खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मयमूर्ती आहे. मानवी जीवनात या ग्रंथ पारायणास महत्त्व असून, पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होऊन मनाच्या स्थिरतेद्वारा सात्त्विक समाधानाची प्राप्ती होते, असा अनुभव आहे. धकाधकीच्या जीवनात हे पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते; पण काही प्रतिबंधामुळे ते शक्य होत नाही. अशा लोकांसाठी खांडबहाले डॉट कॉमतर्फे ‘ज्ञानेश्वरी रेडिओ’ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुणे ज्ञानेश्वरी रेडिओचे उद्घाटन परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. भटकर म्हणाले, की या रेडिओमुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखिल विश्वाला उपलब्ध झाला आहे. ज्ञानेश्वरी रेडिओ हा इंटरनेट रेडिओ आहे. ही सुविधा सकल जनांसाठी अव्याहतपणे उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेचा लाभ आपणास जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकणार आहे. या रेडिओच्या माध्यमातून डॉ. किसन महाराज साखरे यांनी व्रतस्थ व सांप्रदायिक पद्धतीने केलेल्या संपूर्ण, सांप्रदायिक, शुद्ध, ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ मिळणार आहे. पारायणामध्ये सात्त्विक वाद्यांचे साह्य घेतले असून, जयजयवंती रागामध्ये संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले आहे. या सुविधेसाठी https://radio.garden/listen/dnyaneshwari/wNaxBWvK, https://zeno.fm/dnyaneshwari या संकेतस्थळाचा आपल्या स्मार्टफोन, संगणक अथवा टॅब्लेटमध्ये वापर करावा. साधकाश्रमचे यशोधन साखरे, ‘खांडबहाले डॉट कॉम’चे सुनील खांडबहाले, नचिकेत भटकर, सारंग राजहंस, चिदंबरेश्वर साखरे, नचिकेत कंकाळ, उदय पंचपोर आदी उपस्थित होते. News Link : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/dhaneshwari-radio-by-khandabhale-com/articleshow/71353315.cms
Sidebar