गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण

जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. त्यांना मूलभूत समस्यांकडे आकृष्ट करायचे असल्यास प्रत्येकाच्या सामायिक आस्थेचा विषय निवडून जगभरातील तरुणांना हाक दिली पाहिजे या उद्देशाने नाशिक मधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय २२ राजभाषा शब्दकोशकार सुनील खांडबहाले यांनी गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या वेबसाईटची निर्मिती केली आहे.

साहित्य, कला-संगीत यामध्ये प्रत्येकासच साद घालण्याची क्षमता असल्याचे ओळखून या वेबसाईटवर माता गोदावरीची भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महती गाणारी “गोदावरी आरती” आधुनिक काळातहि नवतरुणांना सहज समजेल अशा पद्धतीने त्यांनी शब्दबद्ध केली आहे. देववाणी संस्कृतप्रचुर शब्दांचा भावार्थ विषद केला आहे. साहित्यक व भाषीय दृष्टया आरती अक्षरगणवृत्तात छंदबद्ध करून ती संगीतबद्धदेखील केली आहे. इन्फोसिस तसेच ऍक्सेंचर अशा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उच्च्पदस्थ असलेल्या गुणी गायकांनी तसेच अनेक कलावंतानी गायलेली गोदावरी आरती वेबसाईटवर ऐकायला मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेबसाईटवर कराओके संगीत ट्रॅक देण्यात आला असून आपण प्रत्येकजण आपल्या आवाजात गोदावरी आरती रेकॉर्ड करून लगेच अपलोड व #godavariaarti हॅशटॅग वापरून शेअर करू शकतो. यामध्ये खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, संगीत कला-प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गायक, वादक, नर्तक, चित्रकार व अन्य व्यावसायिक कलावंत अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेऊ शकतो. सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (व्होकल) किंवा वाद्य (इंस्ट्रुमेंटल) स्वरूपात, व्यक्तिगत, युगल किंवा सामूहिक पद्धतीने “गोदावरी आरती” रेकॉर्ड करता येते. सहभागाबद्दल डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे.

।। गोदावरी आरती ।।

श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰

जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।

जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।

जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।

जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।

तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।

गोदावरी आरती ऐकण्यासाठी www.GodavariAarti.org या संकेतस्थळास भेट द्यावी.

या उपक्रमात का सहभागी व्हावे याबद्दल वेबसाईटचे निर्माते सांगतात कि, सहभागी होणाऱ्यास साहित्यिक दृष्टीने विचार करता – पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो. सांगितिक दृष्टीने विचार करता – ताल, सूर, लय, ठेका, वाद्य, गायनपट्टी, माईक / कॅमेरा समज तसेच कराओके यांचा अभ्यास होतो. तांत्रिक दृष्टीने विचार करता – वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात. नवकल्पकता दृष्टीने विचार करता – मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि नवनिर्मितीचा आनंद होतो. गोदावरी नदीचा उगम, संगम, उंची, लांबी, परिसर, पाच राज्यांतील तिचा प्रवास, विविध आख्यायिका, धरणं, तीर्थक्षेत्रें, तिची नांवें यांविषयीचे सामान्यज्ञान प्राप्त होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे – माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी आहे.

गोदावरी आरती” उपक्रमांतर्गत किमान १ लक्ष आरती गायन / वादनाचे उद्दिष्ट आहे. उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभागी व्हावे आणि “गोदावरी आरती” हा अभिनव उपक्रम #godavariaarti हॅशटॅगसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून योगदान करावे असे आवाहन गोदावरीआरती.ऑर्ग चे निर्माते श्री सुनील खांडबहाले यांनी केले आहे.

quotes to include

(१) “वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई ‘जन्म’ देते, तर नदी ‘जीवन’ देते. या अर्थाने – “माता गोदावरी आपली आईच आहे.” “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.”

– सुनील खांडबहाले, तंत्रज्ञ, खांडबहाले.कॉम

(२) “कॉस्मिक एनर्जी अर्थात वैश्विक उर्जेत सहभागी होताना समष्टिप्रमाणेच व्यष्टी म्हणजेच व्यक्ती स्वरूपात सहभाग नोंदविल्यास सकारात्मक ऊर्जाअनुसंधान होईल.” – सचिन चंद्रात्रे, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक.

(३) “गोदावरी जन्मोत्सवानिमित्त, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी “माता गोदावरी” हा एक नवीन संस्कार पेरूयात.” – श्रीपाद खैरनार, तंत्रज्ञ, इन्फोसिस

(४) “साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत.” – निलेश म्हात्रे, तंत्रज्ञ ऍक्सेंचर.

webdunia https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/dedication-of-godavariaarti-org-literary-cultural-technology-website-on-the-occasion-of-goda-janmotsava-122021000008_1.html 

Sidebar