‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म
‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म… https://www.inmarathi.com/135368/sunil-khandbahale-and-khandbahale-dictionary-success-story/
वाचन करताना आपल्याला अनेक शब्द अडतात. जेव्हा इंटरनेटवर माहिती उपलब्ध नव्हती, तेव्हा आपण डिक्शनरी या पुस्तकाचा आधार घ्यायचो. विद्यार्थी, शिक्षक किंवा भाषेशी जवळचा संबंध येणाऱ्या प्रत्येकालाच डिक्शनरी लागते. आता मात्र पूर्वीसारखी जाडजूड डिक्शनरी घेऊन शब्द शोधावे लागत नाहीत, तर एका क्लिकवर मोठ्ठे शब्दभांडार आपल्यासाठी उपलब्ध आहे.
मराठी शब्द शोधायचा झाल्यास सर्च लिस्टमध्ये पहिले नाव येते ते “खांडबहाले” या डिजिटल डिक्शनरीचे!
पारंपरिक पुस्तकी डिक्शनरीच्या मर्यादा तंत्रज्ञानाची मदत घेऊन शक्य तितक्या कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना करून द्यायचा ही कामगिरी डिक्शनरीमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील खांडबहाले यांनी वयाच्या तिशीतच करून दाखवली आहे.
जगात पहिली ऑनलाईन मराठी डिक्शनरी सुरु करण्याचे श्रेय सुनील खांडबहाले यांना जाते. केवळ मराठीच नव्हे तर सुनील यांनी बारा भारतीय भाषांतली ऑनलाईन डिक्शनरी लोकांना उपलब्ध करून दिली आहे.
भाषातज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, भाषांतरकार यांना अत्यंत उपयोगी असणारी खांडबहाले डिक्शनरी रोज लाखो लोक वापरतात. विशेष म्हणजे खांडबहाले शब्दकोषाचा वापर हा मोफत आहे आणि मोबाईल आणि टॅब्लेटवर देखील ही डिक्शनरी डाउनलोड करता येते.
डिक्शनरीच्या निर्मात्याबद्दल…
खांडबहाले या पहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचे जनक सुनील शिवाजी खांडबहाले यांचा जन्म १ जून १९७८ रोजी नाशिक जवळील एका लहानश्या गावात झाला. त्र्यंबकेश्वर जवळच्या महिरावाणी या खेड्यात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या घरी शिक्षणाची पार्श्वभूमी अजिबातच नव्हती.
घरच्या परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत पूर्ण झाले होते तर आईला शिक्षण घेण्याची संधीच मिळाली नव्हती. घरी वडील शेती करत असत. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य होती. कष्ट केले तरच पोट भरेल अशा परिस्थितीत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला.
स्वतःला शिक्षणापासून वंचित राहावे लागले असले, तरीही मुलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे असा त्यांच्या आईवडिलांचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यात कधीच कसूर केली नाही.
जात्याच असलेली बुद्धिमत्ता तसेच कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांना दहावीला उत्तम गुण मिळाले होते. आणि नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची मनीषा बाळगून त्यांनी अहमदनगरला इंस्ट्रुमेन्टल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. दहावीपर्यंतचे शिक्षण संपूर्ण मराठीत आणि खेड्यात झाल्याने त्यांना सुरुवातीला माध्यमाची आणि भाषेची अडचण जाणवू लागली.
एकतर इंग्रजी भाषा आणि त्यात सगळ्या तांत्रिक शब्दांचा भरणा, विचारणार तरी कुणाला या परिस्थितीत त्यांना अभ्यास करण्यास अडचण येऊ लागली. मग त्यांनी या अडचणीवर मात करण्यासाठी एक पद्धत अवलंबली. वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर डिक्शनरीतून त्यांचे अर्थ समजावून घ्यायचे असा अभ्यास सुरु केला. यामुळे त्यांची भाषा तर सुधारलीच शिवाय शब्दसंपदेत वाढ झाली.
केलेला अभ्यास आणि कष्ट कधीच वाया जात नाहीत हा अनुभव सुनील यांना देखील आला आणि पहिल्या वर्षात त्यांच्या वर्गातील ६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ४ लोक उत्तीर्ण झाले आणि त्यातही सुनील यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.
पॉलिटेक्निकच्या तीन वर्षांत सुनील यांच्या संग्रहात तब्बल वीस हजार शब्द जमले. या शब्दसंपदेचा जसा आपल्याला फायदा झाला आणि माध्यम बदलल्यामुळे जशी आपल्याला अभ्यासात अडचण आली तशी इतर विद्यार्थ्यांना येऊ नये आणि त्यांचा देखील फायदा व्हावा, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शब्दाचे अर्थ शोधणे अधिक सुलभ व्हावे म्हणून सुनील यांनी याच क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.
आधी झेरॉक्स मग प्रकाशन करण्याची इच्छा असलेल्या सुनिल यांना आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. अनेक खस्ता खाल्ल्यावर त्यांना नोकरी मिळाली, पण स्वतःचे काहीतरी सुरु करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
नोकरी करताना त्यांची कॉम्प्युटरशी ओळख झाली. स्वतःच अभ्यास करत, समजून घेत त्यांनी कॉम्प्युटरचे विविध पैलू शिकून घेतले. कंपनीच्या एका मशीनसाठी सुनील यांनी स्वतःच शिकत शिकत, उपलब्ध असणाऱ्या सुविधा वापरून त्या मशीनची इत्थंभूत माहिती देणारे सॉफ्टवेअर तयार केले.
त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ते सॉफ्टवेअर दाखवले. आणि वरिष्ठांनी देखील सुनीलच्या कामाची ,कष्टांची दखल घेत ते सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रेसिडेंटना दाखवले. सुनीलच्या या कामावर खुश होऊन प्रेसिडेंट साहेबांनी ते सॉफ्टवेअर अधिक सक्षम बनवण्यासाठी सुनीलना कामाची पूर्ण मोकळीक आणि लागेल ती मदत उपलब्ध करून दिली.
मिळालेल्या संधीचे सोने करत सुनील यांनी एक उत्तम आणि प्रभावी सॉफ्टवेअर तयार केले ज्यामुळे कंपनीचा खर्च तर वाचलाच शिवाय फायदा देखील झाला. यामुळे कंपनीच्या प्रेसिडेंटने सुनीलचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांना बोनस आणि काही सॉफ्टवेअर पर्चेसची ऑर्डर देखील दिली.
मेहनत सुरूच ठेवली
यातून त्यांनी स्वतःची कंपनी सुरु केली आणि कॉम्प्युटर विकत घेतला. त्यावर सॉफ्टवेअरची कामे सुरु केली. हे सगळं सुरु असताना डिक्शनरीचा विचार सुनील यांच्या मनात होताच. मग ते झपाटून कामाला लागले. अनेकांची मदत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत सुनील यांनी अथक मेहनतीने इंग्रजी-मराठी ऑनलाईन डिक्शनरी तयार करण्याचे काम पूर्ण केले.
अडीच वर्ष हे सगळे करताना दिवस रात्र काम केल्याने एक दिवस त्यांच्या कमरेतून रक्त येऊ लागले, तरीही त्यांनी नेटाने काम पूर्ण केलेच. ही डिक्शनरी म्हणजे एक प्रकारचे सर्च इंजिनच होते.
इंग्रजी-मराठी डिक्शनरी तयार केल्यानंतर देखील मराठी विद्यार्थ्यांना मराठीतून इंग्रजी शब्दकोषाची अधिक गरज आहे हे त्यांना माहित होते. त्यामुळे त्यांनी ते काम देखील हाती घेतले. तोवर इंटरनेट आणि वेबसाईट्सची चलती सुरु झाली होती. काळाची गरज लक्षात घेऊन सुनील यांनी इंटरनेटवर डिक्शनरी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आणि khandbahale.com या नावाने वेबसाईट सुरू केली.
ही इंटरनेटवरील पहिली इंग्रजी-मराठी डिक्शनरी होती. मराठीबरोबर इतर भारतीय भाषांसाठी देखील डिक्शनरीची गरज होती. त्यामुळे सुनील यांनी एक-एक भारतीय भाषेतील डिक्शनरी या साईटवर उपलब्ध करून दिली. सध्या या साईटच्या युझर्सची संख्या सहा कोटींच्यावर पोहोचली आहे.
इतके यश मिळून, त्यासाठी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील सुनील यांची नाळ त्यांच्या मातीशी घट्ट जुळलेली आहे.
शिक्षणाचे महत्व सगळ्यांना कळावे आणि सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी ते आणि त्यांचे कुटुंब प्रयत्नशील आहेत. सुनील त्यांच्या संस्थेद्वारे भाषाविषयक अनेक प्रकल्प चालवतात.
तंत्रज्ञानाची मदत घेऊन तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच देशातील तरुणांमध्ये नवप्रवर्तन संस्कृती रुजावी ह्यासाठी त्यांनी MIT व अनेक जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या साहाय्याने “कुंभथॉन” ही मोहीम सुरु केली आहे.
सुनील खांडबहाले यांचे कार्य प्रत्येक तरुणासाठी आदर्श आहे. त्यांच्यासारख्या अनेक तरुणाची आज देशाला गरज आहे. डिक्शनरीमॅन सुनील खांडबहाले यांना मानाचा मुजरा!