचे उष्टे आहे.
श्रीमद्भगवद्गीता – महाभारताचे हृदयस्थान / श्रीकृष्णार्जुनसंवाद / गुह्यज्ञान
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी – श्रीमद्भगवद्गीता यावरील टीका / अलंकार

भाद्रपद वद्य षष्ठी, संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवद्गीतेचे रूपांतरण मराठीत केले, त्याला ‘ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका’ म्हणून ओळखले जाते. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्मसोबतच रसायन, भौतिक, जीवशास्त्र, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, अंतराळशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुशास्त्र असे विविध विज्ञानाचे मूळ सिद्धांत संत ज्ञानेश्वर माउलींनी बाराव्या शतकात कथन केले आहेत, जसे;
चलचित्र (ऍनिमेशन) / चित्रपट सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
पॅरिस, फ्रान्समध्ये डिसेंबर १८९५ मध्ये ल्युमिएर बंधूंनी पैसे देणाऱ्या प्रेक्षकांसमोर प्रक्षेपित हलणारी चित्रे सादर केली.
ज्ञानेश्वरी संदर्भ
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥ ज्ञानेश्वरी ५-१५६॥
घड्याळाचा सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
घड्याळाचा शोध पीटर हेनलेनने जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात सन १६०० मध्ये लावला
ज्ञानेश्वरी संदर्भ
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हे घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ ज्ञानेश्वरी २-१५९॥
पृथ्वी परिभ्रमण सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
ख्रिस्ती धर्माच्या बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. परंतु पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला.
ज्ञानेश्वरी संदर्भ
उदय-अस्ताचे प्रमाणे । जैसे न चालता सूर्याचे चालणे ।
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे ।कर्मींचि असता । सलील कायी ॥ ज्ञानेश्वरी ४-९९॥
जल-विद्युतनिर्मिती सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
१८७८ मध्ये, जगातील पहिली जलविद्युत ऊर्जा योजना विल्यम आर्मस्ट्राँग यांनी इंग्लंडमधील नॉर्थंबरलँड येथील क्रॅगसाइड येथे विकसित केली होती.
ज्ञानेश्वरी संदर्भ
तया उदकाचेनि आवेशे । प्रगटले तेज लखलखीत दिसे ।
मग तया विजेमाजी असे । सलील कायी? ॥ ज्ञानेश्वरी ७-५८ ॥
गुरुत्वाकर्षण सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
आयझॅक न्यूटनने १६६५ मध्ये सफरचंद पडताना पाहिल्यानंतर आणि सफरचंद बाजूला किंवा अगदी वरच्या दिशेने न पडता सरळ खाली का पडले हे विचारल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.
ज्ञानेश्वरी संदर्भ
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।
आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ ज्ञानेश्वरी ९-२५६ ॥
गतीचा सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
१६८६ मध्ये आयसॅक न्यूटनने गतीचा तिसरा नियम मांडला, त्यानुसार प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते.
ज्ञानेश्वरी संदर्भ
आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे ।
कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ॥ ज्ञानेश्वरी १६-१०० ॥
आपणचि चेंडू सुटे । मग आपणया उपटे ।
तेणें उदळतां दाटे । आपणपांचि ॥ अमृतानुभव ९-५७ ॥
स्लिपर कोच सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
१८३० च्या दशकात पहिल्या स्लीपिंग गाड्या अमेरिकन रेल्वेमार्गांवर सेवेत आणल्या गेल्या, परंतु त्या तात्पुरत्या होत्या; रात्रीच्या आरामदायी प्रवासासाठी डिझाइन केलेली पहिली कार पुलमन स्लीपर होती, जी १८६५ मध्ये जॉर्ज एम. पुलमन आणि बेन फील्ड यांनी व्यावसायिकरित्या सादर केली होती.
ज्ञानेश्वरी संदर्भ
जैसें निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय ॥ ज्ञानेश्वरी ५-८ ॥
धातू मोल्डिंग कास्टिंग सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंगचा शोध १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लागला, पहिल्या मोल्डिंग मशीनचे पेटंट जॉन आणि इसाया हयात या दोन भावांनी १८७२ मध्ये घेतले.
ज्ञानेश्वरी संदर्भ
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें ।
मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥ ज्ञानेश्वरी ६-२४९॥
लोहकाम सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
लोहयुग हे तसे दोन ते तीन हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. साधने आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लोखंडाच्या गळतीच्या विकासाचे श्रेय पारंपारिकपणे कांस्य युगाच्या उत्तरार्धात अनाटोलियाच्या हित्तींना दिले गेले. परंतु भारतामध्ये जमशेदजी टाटा यांनी १९०७ मध्ये लोहकाम उद्योगाची स्थापना केली.
ज्ञानेश्वरी संदर्भ
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे ।
लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥ ज्ञानेश्वरी १८-३५९ ॥
जीवनिर्मितीचा सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
नेट्टी स्टीव्हन्स आणि एडमंड बीचर विल्सन यांनी १९०५ मध्ये, कीटकांमधील गुणसूत्र XY लिंग-निर्धारण प्रणाली शोधली. पुरुषांमध्ये XY लिंग गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये XX लिंग गुणसूत्र असतात.
ज्ञानेश्वरी संदर्भ
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा ।
वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥ ज्ञानेश्वरी १३-१०६ ॥
परमाणू आणि भूगोल सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
केंब्रिज विद्यापीठात प्रायोगिक भौतिकशास्त्राचे जोसेफ जॉन थॉमसन (जे. जे. थॉमसन, १८५६-१९४०) यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
ज्ञानेश्वरी संदर्भ
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा ।
तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥ ज्ञानेश्वरी १०-२६० ॥
सृष्टीच्या प्रसारणाचा सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
१९१० च्या दशकात एडविन हबल या वैज्ञानिकास विश्वाचा विस्तार होत असल्याचा पुरावा सापडला.
ज्ञानेश्वरी संदर्भ
मग तयागोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास ।
हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे ॥ ज्ञानेश्वरी ८-२४॥
जलचक्र सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
बर्नार्ड पॅलिसी यांनी १५८० मध्ये जलचक्राच्या आधुनिक सिद्धांताचा शोध लावला.
ज्ञानेश्वरी संदर्भ
मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे । पाठीं इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढती भरे ॥ ज्ञानेश्वरी ९-२९६ ॥
लोहचुंबकाचा सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
१६०० मध्ये ब्रिटनचा विल्यम गिल्बर्ट यांनी पहिला चुंबक बनविला.
ज्ञानेश्वरी संदर्भ
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥ ज्ञानेश्वरी १८-१३११ ॥
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥ ज्ञानेश्वरी ९-११६ ॥
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन ।
कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥ ज्ञानेश्वरी १३-१३९ ॥
संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे ।
क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥ ज्ञानेश्वरी १३-११२३ ॥
मानसशास्त्राचा सिद्धांत:
आधुनिक संदर्भ
१८५४ मध्ये जर्मनीतील लाइपझिग येथे प्रायोगिक अभ्यासाचे क्षेत्र म्हणून मानसशास्त्राची सुरुवात झाली.
ज्ञानेश्वरी संदर्भ
संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी ।
मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥ ज्ञानेश्वरी १३-११४ ॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं ।
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥ ज्ञानेश्वरी १३-४१४ ॥
अवकाशातील मंगळ तसेच इतर ग्रह, तारे, नक्षत्र संदर्भ:
आधुनिक संदर्भ
गॅलिलिओ गॅलीली (१५६४ – १६४२) यांनी मंगळाचे आदिम दुर्बिणीने प्रथम निरीक्षण केले. पुढे १७८१ मध्ये, विल्यम हर्शेल वृषभ राशीच्या नक्षत्रात तारे शोधले.
ज्ञानेश्वरी संदर्भ
जेथे मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी ।
मृत्यु उदराचां परिवरीं । गर्भु गिंवसी ॥ ज्ञानेश्वरी ९-५०३ ॥
फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव ।
परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥ ज्ञानेश्वरी १३-७०८ ॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं ।
तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥ ज्ञानेश्वरी १०-२५९ ॥
म्हणून शांतिब्रह्म संत श्री संत एकनाथ महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात , एक तरी ओवी अनुभवावी!
- सुनील खांडबहाले.