MIT Sloan Fellow | Innovator | Entrepreneur | Research Scholar
Menu
ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली
जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ ऐकता येणार आहे
वारकरी संप्रदायासाठी नित्य पारायणाची असलेली पोथीबद्ध ग्रंथराज ज्ञानेश्वरी आता आधुनिकतेची कास धरत इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली झाली आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ही सुविधा जगभरातील सकलांसाठी २४ तास उपलब्ध झाली आहे.
‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे ज्ञानेश्वर माउलींनी म्हटल्याप्रमाणे या ग्रंथाच्या पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होऊन मन स्थिर होते. तसेच सात्त्विकतेची आणि समाधानाची प्राप्ती होते असा थोरामोठय़ांचा अनुभव आहे. सध्याच्या धकाधकीच्या वेगवान काळामध्ये श्री ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याची इच्छा असूनही अनेकांना ते शक्य होत नाही. अशांसाठी ज्ञानेश्वरी रेडिओ ही सुविधा उपलब्ध झाली आहे. जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ ऐकता येणार आहे, अशी माहिती यशोधन साखरे यांनी दिली.
ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांनी व्रतस्थ आणि सांप्रदायिक पद्धतीने केलेल्या सांप्रदायिक आणि शुद्ध अशा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ इंटरनेट रेडिओद्वारे मिळणार आहे. ‘जयजयवंती’ रागामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण केले असून या पारायणामध्ये सात्त्विक वाद्यांचे साहाय्य घेण्यात आले आहे. या पारायणाचे अत्याधुनिक उच्च तंत्रज्ञानाचे माध्यमातून जतन करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते नुकतेच ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओचे उद्घाटन करण्यात आले. ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओमुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखिल विश्वाला उपलब्ध झाला असल्याची भावना भटकर यांनी व्यक्त केली. सुनील खांडबहाले, नचिकेत भटकर, सारंग राजहंस, चिदंबरेश्वर साखरे आणि नचिकेत कंकाळ यांची या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
ज्ञानेश्वरी श्रवणासाठी संकेतस्थळ htps://radio.garden/listen/dnyaneshwari किंवा https://zeno.fm/dnyaneshwari यापैकी कोणतेही एक संकेतस्थळ आपल्या स्मार्टफोन, संगणक किंवा टॅब्लेटवर उघडल्यास ज्ञानेश्वरी पारायण लगेचच सुरू होईल.
News Link:
https://www.loksatta.com/pune-news/dnyaneshwari-is-now-open-to-the-world-through-internet-radio-abn-97-1981711/